आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सी. ए. करताना...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चार्टर्ड अकाउंटंट होणं, ते स्टेट्स मिळवणं, लोकांचे हिशेब चोख ठेवणं आणि रग्गड पैसा कमावणं हे बहुतेक विद्यार्थांचं स्वप्न असतं. अर्थात यात काही गैर नाहीच. पण सी. ए. करण्यापूर्वी या कोर्समधील समज गैरसमजांविषयी माहिती घेणं गरजेचं आहे. सी. ए. चा अभ्यासक्रम हा वाटतो तेवढा सोपा निश्चितच नसतो. संपूर्ण खोलवर जाऊन, एखाद्या विषयाची व्याप्ती समजावून घेणं, त्याची खोली पाहणं यासाठी प्रचंड अभ्यासाची आवश्यकता असते. सी. ए. सारख्या करिअरची सुरुवात बारावी कॉमर्सनंतर लगेचच करता येऊ शकते. कॉमन प्रोफिशियन्सी टेस्ट (सीपीटी) उत्तीर्ण होणं त्यासाठी आवश्यक आहे. बारावी कॉमर्सनंतर सीपीटी उत्तीर्ण होऊन पुढे आयपीसीसीसाठी प्रवेश मिळवता येऊ शकतो. आयपीसीसी म्हणजे इंटिग्रेटेड प्रोफेशनल कॉम्पिटन्सी कोर्स ! सी. ए. होण्यासाठीची पहिली पायरी म्हणायला हवी. बेसिक अकाउंटस, मर्कंटाइल लॉ, इकॉनॉमिक्स, टॅक्सेशन सारख्या विषयांचा मूलभूत परंतु व्यापक अभ्यास होतो.

कॉस्ट अकाउंटन्सी (सी.डब्ल्यू.ए.) आणि कंपनी सेक्रेटरी (सी.एस.) विद्यार्थीसुद्धा सी.ए. चा अभ्यासक्रम करू शकतात. मात्र त्याच्यासाठी आठ महिन्यांचे स्टडी कोर्स पूर्ण करावाच लागतो. त्यानंतर मात्र ते पहिल्यांदा आय.पी.सी.सी.साठी पात्र ठरू शकतात. सी. ए. चा अभ्यासक्रम हा केवळ पुस्तकीच नाहीये तर प्रात्यक्षिके किंवा प्रत्यक्ष ट्रेनिंगचादेखील इथे अंतर्भाव असतो. बदलणार्‍या काळाप्रमाणे अद्ययावत गोष्टींचे ज्ञान मिळवण्यासाठी सी. ए. इन्स्टिट्यूटने फार दूरदिृष्टकोन ठेवून कोर्समध्ये काही कडक बदल आणि नियम केलेले आहेत. शंभर तासांचा आय. टी. टेनिंग (इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी) तसेच पस्तीस तासांचा ओरिएंटेशन प्रोग्राम हा अत्यावश्यकच आहे. दोन्ही ट्रेनिंग प्रोग्राम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी प्रॅक्टिकल ट्रेनिंगसाठी पात्र ठरू शकतात आणि प्रॅक्टिकल ट्रेनिंग सुरू करण्यासाठीच आणखी एक अट म्हणजे आयपीसीसीचे दोन्ही किंवा पहिला ग्रुप पास होणं. केवळ दुसरा ग्रुप पास होऊन चालत नाही हे मात्र लक्षात ठेवायला हवं.

कॉमर्समधून ज्या विद्यार्थ्यांनी बॅचलर्स किंवा मास्टर्स पूर्ण केलेलं आहे असे विद्यार्थीदेखील सी.ए. साठी निश्चितपणे प्रवेश घेऊ शकतात. फक्त इथे दोन महत्त्वाच्या अटी असतात. एक म्हणजे बॅचलर्स किंवा मास्टर्स हे कॉमर्समधून कमीत कमी पंचावन्न टक्क्यांहून अधिक गुणांनी झालेलं असावं आणि अकाउंटस, लॉ, इकोनॉमिक्स, ऑडिट, फायनान्शियल मॅनेजमेंट, टॅक्सेशन अशा पैकी कोणत्याही तीन विषयांचे शंभर मार्कांचे पेपर्स असायला हवेत. यू.जी.सी. प्रमाणित विद्यापीठं तसेच दूरस्थ शिक्षण विभागाकडून मिळवलेलं प्रमाणपत्रसुद्धा ग्राह्य धरले जाऊ शकते.
कॉमर्स व्यतिरिक्त अन्य शाखांमधून ज्या विद्यार्थ्यांनी बॅचलर्स किंवा मास्टर्स केलेले आहे अशा विद्यार्थ्यांसाठी गुणांची अट ही कमीत कमी साठ टक्के आहे. असे पात्र कॉमर्स किंवा अन्य शाखेचे विद्यार्थी थेट आय.पी.सी. साठी रजिस्ट्रेशन करू शकतात. तसेच शंभर तासांचे आय.टी. ट्रेनिंग व पस्तीस तासांचा ओरिएंटेशन प्रोग्रामसुद्धा पूर्ण करू शकतात.

आठ महिन्यांनंतरच्या स्टडी कोर्सनंतर हे विद्यार्थी तीन वर्षांच्या प्रॅक्टिकल ट्रेनिंगसाठी पात्र ठरू शकतात. वरकरणी हा कोर्स खूप कमी खर्चाचा किंवा सोपा वाटला तरी तसं नाहिये. इथे संपूर्ण भारतातील निकाल हा अवघा तीन ते सात टक्क्यांचा असतो. म्हणजे केवळ इतके टक्के विद्यार्थीच पास होतात. शिवाय तीन वर्षांच्या प्रॅक्टिकल ट्रेनिंग काळात तुम्हाला अत्यल्प स्टायपेंड (विद्यावेतन) दिलं जातं त्यातून जेमतेम प्रवास खर्च निघू शकतो. तेव्हा हा तीन वर्षांचा आर्थिक तोटाही सहन करावा लागतो. शिवाय टॅक्सेशन, लॉ आणि अन्य पुस्तके तसेच क्लासेसही खर्चिक असतात. ह्या सर्वच गोष्टींचा बारकाईने आणि साधक-बाधक विचार सी.ए. करताना होणे गरजेचे आहे.
(डेमो पिक)