आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपेक्षांचे ओझे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बारावीचे वर्ष सुरू झाले आणि नेहमी हसतखेळत असणारा छोटू एकदम उदास आणि घाबरा-घाबरासा दिसायला लागला. घरच्यांना तर कुणालाच काही कळत नव्हते. छोटूच्या आईची अवस्था तर अर्धा जीव गेल्याप्रमाणे झाली होती. तिला समजेना की, नेहमी खूप भूक लागली म्हणून मागे-मागे आरडा-ओरडा करणारा छोटू धड जेवतही नाहीए आणि कुणाशी काही बोलतही नाहीए. काय करावं काहीच कळेना.


दोन दिवसांपासून छोटूची हीच अवस्था होती. त्यात काहीही सुधारणा झालेली नव्हती. मग आईने त्याला डॉक्टरांकडे नेलं. आईने डॉक्टरांना सर्व हकीकत व्यवस्थित सांगितली. डॉक्टरांनी सर्व आवश्यक त्या तपासण्या केल्या. तर सर्व रिपोर्ट नॉर्मल आले. हा कसलं तरी टेन्शन घेतोय, असं डॉक्टरांनी सांगितलं आणि भूक लागावी म्हणून एक टॉनिक लिहून दिलं.
डॉक्टरांकडे जाऊन आल्यानंतरही छोटूच्या या अवस्थेमध्ये काहीच फरक पडलेला नव्हता. घरातील सर्व लोक अतिशय टेन्शनमध्ये होते. आणि घरातील वातावरण दु:खी झालेलं होतं. ज्या कॉलनीत छोटू राहत होता त्याच कॉलनीत देशपांडे सरांचं घर होतं. देशपांडे सर मानसशास्त्राचे प्राध्यापक होते. ही गोष्ट त्यांच्याही लक्षात आली होती की, सात ते आठ दिवसांपासून छोटू बाहेर खेळायलाही दिसला नाही आणि तो आपल्याला भेटलाही नाही. काय कारण असावे म्हणून ते बघण्यासाठी देशपांडे सर थेट त्याच्या घरीच गेले.


घरातील वातावरण बघून आणि छोटूची अवस्था बघून देशपांडे सरांना तर मोठा धक्काच बसला. ते तडक छोटूच्या रूममध्ये गेले. बघतात तर काय, छोटू उदास चेहरा करून छताकडे एकटक बघत विचार करत बसला होता. कुणी आपल्याजवळ येऊन बसलंय याचंदेखील त्याला भान नव्हतं. सरांनी थोडासा धक्का दिल्यानंतर छोटू एकदम दचकून उठला आणि समोर देशपांडे सरांना बघितल्यानंतर तर काय करावे त्याला काहीच कळेना. मग ‘काय झालंय?’ या सरांच्या प्रश्नावर त्याने थोडासा विचार केला. देशपांडे सरांना छोटूला बोलतं कसं करायचं हे चांगलंच ठाऊक होतं. मग सात-आठ दिवसांपासून गप्प असलेला छोटू एकदम बोलू लागला.


तो म्हणाला, ‘सर, तुम्ही मला अगदी लहानपणापासून ओळखता. अगदी पहिलीपासून नववीपर्यंतचं शिक्षण मी आनंदात पूर्ण केलं. मला कसलीही भीती वाटली नाही. एवढंच काय, तर दहावीचा पेपर हा बोर्डाचा पेपर असतो आणि तो अगदी अवघड असतो, अशी अफवा मी ब-याच मित्रांकडून ऐकली. तरी तेही मला अवघड वाटलं नाही. सर, मी मनापासून सांगतो तुम्हाला, अभ्यासाबद्दल मला कसलीही भीती वाटत नाहीये. पण या कुटुंबातील व्यक्तींच्या वेगवेगळ्या अपेक्षांपुढे मी अगदी खचून गेलोय. आई म्हणते, 75% पेक्षा जास्तच गुण मिळायला हवेत. पप्पा म्हणतात, 80% पेक्षाही जास्त पाहिजेत. भाऊ म्हणतो, माझ्या मित्राला 90% मिळालेत, तुलाही मिळायलाच हवेत. आणि बारावीचं वर्ष हे अतिशय महत्त्वाचं वर्ष आहे. हे एकच वाक्य माझ्या मनावर सारखंसारखं मारलं जातंय. आणि डॉक्टर व्हायचंय ही आईची अपेक्षा, तर इंजिनिअर व्हायचं ही पप्पांची अपेक्षा व भाऊ तर काही तरी वेगळंच सांगतोय. पण माझी स्वत:ची काय अपेक्षा आहे, याचा विचार कुणीच केलेला नाही. मला कुठल्या क्षेत्रात आवड आहे, असं मला आजपर्यंत कुणीच विचारलं नाही. एवढं सगळं सांगत असताना छोटूने बरेच अश्रू गाळले होते. आणि ख-या अर्थानं तो मोकळं बोललाय असं वाटू लागलं होतं. एवढं सगळं ऐकल्यानंतर देशपांडे सर शांत झाले होते. त्यांनाच कळत नव्हतं की, आता काय करावं.


असाच काहीसा अनुभव आपण सर्वांनाच थोडा तरी आलेला असतो. खरोखरच मुलांकडून एवढ्या गोष्टींची अपेक्षा करण्याअगोदर त्याची काय इच्छा आहे, या गोष्टींचा विचार प्रत्येक पालकाने करायला हवा. आणि घरच्यांनी मुलांकडून अपेक्षा जरूर ठेवावी; पण ती वेगवेगळी नसावी. कुठली तरी एकच इच्छा असावी की जे मुलाचंही ध्येय असेल आणि मुलालाही त्यामध्ये आवड असेल. ‘बारावीचं वर्ष हे अगदी महत्त्वाचं वर्ष आहे,’ यांसारख्या वाक्यांची त्याच्या मनावर सारखीसारखी आदळआपट करून हे शिक्षण म्हणजे काही तरी खूपच अवघड गोष्ट आहे, असा त्याचा समज करून देऊ नये, अशीच माझी इच्छा आहे.