आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय प्रक्रियेचा सकारात्मक वेध

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेली दोन वर्षे देशामध्ये भ्रष्टाचार, महागाई, आर्थिक घोटाळे, महिलांची सुरक्षा यांचीच चर्चा प्राधान्याने झाली. या घटनांमुळे सरकारविषयी आणि एकूणच राजकारणाविषयी जनतेच्या मनात असंतोष निर्माण होऊन सामाजिक संस्था, विद्यार्थी रस्त्यावर उतरले. कॉमनवेल्थ गेम, टूजी स्पेक्ट्रम घोटाळा, आदर्श सोसायटी प्रकरण, महाराष्ट्रातील सिंचन क्षेत्रात भ्रष्टाचाराच्या प्रकरणात मुख्यत: राजकीय नेत्यांवर आरोप झाल्याने आणि त्यातील काहींना तुरुंगवासही भोगावा लागल्याने राजकीय नेते भ्रष्टाचारी आणि पैसेखाऊच असतात, हा समज पसरण्यास वेळ लागला नाही. प्रसारमाध्यमांनीही आपली तटस्थ भूमिका सोडून प्रत्येक स्टुडिओमध्ये आरोपी कोण हे निश्चित करून एक न्यायालय मांडले. कोण चूक; कोण बरोबर, याचा निवाडा लोक एसएमएसच्या माध्यमातून देऊ लागले. त्याच दरम्यान लोकपाल विधेयकासाठी अण्णा हजारे, अरविंद केजरीवाल आदींनी मागणी लावून धरल्यामुळे आता सगळे राजकारणी घरीच बसणार, असा एक पद्धतशीर समज समाजात पसरवला गेला. एकूणच, राजकारण करणारे सगळेच वाईट आहेत, या मनोवृत्तीला खतपाणी घालण्याचे काम या सर्व घटनांच्या निमित्ताने झाले. मात्र राजकारणाला टाळून किमान लोकशाहीतील समाज तग धरू शकत नाही. समाजात मोठे बदल घडवायचे असतील, तर त्यासाठी राजकारणाच्या माध्यमातूनच उपाय योजावे लागतात. केवळ रस्त्यावर उतरून निषेध व्यक्तकरून किंवा मंत्र्यांच्या घरावर आक्रमकपणे मोर्चे नेऊन समाजात बदल होत नाहीत. या पार्श्वभूमीवर समाजहिताचा, देशहिताचा विचार करून सर्वसामान्य घरातून आलेले तरुण-तरुणी राजकारणात उतरू शकतात, असा आशावाद वरिष्ठ पत्रकार दीपक पटवे यांनी ‘राजहंस प्रकाशना’च्या ‘चला राजकारणात!’ या पुस्तकाद्वारे मांडला आहे. राजकारणाभोवती वर उल्लेख केल्याप्रमाणे सत्ता, संपत्ती, भ्रष्टाचार, टीका, आरोप-प्रत्यारोप, गुंडगिरी या गोष्टी नेहमी फिरत असतात. अनेकदा राजकारणात असलेले लोकही ‘राजकारण वाईट आहे रे बाबा!’ असे म्हणतात. अशा वेळी ‘चला राजकारणात!’ असे पटवे यांनी पुस्तकातून केलेले आवाहन अनेक अर्थाने लक्षवेधी आहे. समाजामध्ये राजकारण हे अपरिहार्य असून तिथे चांगली माणसे आली तर राजकारणाभोवतीचे टीकेचे जाळे कमी होऊ शकेल, असा आत्मविश्वास पटवेंसारख्या वरिष्ठ पत्रकाराला वाटतो, त्याचेच प्रतिबिंब पुस्तकात उमटले आहे. एक प्रकारे हे पुस्तक म्हणजे, राजकारणात जाऊ इच्छिणार्‍यांना प्रोत्साहन देणार्‍या एखाद्या मार्गदर्शकाप्रमाणे आहे. पत्रकारितेत वावरताना राजकीय नेते-कार्यकर्त्यांना समजून घेताना, जवळून पाहताना आलेल्या अनुभवांची मांडणी त्यांनी इथे केली आहे. त्यात राजकारण आणि नेत्यांची सकारात्मक बाजू उलगडून दाखवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न पटवे यांनी केला आहे.
राजकारणी व्यक्ती आणि राजकारणाचा जवळचा संबंध असलेले अनेक जण या क्षेत्राबाबत अनेक घटना, प्रसंग, किस्से, अनुभव सांगतात. मात्र त्यात प्रत्यक्षात उतरून काम करण्याची हिंमत किंवा तयारी फार कमी लोकांमध्ये असते आणि असली तरी त्यांना योग्य मार्गदर्शन मिळतेच असे नाही. इतर क्षेत्रांप्रमाणे राजकारणामध्ये येण्यासाठी काही परीक्षा द्यावी लागत नसते. तरुण वयात विद्यार्थी संघटनांमध्ये काम करणारे, सामाजिक क्षेत्रात वावरणारे, राजकीय घराण्यातले असे लोक जास्त प्रमाणात राजकारणात उतरलेले पाहायला मिळतात. अपघाताने येणार्‍यांची संख्याही इथे मोठी आहे. पण या सगळ्यांना विचारले की राजकारणात कसे यायचे, तर प्रत्येक जण वेगळी मते मांडतील आणि काही जण तर चक्क न येण्याचा सल्लाही देतील. राजकारणामध्ये येण्याचा आणि टिकून राहण्याचा काहीही फॉर्म्युला नाही. मात्र या क्षेत्राबद्दल आवड असणार्‍यांना काही किमान गोष्टींची माहिती ठेवणे गरजेचे असते. तेच पटवे यांनी भारतातील राजकीय पक्ष आणि त्यांच्या यंत्रणा, विविध राजकीय पक्षांच्या घटना, रचना, कार्यपद्धती, भारतीय राज्यघटना, निवडणूक पद्धती आदी मुद्द्यांच्या आधारे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. या क्षेत्राबद्दल असणारे समज-गैरसमज त्यांनी आपल्या अनुभवातून दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. राजकारणामध्ये पैसे, गॉडफादर, जात, घराणे अशा अनेक गोष्टी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रभाव पाडत असतात. पण या परिघाला छेद देणारेही राजकारणी आहेत. गृहमंत्रिपदी असणारे आर. आर. पाटील हे शिक्षक होते. खासदार राजू शेट्टी शेतकरी कुटुंबातून आलेले आहेत. प्रा. वसंत पुरके, दिवंगत प्रा. रामकृष्ण मोरे, पाणी पुरवठा मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी तर नोकरी करून राजकारण सांभाळले. शिरपूरचे आमदार अमरिश पटेल, नंदुरबारमधील रघुवंशी, धुळ्याचे आमदार अनिल गोटे, जळगावचे गिरीश महाजन हे राजकारण करताना जातीच्या गणितात अडकले नाहीत, असे पटवेंना वाटते. राजकारणाविषयी उपस्थित होणार्‍या मूलभूत प्रश्नांची उत्तरे देतानाच मनाची तयारी योग्य असण्यावरही त्यांनी भर दिला आहे. राजकारणामध्ये जाण्यापूर्वीचे ‘पण’, ‘परंतु’ अशा सगळ्या मुद्द्यांना पटवे यांनी आपल्या पुस्तकातून स्पर्श केला असून त्यातून विचारमंथन नक्कीच सुरू होईल.
(shruti.sg@gmail.com)