आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • British Hujur Party Leader And Pm Cameron Visit To Jaliyanwala Bag Punjab

जालियनवाला बागेत नतमस्तक कॅमेरुन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॅमेरून हे ब्रिटिश हुजूर पक्षाचे नेते आहेत. तो पक्ष दीर्घकाळ साम्राज्यवादी म्हणून ओळखला जात होता. अशा पक्षाचे विद्यमान प्रमुख जालियनवाला बागेतील स्मारकापुढे वाकतात, हे महत्त्वाचे आहे. त्यांनी म्हटले की, चर्चिल यांनीही जालियनवाला बागेचे प्रकरण अमानुष म्हटले होते. या स्मारकास भेट देणारे कॅमेरून हे पहिले ब्रिटिश पंतप्रधान आहेत.
मजूर पक्ष भारतीयांना जवळचा वाटत असला तरी त्याच्या कोणत्याही पंंतप्रधानाने अशी भेट दिली नाही. टोनी ब्लेअर यांनी जालियनवाला बागेतील हत्याकांडाचा निषेध मात्र केला होता. ब्रिटिश राणी एलिझाबेथ हिने स्मारकास भेट देऊन तो काळ अवघड व अस्वस्थ होता, असे म्हटले. मृत्यूचा आकडा दोन हजार असल्याचे फलकावर वाचले, तेव्हा जखमींचाही समावेश झालेला असावा, असे त्या म्हणाल्या. त्यांचे पती ड्युकऑफ एडिंबरा यांनी वार्ताहरांना सांगितले की, ज्या जनरल डायरने हे हत्याकांड केले, त्याच्या मुलाने आपल्याला पित्याचा हवाला देऊन 200 हा आकडा सांगितला होता. पण तेव्हा भारतात असलेल्या ब्रिटिश सरकारने नेमलेल्या हंटर समितीने 300 हा आकडा नमूद केला असल्याचे ड्युक ऑफ एडिंबरा यांना कोणी सांगितले नसावे.
पहिले महायुद्ध संपले होते आणि हिंदी जनतेच्या राजकीय अपेक्षा वाढल्या होत्या. पण तेव्हाच्या इथल्या ब्रिटिश अधिकाºयांना युद्धकाळात मिळालेले वाढीव अधिकार कमी होणार आणि ज्यांच्यावर आपण सत्ता गाजवतो त्यांना काही अधिकार मिळणार, याचे शल्य टोचत होते. यातून मग रोलॅट यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने काही कायद्यांत दुरुस्त्या करण्याचा अहवाल दिला. त्यात हिंदी लोकांच्या उच्चार व सभास्वातंत्र्याचा संकोच होणार होता; वृत्तपत्रांची मुस्कटदाबी करण्याचा मार्ग मोकळा राहण्याची व्यवस्था होती. मॉन्टफर्ड सुधारणा कायदा 1919मध्ये अमलात आला. त्यासंबंधी असमाधान आणि नव्या निर्बंधांचा निषेध यासाठी काँग्रेसचे नवे नेते महात्मा गांधी यांनी अभिनव मार्ग अवलंबला. 6 ते 13 एप्रिल 1919 हा आठवडा राष्‍ट्रीय सप्ताह म्हणून साजरा करण्याचे आवाहन गांधींनी केले.
हा सप्ताह देशभर पाळला जाणार होता. गांधींनी हरताळाचेही आवाहन करून सत्याग्रह करण्यासाठी सत्याग्रही सभा स्थापन केली. ते दिल्लीला जाणार होते, पण त्यांना मज्जाव झाला. त्यांना अटक झाल्याची अफवा पसरून अनेक ठिकाणी दंगली व जाळपोळ झाली. गांधींनी मग तीन दिवसांचे उपोषण केले व आधी जाहीर केलेले कार्यक्रम रद्द केले.
पंजाबमध्ये वेगळीच परिस्थिती निर्माण होत होती. त्या प्रांताचा गव्हर्नर होता ओडवायर. त्याने वृत्तपत्रांवर अनेक निर्बंध लादले आणि अनेकांना तुरुंगात डांबले. गांधींनी याअगोदर दिलेला हरताळाचा आदेश पंजाबमध्ये पाळण्यात आला. 30 मार्च व 6 एप्रिल या दोन्ही दिवशी कडकडीत हरताळ होता. गांधींना अटक झाल्याची बातमी उठल्यामुळे सरकारच्या निषेधाची मिरवणूक अधिकच मोठी व जोमदार होती.
अमृतसरमधील परिस्थिती आटोक्याबाहेर जाण्याचा धोका दिसल्यामुळे गव्हर्नरने अमृतसर विभागाचा लष्करप्रमुख जनरल डायर याच्या हाती शहर सोपवले. जालियनवाला बागेत नागरिकांची सभा बोलावण्यात आली होती. सभेला बंदी असल्याचे लोकांना माहीत नव्हते. नंतर प्रसिद्ध झालेल्या बातम्या पाहता त्या प्रसंगी सरकारी हस्तकांनी लोकांचा गोंधळ उडवून देण्याचे काम केले होते. सभेला लोकांची गर्दी होती. त्या सभेवर जनरल डायर याने अगोदर कसलीही सूचना न देता गोळीबार केला. जालियनवाला बाग म्हणजे मुंबईतल्या आझाद मैदानासारखे विस्तृत असे मैदान नाही. ती बागही नाही, तर मोकळी जागा आहे. मोकळी जागा असल्यामुळे तिथे संध्याकाळी रोजच लोक जमत असत. सभेसाठी म्हणून मात्र मोठी गर्दी होती. अचानक गोळीबार सुरू झाल्यावर बायकामुलांसह लोक सैरावैरा धावू लागले. नंतर हंटर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने गोळीबारात 250 ते 300 लोक मरण पावल्याचे नमूद केले. पंंडित मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसने नेमलेल्या समितीने तो आकडा एक हजाराच्या घरात असल्याचे मत दिले. हंटर समितीने सर्व दोष जमावावर टाकला, तर नेहरू समितीने सरकारची दडपशाही आणि बेछूट गोळीबार यांचा निषेध केला. त्या सप्ताहात अनेक ठिकाणांप्रमाणे अमृतसरमध्येही हिंसक प्रकार झाले, हे नमूद करून त्याबद्दल निषेध केला. या अत्याचाराच्या निषेधार्थ रवींद्रनाथांनी त्यांना अगोदर मिळालेली सर ही पदवी परत केली.
हंटर समितीत दोन-तीन हिंदी सभासद होते. त्यांनी गोळीबार व इतर अत्याचार यासंबंधी टीका केली, तर इंग्रज सभासद बहुमतात होते त्यांनी सरकारची बाजू घेतली. नेहरू समितीचा अहवाल तयार होत असताना तो महात्मा गांधींच्या नजरेखालून जात होता आणि गांधीजी अहवालात जे शब्द व वाक्य विनाकारण जहरी झाले असल्याचे वाटेल, ते बदलून सौम्य करत होते. बॅ. मुकुंद जयकर यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिले आहे की गांधी याप्रमाणे भाषा सौम्य करत ते अनेक सदस्यांना आवडत नसे. पण गांधींनी त्यांची नंतर समजूत घातली. त्यांनी सांगितले की, ब्रिटिश लोकांचा स्वभाव तुम्ही लक्षात घ्या. त्यांना टोकाला जाऊन बोलणे पसंत पडत नाही. ते नेहमी सौम्य शब्दांची निवड करतात. गांधींच्या या विधानाच्या सत्यतेचा प्रत्यय नंतर आला. नेहरू समितीच्या अहवालाचा ब्रिटिश संसदेत मोठाच प्रभाव पडला. या समितीसंबंधात पंडित जवाहरलाल नेहरू यांचा अनुभव लक्षात घेतला पाहिजे. त्यांनी आत्मचरित्रात यासंबंधी लिहिले आहे. नेहरूंनी म्हटले आहे की, पंंजाबमधील बंदी उठल्यावर लोकांना मदत देण्यासाठी आणि चौकशीच्या कामासाठी अनेक जण आले होते. चित्तरंजन दास हे त्यातले एक. त्यांनी जवाहरलाल नेहरूंना मदतनीस म्हणून बोलावले व त्यांनी लगेच मान्यता दिली. मग अमृतसरमध्ये अनेकांच्या भेटी घेतल्या. लोकांच्या कहाण्या ऐकल्या. जालियनवाला बागेचा कोपरान्कोपरा अनेकदा बघून झाला.
जालियनवाला बागेतून बाहेर पडण्यास फक्त एक मोकळी जागा होती. दुसरीकडे पाच-एक फूट उंचीची भिंत होती. गोळीबार सुरू झाल्यावर लोक तिकडे धावले, पण त्यांच्यावरही गोळ्यांंचा वर्षाव होत होता. बागेतून बाहेर जाण्यास अनेक मोकळ्या वाटा असाव्यात, अशी जनरल डायरची समजूत होण्याचे कारण नव्हते. कारण बागेच्या जवळ उभे राहिल्यावर फक्त एकच वाट आहे, हे दिसत होते. बागेला अनेक वाटा असतील, असे डायरला वाटल्याची सबब लंगडी होती. यानंतर साधारणत: वर्षाने नेहरू अमृतसरहून दिल्लीला रात्रीच्या आगगाडीने यायला निघाले. डबा पूर्ण भरला होता. बाकाच्या वरच्या जागा मोकळ्या होत्या. नेहरूंनी एक जागा घेतली. झोप येत असताना खाली बसलेल्या प्रवाशांच्या बडबडण्यामुळे त्यांना जाग आली. त्यातला एक जालियनवाला बागेतल्या हत्याकांडासंबंधी बढाईखोर भाषेत बोलत होता. लक्षात आले की, तोच जनरल डायर होता. तो आपण हिंदी लोकांना कसे शरण आणले, हे सांगत होता. आपण सर्व शहराची राखरांगोळी करू शकत होतो; पण केली नाही, असे तो म्हणाला. डायर निवृत्त झाल्यावर इंग्लंडमध्ये त्याला थैली दिली गेली. रुडयार्ड किप्लिंग या साम्राज्यवादी लेखकाने भरघोस रक्कम दिली होती. कॅमेरून यांच्या वक्तव्यामुळे हा सर्व इतिहास आठवला.
(govindtalwalkar@hotmail.com)