आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हृदयरोगाचा वाढता धोका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धूम्रपान केल्यामुळे तसेच तंबाखू, जर्दा, गुटखा यासारखी तंबाखूजन्य व्यसने केल्यामुळे हृदयावर अनिष्ट परिणाम होतो. हृदयास लागणा-या प्राणवायूची गरज आणि प्रत्यक्ष पुरवठा यामध्ये अंतर पडते. त्यामुळे प्राणवायूचीही कमतरता भरून काढण्यासाठी हृदयास जास्त वेगाने काम करावे लागते. यामुळे हृदयाचे स्पंदन वाढते. जवळजवळ सर्व रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. त्यामुळे रक्तदाब वाढतो.


रक्तदाब वाढल्यामुळे हृदयास अधिक ताकदीने स्पंदने करावी लागतात. रक्तातील प्राणवायू कमी होऊन त्याची जागा कर्बवायू घेत असतो. तंबाखूतील निकोटिनमुळे कोलेस्टेरॉल व चरबी आम्ल यांचे रक्तातील प्रमाण वाढते. कर्बवायू व निकोटिनमुळे रक्तवाहिन्यांच्या आवरणात कोलेस्टेरॉल आणि चरबी आम्ल जमा होत राहते. तसेच रक्तातील प्लेटलेट रक्तपेशींची एकमेकींना आणि रक्तवाहिन्यांना आंतरभागात चिकटण्याची क्षमता निकोटिनमुळे वाढते. या सर्वांमुळे रक्तात गाठी बनतात व रक्तवाहिन्यांना आंतरआवरणात चिकटतात. त्यामुळे रक्तवाहिन्यांची जाडी वाढून आतील पोकळी कमी होत जाते. अशा कमी झालेल्या पोकळीतून रक्ताच्या गुठळ्यांमुळे रक्तवाहिनी बंद होते. अर्थातच, अशा बंद झालेल्या रक्तवाहिन्यांतून रक्तप्रवाहास अडथळे निर्माण होतात. यातून हृदयाची रक्तवाहिनी बंद पडल्यास, हृदयविकाराचा झटका येतो. मेंदूची रक्तवाहिनी बंद पडल्यास पक्षाघाताचा झटका येतो. शक्ती असेपर्यंत हृदय ताण घेऊनही काम करते, नंतर त्याला सूज येते. त्याला हार्ट फेल्युअर (cardiac failure) म्हणतात. एकंदर हृदयरोगामुळे होणा-या मृत्यूंपैकी 25 टक्के मृत्यूंना तंबाखूजन्य व्यसनेच कारणीभूत आहेत.