आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिं. वि. आठवणीतले अन् साहित्यातले...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

*चिं. वि. चे साहित्य चिरंतन, कारण ते निव्वळ विनोद-मनोरंजनच नसून जीवनासंदर्भातले तत्त्वज्ञान आहे :
मराठी वाङ्मयात विनोदी साहित्याचे दालन कोल्हटकर, गडकरी, जोशी यांनी समृद्ध केले आहे. विनोदी साहित्य के वळ विनोदासाठी, काही वेळाचे मनोरंजन करण्यासाठी नाही तर ते जीवनासंदर्भातले तत्त्वज्ञान आहे आणि गंभीरपणे आचरणात आणले पाहिजे, असा विचार सैद्धांतिक पातळीवर चिं.वि.जोशी यांनी मांडला. या विचाराला त्यांच्या अनुभवासह नामवंत लेखकांनी जी जोड दिली त्याचे दर्जेदार ,वस्तुनिष्ठ,कोणताही अभिनिवेश नसणारी, प्रामणिक साठवण पुस्तकाच्या रूपाने संध्या बोडस-काणे यांनी वाचकांना सादर केली आहे. ‘चिं. वि. साहित्यातले अन् आठवणीतले’, या पुस्तकाचे प्रकाशक कॉन्टिनेंटलने चिंविंच्या जीवनाचा समग्र आढावा घेत हे पुस्तक स्मरणिका होणार नाही याची काळजी घेत किंवा संशोधनाचा कोणताही वर्ख न चढवत वाचकाला समग्र चिंवि माहीत व्हावेत या दृष्टिकोनातून प्रकाशित केले आहे. संध्या बोडस-काणे आणि कॉन्टिनेंटलच्या देवयानी अभ्यंकर यांचे यासाठी अभिनंदन केले पाहिजे.
* चिं.वि. साहित्यातले अन् आठवणीतले, वाचलेच पाहिजे :
पंचवीस वर्षांपूर्वी नव्या दमाने वाचणारा वाचक किंवा त्यापूर्वीचा अनुभवी, सरावलेला वाचक चिंविंच्या लिखाणाशिवाय पुढे जाऊ शकत नव्हता. ओसाड वाडीचे देव, चिमणचारा, एरंडाचे गु-हाळ, चिमणरावाचे च-हाट, विनोद चिंतामणी, चौथे चिमणराव या पुस्तकांना किंवा यापैकी कोणत्याही पुस्तकाला स्पर्श न केलेला वाचक विरळाच. तत्कालीन जीवनशैली, सामाजिक परिस्थिती, सामाजिक आर्थिक, नैतिक मूल्याची जपवणूक, मध्यमवर्गीयांच्या आशा-आकांक्षा त्या पूर्ण करताना होणारी दमछाक आणि त्यातून झालेली विनोद निर्मिती चिंविंच्या लिखाणातून सहज येते. सामान्यांची सुख-दु:खे समजणा-या अनुभवणा-यांना ती आपली वाटली, पण त्याकडे चिं. वि. ज्या सहज. निर्मळ प्रवृत्तीने पाहातात त्यामुळे त्यातले दु:ख कमी होऊन चेहेरा हसण्यानी भरून जातो. माझ्यासारखा कोणीतरी या जगात आहे याचं एक समाधान आणि सहअनुभूतीची जाणीव वाचकाला होऊन त्या वाचनाचा तो आनंद घेतो. चिंविंच्या लिखाणात हे मानसशास्त्र, बारकावा कोठून आला ? या प्रश्नाच्या शोधासाठी चिं.वि. साहित्यातले अन् आठवणीतले हे पुस्तक वाचले पाहिजे.
*पालीचे अभ्यासक चिं. वि. आणि सयाजीराव महाराजांवर प्रमाणभूत चरित्राचे लेखन :
चिंवि केवळ विनोदी साहित्य लेखक आहेत हा वाचकांचा समज आहे. कारण, त्यांच्या मानसपुत्रांनी, चिमणरावांनी जो झेंडा लावला तो त्यांच्या साहित्याचा मापदंड ठरला. सुमारे 22 कथासंग्रह, चार कादंबरीचे लेखन, माणुसकी हा निबंधसंग्रह, चार भाषांतरांची पुस्तके, चार नाटके, बालसाहित्य त्यात सहा पुस्तके, रुपकासारखा प्रकार, तीन चरित्र त्यात सयाजीराव महाराजांवरच अत्यंत प्रमाणभूत चरित्र जोशींनी लिहिले आहे. या शिवाय प्रवासवर्णन, ऐतिहासिक, इतर पुस्तके यात इंग्रजी शिष्ठाचारासारखे पुस्तक आहे तर पाली भाषेचे ते गाढे अभ्यासक असल्याने त्यांनी पालीभाषेतील जातक कथा, बुद्धसंप्रदाय आणि शिकवण, सद्धम्मम्पकासिनी या पुस्तकाचे तीन खंड प्रकाशित केले आहे. म्यॅन्युअल ऑफ पाली हा इंग्रजीत लिहिलेला ग्रंथ त्यांचे पालीभाषे वरील प्रेम दर्शवणारा आहे.
* बहुआयामी, तत्त्वज्ञानाचा
पाया न सोडता केलेले लेखन :
चिंविंच्या ग्रंथसंपदेचा ऊहापोह करण्याचे कारण म्हणजे इतके बहुआयामी लेखन तत्त्वज्ञानाचा पाया न सोडता केल्याने विनोदाकडेही त्यांनी विशेष गांभीर्याने पाहिले. बडोदा येथे संस्थानचे चीफ रेकॉर्ड ऑफिसर या अत्यंत उच्च पदावर असताना त्यांनी ज्ञान लालसेपोटी बडोदा कॉलेज येथे प्राध्यापक म्हणूनही काम केले. चिं.वि. साहित्यातले अन् आठवणीतले या पुस्तकातून त्यांचे अधिकारी असणे, प्राध्यापक असणे, गृहस्थ असणे आणि साहित्यिक असणे हे ठळकपणे अधोरेखित होते. ज्या त्या वेळी त्या त्या पदाला त्यांनी न्याय दिला, पण लेखन करताना या सगळ्या अनुभवाचा संचय त्यांनी अत्यंत खुबीने केला. त्यांनी या संदर्भात विनोदाचे तत्त्वज्ञान सांगणारा नितांत सुंदर लेख लिहिला आहे.
प्राध्यापक अर्थात शिकवण्याची आवड असल्यामुळे शैक्षणिक वाटणारा हा लेख जोशींच्या लिखाण शैलीमुळे कंटाळवाणा तर नाहीच पण सहज सुंदर, महत्त्वाची माहिती देऊन जातो. सुमारे 37 पानांच्या आणि 1961 मध्ये लिहिलेल्या या लेखात हसायला का येते. ते किती प्रकारचे आहे, विनोदाचे प्रकार, विडंबन, हास्यनिर्मितीचे उपाय सुचवताना त्यांनी विनोदाला जीवनात दुय्यम स्थान का, असा प्रश्न उपस्थित केला आहे. विनोदाचे प्रकार सांगताना त्यांनी उदाहरणांची रेलचेल केली आहे.
* चि.विं. च्या स्वभावाचे पैलू उलगडले :
या पुस्तकात त्यांच्या स्वभावाचे पैलू उलगड्याचे काम प्रो. वि.पां.दांडेकर, गंगाधर गाडगीळ, विजय तेंडुलकर, विद्याधर पुंडलिक, गो.मा.पवार, शांता शेळके आदींनी केले आहे. या लेखात चिमणराव अपरिहार्यपणे डोकावत राहतात. चिमणरावांचा जन्म, त्याच्या कुटुंबाचा जन्म, अनेक पात्राच्या छटा या सगळ्याचा विचार ही मंडळ तर करतातच, पण संकलक संध्या बोडस-काणे याही त्याबद्दल माहिती देतात. संस्थानातले किस्से या अनुषंगाने येत राहतात.
* नारळीकरांच्या प्रस्तावनेसह, प्रभावळकर, बाळ कर्वे आदींच्या चिमणरावनिर्मिती काळातील आठवणी :
या पुस्तकाला ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. जयंत नारळीकर यांची प्रस्तावना आहे. जोशी त्यांचे आवडते लेखक. जोशींच्या साहित्यकृती रुपेरी पडद्यावर आल्या तसेच दूरदर्शनवर आल्या. मालिकांच्या इतिहासातही चिमणराव ही पहिली मालिका. त्यामुळे त्याचे कौतुक साहजिकच होते, पण त्यात काम करणारे कलाकारही कालांतराने सुप्रसिद्ध होत गेले. या मंडळींनी ही केवळ भूमिका न साकारता त्यांचे विनोदाचे तत्त्वज्ञान साकारले. दिलीप प्रभावळकर,बाळ कर्वे, विजया धुमाळे यांनी चिमणरावांच्या निर्मिती काळच्या आठवणी सांगितल्या आहेत. नातेवाईक, परिचितांच्या आठवणी त्यांचे व्यक्तिमत्त्व अधिक स्पष्ट करण्यासाठी उपयोगी ठरतात.
आजच्या धावपळीच्या जीवनात हसणे विसरून गेलो आहोत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. विनोदी मालिकांमध्ये विनोदाच्या जागी कृत्रिमरीत्या हसण्याचे आवाज जोडले जातात. यानंतर प्रेक्षक हसतो. अशा काळात चिंविंचे हे लिखाण हास्याचा निर्मळ झरा आपल्या चेहे-यावर फुलवतो. संस्थानिकांच्या गंमती सांगताना, सर्वसामान्यांच्या आयुष्याला करुण विनोदाची झालर कशी असते तेही सांगतो. दिसणे, वागणे गंभीर असले तरी दहशद नाही. शांत दिसणा-या चेहे-यामागे विनोदाचे रसायन दडलेले आहे. या स्वभावाचे अनेक किस्से आपल्याला वाचायला मिळतात. चिंविंचे बंधू म.वि.जोशी यांनी असे अनेक किस्से दिले आहेत. यातून त्यांचा आयुष्याकडे पाहाण्याचा दृष्टिकोन समजतो. हजरजबाबी,
पुस्तकातून संस्थानिकाचे जीवन, तत्कालीन समाजरचना समजते. उदा. रत्नागिरीला जाण्यासाठी कोल्हापूरहून बैलगाडी करावी लागायची :
नेमकेपणाने चूक दाखवणारे पण चूक दाखवली त्याचे मन न मोडणारे हा त्यांचा व्यक्तिविशेष दिसतो. खरं तर या पुस्तकातून त्याकाळची जीवनपद्धती, समाजरचना समजून येते. रत्नागिरीला जाण्यासाठी कोल्हापूरहून बैलगाडी करावी लागायची आणि त्याचा प्रवास तीन दिवस चालायचा, बडोदा संस्थानात मोठ्या शासकीय अधिकारी वर्गाला मेजवानी दिली जायची त्याची पद्धत, शिष्ठाचार जुने पुणे त्याच्या आठवणी या सगळ्यात रमणे किंवा आज ती परिस्थिती ताडून पाहणे हे सगळेच विलोभनीय आहे. जुनी छायाचित्रे, जोशींचे हस्ताक्षर यामुळे पुस्तक जसे परिपूर्ण होते तसेच लेखकाचा सर्वंकष वेधही घेता येतो. अत्यंत शास्त्रशुद्ध मांडणीने, आक्रमक न होता आग्रहीपणे जोशींनी विनोदी लेखनाचा प्रवास केला. हे येथे लक्षात येते.