आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मेंदूचा पक्षाघात जलद उपायाने टळतो

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्याला हृदयविकाराच्या झटक्यांबद्दल माहिती आहे. रुग्णाला असा झटका आल्यास त्याला तत्काळ हॉस्पिटलमध्ये हलवणे गरजेचे असते, हेदेखील आपण जाणतो.
मेंदू आघात किंवा मेंदूचा पक्षाघात हादेखील एक असा आजार आहे, ज्यामध्ये तत्काळ
कृती करणे गरजेचे असते. आपल्याला हे माहीत होते का ? मेंदूच्या पक्षाघातामुळे रुग्णाला अर्धांगवायू, शारीरिक अवलंबित्व, स्मरणशक्तीचा -हास, नैराश्य अशा विकलांगत्वाचा सामना करावा लागतो.
मेंदूचा पक्षाघात हा मेंदूला होणा-या रक्तपुरवठ्यात अडथळे निर्माण झाल्यामुळे होतो. हे बहुतेक वेळा मेंदूच्या रक्तवाहिनीत गुठळी निर्माण झाल्याने किंवा रक्तवाहिनी फुटल्याने होते. मेंदूच्या पक्षाघाताच्या बहुतेक प्रकरणांवर इलाज करणे शक्य असते. पक्षाघातानंतर 4.5 तासांच्या आत उपचार मिळाल्यास विकलांगत्व येण्याची शक्यताही कमी होते. उपचार मिळाल्याने रुग्ण थोड्याशा विकलांगत्वासह किंवा अजिबात विकलांगत्व न येता किंवा अर्धांगवायू न होता जगू शकतो. 4.5 तासांच्या आतही जेवढ्या लवकर उपचार योजना मिळतील, परिणामी तेवढाच प्रभावी असतो. वैद्यकीय उपचार पद्धतींना फिजिओथेरपी, स्पीच थेरपी आणि बिहेवियरल थेरपीची जोड दिली जाते. कोणाला मेंदूचा पक्षाघात झालाय हे कसे ओळखावे ? याचे सर्वसाधारण लक्षण म्हणजे हात आणि पाय लुळे पडणे, वाचेत अडथळे निर्माण होणे, ही लक्षणे एफएएसटी म्हणजेच फास्ट या संक्षेपानुसार लक्षात ठेवता येतील.
फेस (चेहरा) : चेह-याच्या एका बाजूला लकवा येणे.
आर्म (हात) : एक हात उंचावण्यास त्रास होणे.
स्पीच (वाचा) : वाचा पूर्ण जाणे किंवा तोतरणे.
टाईम (वेळ) : वरीलपैकी कोणतेही लक्षण आढळल्यास वेळ महत्त्वाचा आहे, हे जाणून रुग्णाला शक्य तितक्या लवकर हॉस्पिटलमध्ये हलवले पाहिजे. हॉस्पिटलमध्ये सीटी/ एमआरआय सुविधा असावी किंवा तशी सुविधा हॉस्पिटलच्या आसपास असावी. सुयोग्य उपचार योजनेमुळे अवलंबित्व / अर्धांगवायू धोका टाळता येऊ शकतो, पण या सर्वांमध्ये रुग्णाला तत्काळ हॉस्पिटलमध्ये हलवणे अत्यंत आवश्यक असते. फास्ट म्हणजे जलद कार्यवाही करा. कारण वेळ घालवला तर मेंदू हातचा जाण्याची शक्यता असते. लक्षात ठेवा पक्षाघातावर उपचार होऊ शकतात.