आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रिटेल किंगः किशोर‍ बियानी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिग बाजार, पँटालून्समध्ये एकदाही न गेलेली व्यक्ती सापडणे विरळा आणि ही नावं न एकलेला माणूस तर त्यातूनही विरळा. सुरुवातीला केवळ कपडे, नंतर किराणा सामान आणि आता अगदी इलेट्रॉनिक्सच्या वस्तूंपासून फर्निचर्सपर्यंत सगळ्या वस्तू विकणारी ही रिटेल चेनची आऊटलेट्स प्रत्येकाच्या घराघरात पोहोचली आहेत, इतकंच नव्हे, तर कितीतरी जणांची घरं यावर चालतात! कारण एकदा का बिग बाजारमध्ये गेलं की, घरासाठी लागणा-या सगळ्या गोष्टी इथे ‘अंडर वन रूफ’ मिळतात. भारतात जेव्हा रिटेल चेनची संकल्पना नुकतीच आली होती तेव्हा या व्यवसायातले मर्म जाणले ते पँटालून्स रिटेलचे एमडी आणि बिग बाजारचे सीईओ किशोर बियानी यांनी. तुम्हाला सांगून खोटं वाटेल; पण त्यांचा कपडे विकण्याचा अत्यंत छोटासा व्यवसाय होता. एक छोटं दुकान होतं; पण आता जवळपास भारतातल्या 25 शहरांमध्ये बिग बाजारचे काही हजार स्वेअर फूट्सचे मॉल्स आहेत आणि त्यांचा टर्न ओव्हरच काही कोटी मिलियन्सच्या घरात असतो आणि या सगळ्यामागचा मेंदू आहेत किशोर बियानी.
अत्यंत शांत स्वभावाचे आणि साधी राहणी असलेल्या बियानी यांचं बालपण मुंबईत मलबार हिल परिसरात गेलं. त्यांच्या घरचं वातावरण मध्यमवर्गीय होतं आणि त्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय होता. त्यांचे काका, आजोबा, बाबा सगळे या व्यवसायात होते. आजोबांनी पहिल्यांदा मुंबईहून राजस्थानच्या निंबी या गावी स्थलांतर केलं. तिथे त्यांनी होलसेलमध्ये धोतर आणि साड्या विकण्याचा व्यवसाय सुरू केला. तेव्हाच कदाचित बियानी यांच्या मनात अशा प्रकारचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात करावा या कल्पनेचं बीज रोवलं गेलं असावं. कारण वयात आल्यावर मुंबईच्या सेंच्युरी बाझारमध्ये गेल्यावर त्यांना असंच मोठ्या प्रमाणावर आपणही करावं असं वाटायचं आणि पुढे ते त्यांनी करून दाखवलं.
एचआर कॉलेजमधून त्यांनी वाणिज्य शाखेचं शिक्षण पूर्ण केलं; पण अभ्यासात ते फारसे हुशार नव्हते. पण व्यवसायाची गणितं त्यांना पक्की कळायची. मुळातच त्यांचा थेट जगाशी येणा-या संपर्कातून मिळणारा अनुभव आणि त्यातून शिकता येण्यासारख्या गोष्टींवर जास्त विश्वास असावा. म्हणूनच ते कॉलेजमध्ये असतानाही बाहेरच जास्त फिरत असायचे. फार काही शिकावं आणि मोठं व्हावं अशी महत्त्वाकांक्षा त्यांना कधीच नव्हती. त्यामुळे ते कोणत्याही बिझनेस स्कूलमध्ये गेले नाहीत, हे बरंच झालं असं ते स्वत:च कबूल करतात. बिझनेस स्कूल्स एखाद्या मॅनेजरसाठी ठीक असली तरी व्यावसायिक घडवण्यासाठी ती फारशी उपयोगी नसल्याचं त्याचं मत आहे. त्यामुळे कॉलेजात असताना ते बाहेरच मित्रांसोबत जास्त असायचे, नव्या जागांना भेट द्यायचे आणि कॉलेजच्या शेवटच्या वर्षापासूनच त्यांनी वडिलांबरोबर घरातल्या व्यवसायात लक्ष घालायला सुरुवात केली; परंतु इथलं पारंपरिक व्यावसायिक वातावरण बियानी यांना फारसं आवडलं नाही. त्यांची तिथे घुसमट व्हायची. कारण त्यांची स्वप्नं आणि कल्पना वेगळ्या होत्या. त्यांचा वडिलांचा या व्यवसायाकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्यांना आवडायचा नाही. ते बोलून दाखवत नसले तरी त्यांच्या चेह-यावरून ते कळायचे. सरतेशेवटी त्यांनी पँटालून्सची स्थापना केली आणि आज ते रिटेल क्षेत्रातले सम्राट म्हणून ओळखले जातात.
भारतातल्या सर्वांत मोठ्या कंपन्यांचे संस्थापक असूनही बियानी ठरावीक कालावधीने प्रत्येक आऊटलेटला भेट देतात आणि तिथे काम करणा-या प्रत्येकाची विचारपूस करतात. त्यांनी आभाळात भरारी घेतली असली तरी त्यांचे पाय जमिनीवर घट्ट रोवलेले आहेत!