आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पण मला वाटलं की...

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ती ‘अशी कशी’ वागू शकते? तो ‘असं कसं’ करू शकतो? त्यांना कळत ‘कसे नाही’? जितकी माणसे, तितक्या भूमिका, तितके मतप्रवाह, तितके भ्रम, तितका भ्रमनिरास. माझ्या वाटण्याच्या नि त्याच्या वाटण्याच्या मधलं अंतर काही पार करता येत नाही नि कळतं एकच की आपलं वाटणं फक्त आपलं असतं... आपली मतं फक्त आपली असतात. एकत्र कुटुंबात वाढलेला मुलगा जेव्हा लग्नानंतर स्वतंत्र राहायचं ठरवतो, तेव्हा आई-बाबा म्हणतात, पण आम्हाला वाटलं होतं की... मुलालाही हा बदल आई-बाप ‘समजून घेतील’ असं वाटलेलं असतंच... कुठे तरी हिशेब मांडला जातोच केलेल्या प्रेमाचा, लावलेल्या जिवाचा. आणि मग आपल्याला अपेक्षित उत्तर कानी पडलं नाही की, आधी काळजाला बोचतं नि नंतर इगोचा पापड मोडतो.


पुलं नि सुनीताबाई खूप अफलातून सहजीवन जगले एकमेकांना समृद्ध करणारं. पण त्या सगळ्या प्रोसेसमध्ये सुनीताबार्इंनी स्वत:चं ‘वाटणं’ प्रयत्नपूर्वक बाजूला ठेवलं. सगळ्या शक्यतांचा हिशोब मांडत. त्याला त्याग वगैरे शब्द त्यांनी कधी वापरले नाहीत. आपलं वाटणं बाजूला ठेवण्याचा त्रास त्यांना झालाही, पण मिळालं तेही अलौकिक मिळालं हेही त्यांनी कायम मान्य केलं.


कणेकरांनी एका पुस्तकात म्हटलं आहे, घरात माणसं तीन आणि दोन चॉकलेट्स असताना मला नाहीच आवडत मुळी चॉकलेट, असं म्हणणारी व्यक्ती साधारणपणे आई असते. वाईट अशाचं वाटतं मला की, आपलं वाटणं ‘सहज’ किंव्हा ‘विचारपूर्वक’ बाजूला ठेवणाºया आई, मैत्रीण, बाबा, दादा, समजूतदार असे जे जे सगळेच, त्यांनी कायमच तसे करायचे असते, असा प्रघात पडून जातो.


अशांच्या ‘वाटण्याचं’ सोनं व्हायच्याऐवजी ते हरवतं तेव्हा वाईट वाटतं कारण ते वाटणं फक्त त्यांच्यापुरतंच नसतं, ते त्याच्यापेक्षा मोठं असतं, ते कसं बरोबर हे कुठे सिद्ध करत बसणार? सीतेला अग्निपरीक्षा द्यावी लागली असेल तेव्हा अग्निपरीक्षेतून जाण्याचे काही वाटले नसेल पण आपल्या ‘असण्या’वर प्रश्न उमटल्याचे चरे उमटले असणार नक्की.
चित्र रंगवायची खोड बहुधा जन्मत: असतेच माणसाला. मला ती गोष्ट सतत आठवत राहते त्या गवळणीची. डोक्यावर दुधाची चरवी नेताना ते दूध विकून घेतलेली अंडी, अंड्यांच्या कोंबड्या, कोंबड्या विकून मग पुढे शेळ्या करता करता चरवी फुटते आणि सगळं ‘वाटणं’ वाहून जातं...’


सर आली धावून, मडके गेले वाहून सारखी अनेक स्वप्नं वास्तवाच्या तडाख्यात वाहून जातात. आणि वाहून गेलेल्या स्वप्नातली गोष्ट कधीही जास्त सुंदर असणार असते... ‘आजच्यापुरतं जगूयात’ हा विचार बहुतेक अशा फुटक्या मडक्यांनी शिकवलेला असतो. आई मला नेहमी म्हणते की तुम्हाला लागलं तर आम्हाला वाईट वाटेल, पण तुमचं दुखणं नि वेदना नाही वाटून घेता येऊ शकत नं... मग ज्याचं त्याचं आपलं आपलं वाटणं असताना कशाला एकत्र जगायचा, सोबतीचा अट्टहास असेल माणसाला याचंही कुतूहल वाटत राहतं.


‘वाटणं’ परस्परांवर अवलंबून असलेलं असं छान आधाराचं, सोबतीचं, कधी हट्टाचं, कधी समजुतीचं, कधी माझं, कधी तुझं, कधी त्यांचं असं असायला हवं होतं नाही? सगळ्यांना आवडेल, आनंद होईल, पटेल असा एखादा शेवट असायला हवा होता नै गोष्टीचा. कधी तरी मी लिहिणारे एखादी अशी गोष्ट. कागदावर तरी सगळ्यांचं ‘वाटणं’ खरं झालं नि सगळे सुखाने नांदू लागले असं करता येतंय का ते पाहते.