आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इतिहासाचे पान : गांधी दी लंडनर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
१८ जुलै १९१४. या दिवशी गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेचा किनारा सोडला. ते भारताच्या दिशेने यायला निघाले. गांधीजींचे ९ जानेवारी १९१५ रोजी मुंबई बंदरात आगमन झाले. परंतु वाटेत त्यांनी लंडनलाही मुक्काम केला. लंडन आणि गांधीजी हे अद्वैत होते. गांधीजींचा पहिला प्रवास लंडनलाच झालेला होता. लंडननेच मोहनदास करमचंद गांधी नावाच्या व्यक्तिमत्त्वाला विविध पैलू पाडले होते. तिथेच त्यांनी निग्रहाने शाकाहारी होण्याचा निर्णय घेतला होता. नृत्य आणि संगीतात नशीब आजमावण्याचा अयशस्वी प्रयत्नही केला होता. एका महात्म्याच्या या काहीशा अप्रकाशित प्रवासावर ब्रिटिश पत्रकार सॅम मिलर यांनी प्रतिष्ठित ग्रँटा नियतकालिकाच्या इंडिया विशेष अंकात लिहिलेल्या लेखावर आधारित हे टिपण...

लंडनशी जडले नाते...
महात्मा गांधी आणि लंडन शहराचे अतूट नाते होते. १८८५मध्ये गांधीजींचे वडील करमचंद निवर्तले. त्यानंतर दोन वर्षांनी गांधीजी यांनी अहमदाबाद येथे मॅट्रिक्युलेशनची परीक्षा दिली. त्यात ते सुमारे ४० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले. परीक्षेतील गुणांचा निकष लावायचा तर ते लौकिकार्थाने हुशार विद्यार्थी नव्हते. भावनगर संस्थानामध्ये समळदास महाविद्यालयात उच्च शिक्षणासाठी गांधीजींनी प्रवेश घेतला. पोरबंदरच्या आपल्या घरापासून दूर राहणे आपल्याला मानवणार नाही, हे त्यांच्या लक्षात आले. त्यांचे अभ्यासात लक्ष लागेना. महाविद्यालयाच्या परीक्षेतही त्यांना यथातथाच गुण मिळाले. सरतेशेवटी महाविद्यालयीन शिक्षणाचा नाद सोडून ते पोरबंदरला परत आले.

गांधी परिवाराचे हितचिंतक मावजी दवे यांनी गांधीजींना लंडनमध्ये जाऊन बॅरिस्टर होण्याचा सल्ला दिला. हे शिक्षण घेतल्यानंतर त्यांना एखाद्या संस्थानचे दिवाण होता येईल, असेही दवे यांनी गांधीजींना सांगितले. हा सल्ला मनावर घेऊन गांधीजी घरच्यांना निरोप घेऊन १० ऑगस्ट १८८८ रोजी पोरबंदरहून मुंबईला यायला निघाले. गांधीजींच्या मुंबईहून लंडनला जाण्यात काही अडचणीही होत्या. मोध बनिया या समाजाचे प्रमुख गांधीजींना मुंबई मुक्कामात भेटले. गांधी हे लंडनला रवाना झाल्यास त्यांना वाळीत टाकण्यात येईल, असा इशारा या लोकांनी देऊन पाहिला. गांधीजींनी त्यांना आपल्या लंडनला जाण्याचे कारण नीट समजावून सांगितले, पण त्यांचे कोणी ऐकले नाही. अखेर मोध बनिया समाजातील धुरीणांनी गांधींना वाळीत टाकले आणि ते सावट मनावर घेऊन गांधीजी मुंबईहून लंडनला रवाना झाले.

२९ सप्टेंबर १८८८ रोजी इंग्लंडची राजधानी लंडनच्या भूमीवर महात्मा गांधी यांनी पहिल्यांदा पाऊल ठेवले. त्या वेळी त्यांचे वय होते अवघे १९ वर्षांचे. लंडनच्या वेस्ट किंगस्टन या भागात त्यांनी आपल्या निवासाची सोय करून घेतली होती. लंडनमध्ये पाऊल ठेवल्यानंतर एका इच्छेने त्यांच्या मनाचा ताबा घेतला होता. संपूर्ण इंग्लिश जंटलमन बनायचे, हे गांधीजींनी ठरवून टाकले होते. या व्हिक्टोरियन काळातील इंग्लंडमधील जंटलमन लोकांची जशी वेषभ्ूषा असते, तशी त्यांनी आवर्जून करायला सुरुवात केली. त्या वेळची तशी त्यांची काही छायाचित्रेही उपलब्ध आहेत. बॅरिस्टरीचे शिक्षण घ्यायला लंडनमध्ये आलेले गांधीजी त्या वेळी या शहराच्या प्रेमातच पडले. ते त्या वेळी या शहराचा उल्लेख "डिअर लंडन' किंवा "द सेंटर ऑफ सिव्हिलायझेशन' या शब्दांत करत असत. सर रिचर्ड अॅटनबरो यांनी १९८२मध्ये "गांधी' हा भव्य चित्रपट बनवला. त्यात गांधीजींचे सामाजिक, राजकीय जीवन आले आहे. मात्र गांधीजींनी लंडनमध्ये जे दिवस व्यतीत केले, तो भागच या चित्रपटात दाखवला गेला नाही!

१९व्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्लंडमध्ये शाकाहारी बनण्यासाठी एक चळवळ सुरू झाली होती. त्या व्हेजिटेरिअन सोसायटीच्या कामात गांधींनी लंडन मुक्कामात सहभागी व्हायला सुरुवात केली. लंडन इंडिया सोसायटीच्या कामातही त्यांचा थोडाफार सहभाग होता. वृत्तपत्रीय लेखनाचे पहिले धडे गांधीजींनी गिरवले ते लंडनमध्येच. तेथील व्हेजिटेरिअन या नियतकालिकासाठी ते लेखन करीत. लंडनमध्ये असताना त्यांची थिऑसॉफी चळवळीच्या नेत्या डॉ. अॅनी बेझंट, मदाम ब्लाव्हस्की यांच्याशी भेट झाली. लंडनविषयी गांधीजींच्या मनात नेहमीच जिव्हाळा होता. तो त्यांनी कधी लपवूनही ठेवला नव्हता.

असा थाटमाट कधीच बघितला नव्हता...
गांधीजींनी टिलबरी ते फेन्चर्च असा रेल्वेगाडीने प्रवास केला. फेन्चर्च येथील व्हिक्टोरिया हॉटेलपर्यंत ते घोडागाडीच्या टॅक्सीने गेले. ट्राफल्गार चौकाजवळ नॉर्थम्बरलँड मार्गावरील या हॉटेलमध्ये लॉ स्टुडंट्च्या राहण्याची व्यवस्था केलेली होती. गांधीजींनी लिहिलेय की, व्हिक्टोरिया हॉटेलाची वैभवशाली व भव्य इमारत बघून मी आश्चर्यचकित झालो. असा थाटमाट मी माझ्या उभ्या आयुष्यात बघितला नव्हता. त्या इमारतीत सर्वत्र विजेचे दिवे होते. सारा परिसर उजळला होता. या हॉटेलमध्ये प्रवेश करताच ते एके ठिकाणी थांबले. त्यांना वाटले, ही वेटिंग रुम आहे; पण प्रत्यक्षात ती अालिशान लिफ्ट होती! लिफ्टमनने एक बटन दाबले व लिफ्ट चालू झाली व ते हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावर पोहोचले. या सगळ्या तांत्रिक करामती या आधी कधीच बघितलेल्या नसल्याने गांधींना तो सगळा चमत्कारच वाटला. हॉटेलमधील आपल्या खोलीमध्ये गांधीजींनी प्रवेश केला आणि तेथील आलिशान रचनेने त्यांचे मन मोहून घेतले. या खोलीत आपण सारे आयुष्य व्यतीत करावे, असेच त्या क्षणी त्यांना वाटून गेले.

युरोपीय शिष्टाचारांशी ओळख
लंडनच्या या वास्तव्यात त्यांचा एक भारतीय डॉक्टर मित्र गांधीजींना तेथील जीवनशैलीविषयी सातत्याने मार्गदर्शन करीत असे. ते एकदा त्याच्याकडे गेले होते. या डॉक्टर मित्राला न विचारताच गांधीजींनी त्याची हॅट हातात घेतली व हलकेच हवेत भिरकावली. त्यामुळे त्या हॅटवरील फर थोडी विस्कटली गेली. हे पाहून तो डॉक्टर मित्र जरा रागावलाच. याच प्रसंगातून गांधीजींची युरोपीय शिष्टाचारांशी पहिली ओळख झाली. या मित्राने त्यांना समजावले की, भारतामध्ये जसे वागता तसे इंग्लंडमध्ये वागू नका. इंग्लंडमध्ये वावरताना कोणाच्याही वस्तूला त्याला विचारल्याशिवाय हात लावू नका. मोठ्याने बोलू नका. अडचणीचे प्रश्न पटकन कोणालाही विचारू नका. इंग्लिश जंटलमन बनण्याच्या हौसेपायी गांधीजींनी मुंबईहून लंडनला शिवून नेलेले आपले कोट वगैरे कपडे सारे बाजूला ठेवले. कारण ते लंडनमध्ये जुन्या वळणाच्या फॅशनचे समजले जायचे. त्यांनी १९ शििलंग खर्च करून चिमनी पॉट हॅट विकत घेतली. लंडनमधील फॅशनेबल लाइफचे सेंटर मानले गेलेल्या एका दुकानातून इव्हिनिंग सुट विकत आणला. आपले व्यक्तिमत्त्व गोऱ्या साहेबासारखे दिसावे, असा त्या वेळी त्यांचा अट्टाहास असायचा. त्यासाठी त्यांनी नृत्य, वक्तृत्वप्रशिक्षण तसेच फ्रेंच भाषा शिकणे सुरू केले होते. त्यांनी तीन पौंडांना व्हायोलिन विकत आणले होते. ते कसे वाजवावे, हे एक शिक्षिका त्यांना शिकवत असे. पण व्हायोलिन शिकणे काही त्यांना जमले नाही. अखेर त्यांनी हे व्हायोलिन विकून टाकले. त्यांनी नृत्याचे तीन आठवड्यांत सहा धडे घेतले, पण तोही प्रयत्न फसला. कारण, लयबद्ध हालचाल करणे त्यांना अखेरपर्यंत साधले नाही. इंग्लिश जंटलमन बनण्याचे गांधीजींचे वेड तीन महिने कायम राहिले व ते पुढे गेले. मात्र १९१३ पर्यंत उत्तमरीत्या शिवलेले पाश्चिमात्य शैलीचे कपडे वापरणे काही गांधींनी सोडले नाही.

‘ते' मनसोक्त शाकाहारी जेवण
निग्रहाने शाकाहार स्वीकारल्यानंतर एक दिवस गांधी लंडन व्हेजिटेरियन सोसायटीचे सदस्य बनले. या निमित्ताने त्यांचे सामाजिक वर्तुळही विस्तारले. तिथे त्यांचा व्यवसायाने वकील असलेले जोसिए ओल्डफिल्ड आणि डॉ. थॉमस अॅलिनसन यांच्याशी परिचय झाला. सोसायटीत जसे मतभेद होत, तसेच खूप राजकारणही चाले. स्वत:च्या मतांबाबत आग्रही होत चाललेले गांधीजीसुद्धा कधीकधी एखाद्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या भांडणात ओढले जात. एकदा, अगदी अपघाताने म्हणता येईल, अशा रीतीने गांधीजी पराभूतांच्या गटात खेचले गेले. डॉ. अॅलिनसन यांना त्यांच्या गर्भनिरोधक साधनांना असलेल्या पाठिंब्यामुळे सोसायटीतल्या महत्त्वाच्या समितीतून डच्चू देण्याच्या घाट घातला गेला होता. परंतु त्या क्षणी गांधीजींनी अॅिलनसन यांच्या बाजूने आपले मत दिले. व्यक्तिश: गांधीजी गर्भनिरोधक साधनांच्या विरोधात होते, परंतु त्या क्षणी त्यांची भूमिका अशी होती की, या मुद्द्यांचा समाजाच्या उद्दिष्टांशी काहीएक संबंध नाही. अपेक्षेप्रमाणे गांधीजी आणि अॅलिनसन यांचा पराभव झाला. पुढे व्हेजिटेरियन सोसायटी सोबत काम करत असतानाच एका परिषदेदरम्यान गांधीजींच्या आयुष्यात त्यांच्या ब्रह्मचर्याची परीक्षा घेणाराही प्रसंग उद‌्भवला. अर्थातच त्यातून त्यांनी निग्रहाने मार्गही काढला.
व्हेजिटेरियन सोसायटीची बेजवॉटर शाखा सुरू झाली. ओल्डफिल्ड शाखेेचे अध्यक्ष आणि गांधीजी शाखेचे सचिव बनले. या शाखेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी सर एडविन अरनॉल्ड यांची सन्माननीय नियुक्ती केली. अरनॉल्ड हे त्या काळी लेखकांमधले मोठे प्रस्थ होते. त्यांनीच भगवद‌्गीतेचे स्वैर भाषांतर केले होते. हिंदू धर्माचे तत्त्वज्ञान सांगणारा हा ग्रंथ भारतात नव्हे, भारतीय भाषांत नव्हे तर लंडनमध्ये तेव्हा पहिल्यांदा गांधीजींनी नजरेखालून घातला होता. याचे वैषम्य त्यांच्या बोलण्यातून त्यानंतर अनेकदा आलेही होते. नंतर अरनॉल्ड यांच्या बुद्धाच्या जीवनावर आधारित लाइट ऑफ एशियाचे, आणि ज्याचे वर्णन त्यांनी "विच वेंट स्ट्रेट टु माय हार्ट' असे केले होते, त्या येशू ख्रिस्ताच्या "सेरमॉन ऑन द माऊंट'चेही लंडनमध्ये असताना वाचन केले होेते. गांधीजींच्या पुढील आयुष्यातील अलौकिक प्रवासाची बीजे लंडनच्या त्यांच्या या वास्तव्यात रुजली होती.
बातम्या आणखी आहेत...