आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पूर्वी कर्करोग म्हटले की ‘असाध्य’ हे विशेषण त्यापुढे सहज चिकटायचे; इतके की ‘कॅन्सर’ हा शब्द उच्चारणेही जवळजवळ निषिद्ध होते; परंतु आता विज्ञानाच्या व औषधांच्या संशोधनाने यात खूपच फरक पडला आहे. किमोथेरपीच्या साहाय्याने कर्करोग तज्ज्ञ आता असाध्य अशा या रोगाला बरे करण्यास पुष्कळ प्रमाणात यशस्वी होत आहेत. ‘किमोथेरपी’ (रसायनकर्म चिकित्सा) म्हणजे कोणतीही शस्त्रक्रिया नाही किंवा रुग्णांवर केलेला भयानक द्रव्यांचा मारा नव्हे. ‘किमोथेरपी’ म्हणजे वेगवेगळी औषधे, रुग्ण प्रकृतीनुसार व आजारानुसार वेगवेगळ्या प्रमाणात सलाइनवाटे देणे. औषधांच्या या विशिष्ट चिकित्सेने आरंभीच्या स्थितीतला कर्करोग पूर्ण बरा करता येतो, तर प्रगत स्थितीतल्या कर्करोगास नियंत्रणात ठेवता येते.
‘किमोथेरपी’ ही पेशींवर कार्यरत असल्याने त्याचे काही औषधेतर परिणामसुद्धा होतात व त्याची तीव्रता रुग्णाच्या प्रतिकार क्षमतेनुसार बदलते. केस गळणे, उलट्या होणे, भूक मंदावणे, ताप येणे, बद्धकोष्ठता, तोंड येणे, असे परिणाम सर्वसाधारणपणे किमोथेरपी घेतलेल्या रुग्णांमध्ये दिसून येतात. त्याचे नियोजन व निर्णय घेण्यासाठी कर्करोग तज्ज्ञांची एक स्वतंत्र शाखा आहे व त्यातील तज्ज्ञांना ‘वैद्यकीय कर्करोग तज्ज्ञ’ (मेडिकल ओन्कोलॉजिस्ट) असे म्हणतात. हे वैद्यकीय कर्करोग तज्ज्ञ रुग्णाची किमोथेरपीच्या आधी व नंतर पूर्ण तपासणी तर करतातच; त्याचबरोबर काही विशेष रक्तचाचण्या करून रुग्णाची शरीर यंत्रणा योग्य स्थितीत असल्याची खात्री करतात. या चाचण्यांवर महत्त्वाचे निर्णय अवलंबून असतात. किमोथेरपीची किती मात्रा रुग्णास द्यावी व अशा किती रसायन कर्म चिकित्सेची रुग्णास आवश्यकता आहे, याचे दोन पैलू आहेत. त्यातील पहिला भाग म्हणजे, रुग्णास सहन होऊ शकेल अशा पद्धतीने औषधांची मात्रा निश्चित करणे आणि दुसरे म्हणजे, औषधांच्या मात्रेत कमी-जास्त न करता औषधेतर दुष्परिणामांचे काळजीपूर्वक व्यवस्थापन करणे.
या दोन्ही पैलूंत, आपल्या ज्ञान व अनुभवाच्या आधारे वैद्यकीय कर्करोग तज्ज्ञ पारंगत असतात; परंतु कर्करोग उपचार पद्धतीतल्या या महत्त्वाच्या व आधुनिक पद्धतीबद्दल ब-याच रुग्णांना माहिती नसते. अनेक प्रसंगी काही रुग्णांची दिशाभूल केली जाते. कर्करोग म्हटल्यावर शल्यचिकित्सकाकडे गाठीची शस्त्रक्रिया केली की उपचार संपले, अशी ब-याच लोकांची समजूत असते. त्यामुळे अनेक रुग्ण वैद्यकीय कर्करोग तज्ज्ञांकडे- मेडिकल ओन्कोलॉजिस्टकडे- येतच नाहीत. अशा हलगर्जीपणामुळे आजार बळावून रुग्ण दगावण्याची शक्यता कित्येक पटीने वाढते. रुग्णांनी वेळेवर व योग्य रीतीने योग्य वैद्यकीय कर्करोग तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच कर्करोगापासून मुक्ती मिळवावी, यासाठीच हा सर्व खटाटोप.
(लेखक हे मुंबईतील प्रख्यात टाटा कॅन्सर रुग्णालयाचे माजी वैद्यकीय अधिकारी. आता मुंबईतल्या विविध नामांकित रुग्णालयांशी संलग्न आहेत.)
dr.vikas.ostwal@gmail.com
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.