आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘कला’ क्षेत्रामधील करिअर...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गलेलठ्ठ पुस्तके, किचकट गणिते, लक्षात ठेवायला कठीण अशी विधाने किंवा फॉर्म्युले, नापासांची चिंता, पुढच्या वर्गाचे दडपण, स्पर्धा परीक्षांचे ओझे या सगळ्यामध्ये आपला विद्यार्थी मित्र अडकलेला असतो. अडथळ्यांची शर्यत पार करेपर्यंत कुठे ना कुठे ‘करिअर’ विषयक त्याला संभ्रम निर्माण होतो आणि ‘पदरी पडलं आणि पवित्र झालं’ याच समजुतीवर आपला मित्र ‘करिअर’ च्या मागे धावत राहतो. हे असं का घडतं बरं? कारण अगदी सोपं, सरळ आहे. मानसिकता! करिअर म्हणजे काहीतरी क्लिष्ट, गुंतागंतीचं किंवा तत्सम काहीसं असतं किंवा आयटी कंपन्यांमधील नोकरी किंवा ‘पॅकेज’ म्हणजेच करिअर असतं अशा समजुतीपायी (अभ्यासाच्या दृष्टीने) सर्वसाधारण वर्गात मोडणारा आपला विद्यार्थी मित्र हवालदिल होतो आणि आपल्याला मोठ्या कंपनीत नोकरी नाही किंवा आपलं काही ‘पॅकेज’ नाही. आपण चक्क नालायक आहोत असंच त्याला वाटत राहतं. अशा सर्व विद्यार्थी मित्र-मैत्रिणींसाठी ही खुशखबर आहे. म्हणजे बघा ना, नुकतीच आपण दहीहंडी साजरी केली. खिलाडू वृत्ती, नेतृत्व, संघभावना, शारीरिक-मानसिक ताकद अनुभवली, कित्येक मित्रांनी तर चक्क काही महिने आधीच सरावाला सुरुवात केलेली असणार ... अशा गुणी मुलांना का बरं चांगलं करिअर करण्याचा अधिकार नसावा?


मित्रा, खुश्शाल ‘आर्ट्स’ हे क्षेत्र निवड जर तुझ्यामध्ये कल्पकता, नेतृत्व, धडाडी, चिकाटी आणि संयम असेल तर! नृत्य, नाट्य, चित्र, शिल्प, हस्त, विणकाम, भरतकाम यांसारख्या कितीतरी गोष्टी कलाक्षेत्रामुळे साधल्या जाऊ शकतात. वरीलपैकी प्रत्येक कला हे एक स्वतंत्र करिअरचे दालन आहे ही सगळ्यात मोठ्ठी आनंदाची बाब आहे. पण तूर्तास मात्र आपण चित्रकलेवर किंवा हस्तकलेवरच भर देऊयात. लक्षात आलंच असेल ना मित्रा - कारण गणपती बाप्पाचे आगमन होत आहे. चौसष्ट कला आणि चौदा विद्यांचं अधिपत्य असणा-या गणरायाला आपण कुठल्याही गोष्टीच्या प्रारंभी ‘नमन’ करतो, वंदन करतो व आशीर्वाद मागतो. मग कलेमधलं करिअर जर बाप्पांच्या आगमनापासूनच सुरू केलं तर काय हरकत आहे?


शाळेत असताना ज्यांनी एलिमेंट्री ड्रॉइंगसारख्या परीक्षा दिल्या आहेत, चित्रकलेमध्ये, हस्तकलेमध्ये ज्यांना विशेष रुची आहे अशा गुणी कलाकारांसाठी भारतभरामध्ये विविध ठिकाणी ‘कला महाविद्यालये’ उपलब्ध आहेत. प्रत्येक संस्थेच्या पात्रतेविषयीच्या अटी व निकष निरनिराळे असू शकतात. पैकी सामाईक परीक्षा मात्र असू शकतात. अनेकांमधून काहीच जण निवडायचे असल्यामुळे या परीक्षेची तयारी मात्र करायलाच हवी. उत्तम निरीक्षणशक्ती, आकलनशक्ती, एकाग्रचित्त आणि अफाट, अपार कल्पनाशक्ती ही कला क्षेत्रामधील करिअरची मागणी असते. इथे तुम्हांला गणितातील काही संज्ञा ठाऊक नसल्यास फारसे बिघडत नाही; पण कलेविषयीची ओढ, जिज्ञासा, कल्पनाशक्ती कामाला येते.


एकूणच काय तर प्रत्येक करिअरची मागणी वेगळी असते. इथे हुशार किंवा मठ्ठ किंवा चांगलं किंवा वाईट असं काहीच नसते. आज गणेशोत्सवासारख्या सणांच्या माध्यमातून अंदाजे चार-पाचशे कोटी रुपयांची उलाढाल होतच असते. गणेश मूर्तिकारांना विशेष मागणी आलेली आहे. ठिकठिकाणी ‘गणेश चित्र शाळा’ उभारलेल्या आपल्याला दिसताहेत. अत्यंत आकर्षक, सुबक, लोभस गणेशमूर्ती बनविणे हे उत्तम चित्रकाराला चांगलं जमू शकतं. त्यातही पुन्हा गादीवर विराजमान झालेले किंवा लोडाला टेकून बसलेले, उभ्याने आशीर्वाद देणारे बाप्पा अशा कितीतरी रुपात आपल्याला भेटतात ते या कलाकारांमुळेच. एरव्ही संपूर्ण सृष्टी ज्याने रचली त्याच गणरायाला फक्त कलाकार घडवतो. त्यामुळे या कलेला आणि कल्पकतेला जगभरात कुठेच आव्हान नाही. आजकाल ‘इको फ्रेंडली’ कन्सेप्टमुळे शाडूचा वापर करून मूर्ती केल्या जातात. मूर्तीवरील रंगकाम हे तर आणखी आव्हानात्मक आणि कठीण काम म्हणायला हवं. एरव्ही बाजारातून फिरताना आपल्याला अंदाज येणार नाही कदाचित, पण ‘करिअर’ म्हणून गांभीर्याने पाहिल्यास खरोखरीच चित्रकारांची, मूर्तिकारांची आपण पाठ थोपटल्याशिवाय राहणार नाही. या गणेशोत्सवांमधूनच कितीतरी कलाकारांना व्यासपीठ मिळतं. आज नामांकित आर्ट डायरेक्टर कोणे एके काळी गणेशोत्सवांमधूनच त्यांच्या करिअरविषयीची चुणूक दाखवत होते. त्यामुळे मुंबई, गोवा, कर्नाटक, चेन्नई, गुजरात, पंजाब, दिल्ली, बनारस यासारख्या विद्यापीठांतून बाहेर पडल्यावर एक करिअरचा मोठ्ठा कॅन्व्हासच जणू तुमच्यापुढे उभा राहतो. तुमच्या कुंचल्यातून त्या कॅन्व्हासवर अचूक काम करणं हे कौशल्याचं काम आहे. बॅचलर ऑफ फाइन आर्टसारखी पदवी कल्पक तरुणांना खूप चांगल्या संधी देऊ शकते. बारावीपर्यंतचं शिक्षण मात्र इथे महत्त्वाचं मानलं जातं. मग बारावीनंतर बॅचलर्स आणि मास्टर्स इन फाइन आर्ट्ससारखे कोर्सेस करता येतात. शिवाय डिप्लोमा व सर्टिफिकेट कोर्सेस आहेतच. यानंतर विद्यार्थी फ्रीलान्सिंग काम करू शकतो किंवा एखाद्या तज्ज्ञाच्या हाताखाली त्याचा सहायक म्हणून कामाचा अनुभव घेऊ शकतो किंवा स्वत:चा स्टुडिओ उभा करू शकतो.


शिवाय नामांकित प्रकाशन संस्था, जाहिरात कंपन्या तसेच फॅशन जगतामध्येही प्रचंड संधी उपलब्ध आहेत. हल्ली जागतिकीकरणामुळे किंवा स्पर्धेमुळे आपली कला कौशल्यपूर्वक बाजारामध्ये लोकांपर्यंत आणणं हेसुद्धा एक महत्त्वाचं अंग बनलेलं आहे. म्हणजे इथे मार्केटिंग स्किल्ससुद्धा महत्त्वाच्या आहेत. कलाक्षेत्रातील इतर करिअरविषयी आणि आणखीनही ‘जरा हटके’ वाटणा-या संधीविषयी, स्वयंरोजगार, उद्योजकतेविषयीही आपण भाष्य करणार आहोतच. तूर्तास गणेशोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!