आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नितळ कांतीसाठी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हल्ली बाजारात रोज अनेकविध प्रकारची सौंदर्य प्रसाधने नित्यनेमाने येत आहेत. त्यापैकी काही अतिशय महाग, ब्रँडेड व उत्तम दर्जाची आहेत; तर काही अत्यंत सुमार दर्जाची, स्वस्तही आहेत. आपल्या त्वचेनुसार कोणत्या सौंदर्य प्रसाधनाचा वापर करायला हवा, हे गणित अनेक स्त्रियांना समजत नाही आणि जमतही नाही. तुमच्या त्वचेचा रंग आणि त्वचेचे आरोग्य यांचा एकमेकांशी संबंध नाही, हे सर्वप्रथम ध्यानात घ्या. फक्त गोरा रंग असणाºयांनीच त्वचेची काळजी घ्यायला हवी, इतरांनी नाही, असा जर तुमचा समज असेल तर तो प्रथम डोक्यातून काढून टाकावा.
त्वचेचे सौंदर्य केवळ त्वचेच्या रंगात नसून ते त्वचेच्या नितळपणात, स्वच्छतेत आणि निकोप असण्यात आहे. अनेक स्त्रियांना त्यांच्या सावळेपणाचा किंवा काळेपणाचा कुठेतरी एक सुप्त ‘कॉम्प्लेक्स’ असतो, तो काढून टाकावा व त्याचबरोबरीने त्वचेची काळजी व निगा घ्यावी. तयार सौंदर्य प्रसाधने वापरण्यास सोपी आणि वेळेची बचत करणारी असल्याने त्यांचा वापर करण्यास अर्थात हरकत नाही; पण प्रथितयश ब्रँड्स, तुमच्या त्वचेचा पोत (कोरडी, तेलकट किंवा नॉर्मल त्वचा) आणि तुमचे बजेट याचा विचार करून वापर करावा. हल्ली ‘हर्बल’ या नावाखाली काय वाट्टेल ते खपवण्याचा चंग अनेक कंपन्यांनी बांधलेला आहे. ‘हर्बल म्हणजेच आयुर्वेदिक’ असा समज न करता अत्यंत विचारपूर्वक अशा सौंदर्य प्रसाधनांची खरेदी करावी.
त्वचेची निगा किंवा काळजी घेताना आपण प्रथम घरगुती सौंदर्य प्रसाधनांचा वापर कसा करावा, ते पाहूया.
’ त्वचेच्या आरोग्यात प्रथम स्क्रबिंग (त्वचा हळुवारपणे घासून वरचा मळ आणि जुन्या त्वचेचा थर अलगदपणे काढणे.) क्लिन्झिंग (त्वचा स्वच्छ करणे), त्यानंतर अनुलेपन (म्हणजे तुम्हाला आवश्यक असलेल्या प्रसाधनाचे लेपन) व नंतर टोनिंग हे मुख्य प्रकार आहेत.
’ वरील क्रमाने किमान पंधरा दिवसांतून एकदा तरी त्वचेची काळजी घेणे गरजेचे आहे. स्क्रबिंग म्हणजे त्वचा हळुवारपणे घासून साफ करणे, ही आपली पूर्वापार परंपरा आहे (उटणे). वाळा, चंदन, हळद, नागरमोथा अशा अनेक औषधी वनस्पतींच्या साहाय्याने तुम्ही घरगुती उटणे बनवून त्याचा वापर आठवड्यातून एक किंवा दोन वेळा अंघोळीपूर्वी संपूर्ण शरीराला लावण्यासाठी करू शकता. उटणे दुधात किंवा पाण्यात मिसळून त्याची जाडसर पेस्ट बनवून ती अलगदपणे संपूर्ण त्वचेवर घासून त्यानंतर कोमट पाण्याने स्नान केल्यास त्वचेवरील मृत पेशींचा थर निघून जातो, रंध्रे मोकळी होतात आणि रक्ताभिसरण उत्तम होण्यास मदत होते.
त्याचप्रमाणे काही घरगुती पदार्थांचा वापर करून तुम्ही क्लिन्झिंगही करू शकता. लिंबाचा ताजा रस कापसावर घेऊन त्याने त्वचा साफ करता येते. दूध हेही एक उत्तम क्लिन्झरचे काम करते. क्लिन्झिंगमुळे त्वचेच्या पहिल्या अगदी वरच्या थरात अडकलेले धूळ, प्रदूषित घटक साफ निघून जाण्यास मदत होते, त्वचेला निखार येतो आणि रंध्रे मोकळी होण्यासही मदत होते.
’ अनुलेपन (फेशियल)- त्वचेच्या आरोग्याची काळजी घेताना आपल्या त्वचेसाठी अत्यावश्यक असणारे अनेक घटक आपण बाह्य द्रव्यातून किंवा पदार्थातून तिला देऊ शकतो. फेशियल हा क्लिन्झिंग व स्क्रबिंगनंतरचा महत्त्वाचा प्रकार आहे. महिन्यातून दोनदा पंधरा दिवसांच्या अंतराने तुम्ही नियमितपणे अनुलेपन करत गेलात तर तुमच्या त्वचेचा पोत आणि आरोग्य सुधारण्यास खचितच मदत होते. तुमची त्वचा नॉर्मल असेल तर मुलतानी माती आणि दुधाचे मिश्रण, तेलकट असेल तर चंदन+मुलतानी माती+पाणी यांचे मिश्रण आणि कोरडी त्वचा असेल तर बदामाचे चूर्ण+दूध यांचे मिश्रण अशा अनेकविध प्रकाराने तुम्ही अनुलेपन करू शकता. फळांचे गरही तुम्ही वापरू शकता. उदा. पपई, आंबा, टॉमेटो इत्यादी. सरतेशेवटी त्वचेवर बर्फाचा क्यूब फिरवून किंवा मग कोरफडीचा जेल लावून त्वचा टोन करावी आणि पुन्हा स्वच्छ धुऊन घ्यावी.
’ शक्यतो पूर्वापार चालत आलेल्या ब्रँड्सची सौंदर्य प्रसाधने वापरणे केव्हाही उत्तम. एखादा नवीन ब्रँड बाजारात आल्यानंतर त्याचा वापर त्वरित करू नये. त्याचप्रमाणे सौंदर्य प्रसाधने खरेदी करताना त्याचा उत्पादन दिनांक अवश्य पाहावा. जुनी कॉस्मेटिक्स वापरणे कटाक्षाने टाळावे. कॉस्मेटिक्स त्वचेला चालतात की नाही, याची स्किन टेस्ट घेतल्याशिवाय त्याचा एकदम वापर सुरू करू नये. काही रसायनांना त्वचा अ‍ॅलर्जिक असू शकते. विशेषत: हेअरडाय, केसांचे रंग, क्रीम्स आणि आयलायनर्स यांची खरेदी अत्यंत सावधपणे करावी.
’ उन्हात बाहेर जाताना ‘सनस्क्रीन लोशन किंवा क्रीम’ वापरणे नितांत गरजेचे आहे. मी आधीच काळी आहे, मला सनस्क्रीन वापरून काय उपयोग, असा विचार न करता, सनस्क्रीन लोशन वापरायलाच हवे. त्यामुळे प्रखर सूर्यप्रकाशातील दाहक अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून त्वचेचे संरक्षण होते. सनस्क्रीन लोशन खरेदी करताना त्यातील एसपीएफ (सन प्रोटेक्शन फॅक्टर) पाहावा. भारतीय हवामानातील सूर्यप्रकाशात किमान 15 एसपीएफ असणे गरजेचे आहे. सनस्क्रीन लावल्याच्या 20 मिनिटांनंतर घराबाहेर पडावे. त्याचा इफेक्ट त्वचेवर चार तास राहतो.
अशा प्रकारे तुम्ही घरगुती पदार्थ आणि मार्केटमधील उपलब्ध असलेली सौंदर्य प्रसाधने यांचा सुयोग्य वापर करून त्वचेची योग्य काळजी घेऊ शकता.
astroguru.sachin@gmail.com