आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जन्मत: अपंग रिझवानची ‘चित्र’कथा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रिझवान जन्माला आला तेव्हा सुदृढ होता. डॉक्टरांनी त्या इवल्याशा जिवाला हातात उलटं धरलं आणि त्याच्या पार्श्वभागावर हलकीशी चापट मारली. लहानग्या रिझवानने मोठ्याने रडून अपेक्षित प्रतिक्रिया दिली आणि सा-यांना आनंद झाला. पण इथूनच तर रिझवानच्या खºया कहाणीला सुरुवात झाली. झालं असं की, रिझवानला डॉक्टरांनी चापट मारली तेव्हा त्याच्या संपूर्ण शरीरात एक-दोन नव्हे, तर तब्बल 9 ठिकाणी हाडांना फ्रॅक्चर झाले. तेव्हा लक्षात आलं की रिझवानची हाडं जन्मत:च अत्यंत ठिसूळ आहेत. त्यामुळे आता त्याची योग्य वाढ होणार नाही. अतीव दु:खाचे सावट साºया घरादारावर पसरले. रिझवानच्या आईला तर काय करावे हेच कळेना. काही दिवसांनी रिझवानला पाहायला त्याचे अब्बू आले आणि रिझवानच्या नॉर्मल नसण्याविषयी त्यांना समजले. ‘अब क्या करे, ये बच्चे को मैं नहीं संभालुंगा.. ऐसे बच्चे को पालने में बडी शर्म आएगी’ असे सांगून ते रिझवानला आणि त्याच्या अम्मीला टाकून गेले.. कधीही न परतण्यासाठी.
बडोद्याला माहेरीच राहून रिझवानच्या आईने आपल्या मुलाचे संगोपन करायचे ठरवले. शाळेत घालायचा प्रश्न उभा राहिला, परंतु त्याला शाळेत दाखल करून घ्यायलादेखील लोक तयार नव्हते. सुदैवाने घराजवळच एक शाळा सुरू झाली. तिथले मुख्याध्यापक चमनलाल नाईक देवमाणूस होते. त्यांनी रिझवानच्या शिक्षणाचा प्रश्न चुटकीसरशी सोडवून टाकला. रिझवानची हाडं ठिसूळ असल्यामुळे आणि त्याच्या हातापायांची संपूर्ण वाढ झाली नसल्यामुळे सर्व बाबतीत परावलंबी असलेल्या रिझवानची बुद्धी मात्र कुशाग्र होती आणि संवेदनादेखील जागृत होत्या. गुजरातमध्ये 93 च्या सुमारास झालेला भूकंप टीव्हीवरून पाहत असताना रिझवानने आपल्या हातातल्या कागदावर दुसरं तिसरं कशाचं नाही तर भूकंपाचं चित्र काढलं. रिझवाननं निसर्गाचं पहिलं रूप रेखाटलं. तेही रौद्रच! रिझवानच्या हातातून उमटलेल्या त्या रेषा खरोखरीच विलक्षण बोलक्या होत्या. घरानजीकच्याच एका सामाजिक संस्थेतील कार्यकर्त्यांनी रिझवानचं ते चित्र पाहिलं आणि त्याच्यातील गुणवत्ता हेरली. स्वत: रिझवानची आईदेखील कलांमध्ये निपुण असल्याने त्यांच्यातूनच हे गुण मुलात झिरपले असावेत.
चित्रांच्या विश्वात रममाण होत असलेल्या रिझवानची आता एक नवी ओळख निर्माण झाली. ‘बालचित्रकार रिझवान’ म्हणून 2007 मध्ये त्याला बालश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आपल्या मनातल्या भावना कागदावर रंगांच्या साहाय्याने हुबेहूब रेखाटणाºया रिझवानला पुढच्याच वर्षी अर्थात 2008 मध्ये उपराष्ट्रपती हमीद अन्सारींच्या हस्ते ‘बेस्ट क्रिएटिव्ह चाइल्ड अवॉर्ड’ने पुरस्कृत करण्यात आले. त्या वेळी मीरा कुमार यांनी रिझवानला 2009 च्या स्वागतासाठी शुभेच्छापत्रे बनवून देण्यास सांगितले. ही शुभेच्छापत्रे बड्या बड्या मंत्र्यांपर्यंत पोहोचली आणि रिझवानच्या गुणवत्तेचे कौतुक झाले. नाशिकच्या व्ही. एन. नाईक शाळेमध्ये तो सध्या नवव्या इयत्तेत शिकत आहे. महादेव जगताप
यांच्याकडून चित्रकला, तर आरीफ सरांकडून अभ्यासक्रमाविषयी तो शिक्षण घेत आहे. भविष्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर बनू इच्छिणाºया रिझवानच्या आईसमोर आता त्याच्या महाविद्यालयीन शिक्षणाचे व चित्रकलेच्या पुढच्या शिक्षणाचे चित्र कसे रंगवावे हा प्रश्नच आहे.
इतके आघात होऊनदेखील हा चिमुरडा आणि त्याची आई म्हणते, ‘शिकवा नहीं किसी से, किसी से गिला नहीं, नसीब में नहीं था जो हमको मिला नहीं, ए खुदा तुझसे भी हमें कोई गिला नही.. ’