आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुरवंट ते फुलपाखरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


गेल्या आठवड्यात टाचेच्या दुखण्याने मला अगदी हैराण केले होते. वेदनाशामक औषधालाही वेदना दाद देत नव्हत्या. टाच दुखते म्हणत म्हणत काम नेहमीप्रमाणे पार पाडत होते. त्यामुळे घरातील लोकांना गांभीर्य वाटत नव्हते. एकेदिवशी मुलाला जेवायला वाढण्यासाठी उठताना अशी काही जोराची कळ आली की शरीराचा जाणारा तोल आधारांनी सावरला. हे माझ्या नववीतल्या मुलाने पाहिलं आणि तो इतका भावनिक झाला की तो सतत म्हणत होता, ‘आई, एवढं दुखतंय तर विश्रांती नाही का घ्यायची?’ त्याला अपराध्यासारखं वाटतं होतं. नंतर माझी टाच दुखायची थांबेपर्यंत त्याने खूप काळजी घेतली. औषध हातात आणून देत होता. जेवढी जमतील तेवढी तो कामं करून मला विश्रांती देत होता. त्याला थोडंसं बरं वाटत नसलं तरी जवळच बस, दवाखान्यात जाऊ नकोस, म्हणणारा मुलगा माझी काळजी घेण्याइतपत मोठा झालाय ते मला समजलेच नव्हते.

चार-पाच वर्षांनंतर ज्यांनी त्याला पाहिलंय, त्यांचा एकच प्रश्न असतो केवढा ताडा-माडासारखा वाढलाय. त्याच्याशी बोलताना आम्हाला आमची मान उंच करून बोलावे लागते. बाबांनी स्वत:साठी नवीन बूट, चप्पल आणली की, घालून बघून ‘बाबा, मला अगदी परफेक्ट बसतात’, असे म्हणून कधीमधी वापरायची अप्रत्यक्ष परवानगी घेतो. सिग्नलवर गाडी झेब्रा क्रॉसिंगच्या पुढे आली तर मागे घ्यायला लावतो. कितीही मागचे हॉर्न वाजवीत असले तरी सिग्नल पडल्याशिवाय जायचे नाही, अशी ताकीद असते. घरातील किंवा सार्वजनिक ठिकाणी गरज नसताना लाइट, पंखे चालू असतील तर बंद करतो. दिवाळी फटाक्यांविना साजरी करतो.

मलाही बाबांसारखी दाढी करायची म्हणून रडणारा आता स्वत:ला दाढी-मिशा येतायत म्हणून मनात खट्टू होतोय. सध्या आरशात पाहण्याचे आणि कपडे बदलण्याचे प्रमाण वाढलेले आहे. मॉलमध्ये भेटलेल्या वर्गमैत्रिणीने हाय केले तर हळूच माझ्याकडे पाहून लाजून हाय करतो. कॉम्प्युटर आणि मोबाइल शिकण्यासाठी त्यालाच मी गुरू केला आहे, असा माझा लाजराबुजरा मुलगा नुसताच उंचीनं वाढला नाही तर तो उत्तम नागरिक बनण्याचा प्रयत्न करतोय. तो लहान असताना घर, दवाखाना, त्याचे आजारपण, असे सगळे निस्तरताना तो कधी एकदा मोठा होतोय, असे वाटायचे. आता मोठा झालाय म्हणून कौतुक वाटते, तर काही वर्षांनी शिक्षण आणि नंतर नोकरीसाठी पिल्लू बाहेर पडणार म्हणून रुखरुखही वाटते. सुरवंटाचे फुलपाखरात रूपांतर झाले ते कळलेच नाही.