आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काळजी किडनीची कशी घ्याल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

*डायबिटीस रुग्णांसाठी...
डायलिसिस चालू असलेल्या 30-40 टक्के रुग्णांमध्ये किडनी निकामी होण्याचे कारण डायबिटीस असते. आहार, गोळ्या, इन्सुलिनचा वापर करून उपाशीपोटी साखर 110 च्या कमी असणे व जेवणानंतरची 180 च्या कमी असणे अतिशय महत्त्वाचे आहे. लघवीत प्रोटीन जाणे हे किडनीवर परिणाम असल्याचे प्रथम लक्षण असते. म्हणून सहा ते 12 महिन्यांत एकदा मायक्रोअलनुमिन्युरियाची तपासणी करणे गरजेचे असते. चेह-यावर व पायावर सूज येणे, लघवीत प्रोटीन जाणे, रक्तदाब वाढणे, रक्तातील साखरेचे प्रमाण अचानक कमी होणे, डोळ्याच्या पडद्यावर डायबिटीसचा परिणाम असणे ही किडनी खराब होण्याची व भविष्यात किडनीचा गंभीर आजार असण्याची महत्त्वाची लक्षणे आहेत. वेळेवर उपाययोजना केल्यास एसीईआय व एआरबी गटातील औषधी वापरून किडनी खराब होण्याची गती कमी करता येते.
*उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी ...
रक्तदाब वाढलेला राहिल्यास किडनीतील नसांवर दाब वाढून परिणाम होऊ लागतो. लघवीत प्रोटीन जाणे सुरू होते. रक्तातील युरिया वाढू लागेल म्हणून रक्तदाब 140-80 च्या खाली राहणे व लघवीत प्रोटीन असणा-यांसाठी 125-80 च्या खाली राहणे अत्यंत महत्त्वाचे असते. यासाठी औषधी नियमित घेणे, महिन्यातून कमीत कमी दोनदा बीपी तपासणे आवश्यक असते. किडनीवरील प्रभाव ओळखण्यासाठी व त्याची उपाययोजना तत्काळ सुरू करण्यासाठी वर्षातून एकदा लघवीतील प्रोटीन व रक्तातील क्रिएटिनीन तपासणे गरजेचे आहे.
*मुतखडा असलेल्या रुग्णांसाठी...
24 तासांतील पिण्याच्या पाण्याचे प्रमाण 3.5 ते चार लिटर असावे. जेणेकरून 24 तासांत दोन ते 2.5 लिटर लघवी झाली पाहिजे. यामुळे नवीन खडा तयार होणे व असलेला खडा मोठा होत नाही. मुतखड्यामुळे लघवीला अडथळा होत असल्यास त्वरित उपचार करणे आवश्यक आहे. घरातील इतरांनादेखील मुतखडा असल्यास आनुवंशिक कारणे तपासावीत.
*औषधी गोळ्यांमुळे होणारे किडनीचे नुकसान...
वेदनाशामक औषधी, काही अ‍ॅँटिबायोटिक्स, देशी औषधे, भस्म इत्यादीमुळे किडनीला इजा होते. ज्या रुग्णांना किडनीचा आजार आहे, त्यांना अशी औषधे धोकादायक असते. म्हणून अनावश्यक, क्षुल्लक कारणासाठी, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधी घेण्याच्या प्रवृत्तीला आळा घातला पाहिजे. औषधींचा डोस तत्कालीन असलेल्या किडनीच्या कार्याप्रमाणे कमी करून डॉक्टरांच्या मार्गदर्शनाप्रमाणे द्यावा.
*क्रोनिक किडनी रुग्णांसाठी सूचना...
वेळेवर औषधी, रक्तदाबावर नियंत्रण, साखरेवर नियंत्रण, किडनीच्या डॉक्टरांकडे वेळेवर तपासणी केल्यास किडनीचे नुकसान होण्यावर आळा घालता येतो. डायलिसिस व किडनी प्रत्यारोपण यासारखे उपाय ब-याच वर्षांसाठी टाळता येऊ शकतात. आठवड्यातून दोनदा रक्तदाब तपासून त्याचा तक्ता करणे, रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी लाभदायक असते. अशा रुग्णाने ताप, कुठल्याही प्रकारचा जंतुसंसर्ग, मूत्रमार्गातील अडथळा, प्रोस्टेट ग्रंथी, शरीरातील पाण्याची कमतरता, मलेरिया, टायफाइडचा त्वरित उपचार करणे, किडनीचे कार्य टिकवून ठेवण्यासाठी अत्यावश्यक असते.
*किडनीचे आनुवंशिक आजार...
पॉलिसिस्टेक किडनी हा आनुवंशिक आजार असून आई किंवा वडिलांपैकी एकाला असल्यास त्यांच्या 50 टक्के अपत्यांना तो होतो. म्हणून 20 वर्षे वयानंतर काही त्रास नसला तरी रक्तदाब, लघवी, सोनोग्राफी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करणे आवश्यक आहे. अल्पोर्ट सिंड्रोम यासारखे आजार आनुवंशिक आहेत. त्यात लहान वयात कमी ऐकण्यास येणे व किडनीचे आजार असतात. यांचे प्राथमिक अवस्थेत निदान झाल्यास विशिष्ट उपचार करून किडनीचे नुकसान होण्यास आळा घालता येतो. मलेरिया, डेंगी, लेप्टोस्पायरा, डायरिया, जंतुसंसर्ग आदीचे त्वरित निदान, अचूक उपचार अत्यावश्यक असतो. अन्यथा किडनीस कायमची इजा होऊन बसते.
*एकच किडनी असणा-यांसाठीची काळजी...
जन्मत: 0.1 टक्के लोकांना एकच किडनी असते. एक किडनी प्रत्यारोपणासाठी दान केलेली असल्यास किंवा एक किडनी, मुतखडा, कॅन्सरने खराब झाली असल्यास एकाच किडनीवर कार्य चालू असते. अशा लोकांनी पाण्याचे जास्त प्रमाण ठेवणे, वेदनाशामक औषधी न घेणे, रक्तदाबाची तपासणी व त्यावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे असते.
*प्रोस्टेट ग्रंथीचा त्वरित उपचार...
प्रोस्टेट ग्रंथीचा आकार वाढत्या वयाप्रमाणे वाढत जातो. 60 वर्षांनंतर तो त्रास जास्त जाणवतो. यामुळे मूत्राशयातील लघवी पूर्ण निघत नाही. यामध्ये जंतुसंसर्ग होण्याची शक्यता असते. याचे वेळेवर निदान करून अचूक उपचार केल्यास किडनीचे नुकसान टाळले जाऊ शकते.