आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरक्षित गर्भारपण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मातृत्व म्हणजे परमेश्वराने स्त्रीला दिलेले एक महान वरदान होय. आई होणे ही प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात सुखद संवेदना असते, परंतु हे आईपण ज्या प्रसूतीच्या माध्यमातून आईला प्राप्त होते, ती प्रसूती व संपूर्ण नऊ महिन्याचे गर्भारपण, म्हणजे आईचा जणू एक पुनर्जन्मच असणारा एक खडतर व संयमाने भरलेला प्रवास असतो.
या संपूर्ण गर्भारपणाच्या कालावधीत गर्भिणीला काळजी घ्यावी लागते, ती स्वत:ची व आपल्या
गर्भाशयात वाढणा-या नव्या जीवाची ही काळजी गर्भाच्या सुरक्षित वाढीसोबतच सुरक्षित प्रसूती कशी होईल, याचीसुद्धा असते.


आई होणार ही गोड बातमी कुटुंबात समजल्याबरोबर, सर्वजण त्या गर्भिणीची विशेष काळजी घेऊ लागतात, मग काय, जवळपासची माहेर-सासरची मंडळी, नातलग, मित्रमंडळी आणि परिचित सारेच जण आपापल्यापरीने काळजीबाबत सल्ले देत असतात. खरोखर, सुरक्षित गर्भारपणाच्या व प्रसूतीच्या दृष्टिकोनातून काही सूचनांचे पालन गर्भिणीने करणे, अतिशय महत्त्वाचे असते, जेणेकरून गर्भारपण तर व्यवस्थित जातेच, पण पुढे जाऊन होणारी प्रसूतीदेखील सुखरूप होते याचकरिता, सर्वसाधारणपणे पुढील गोष्टींकडे कटाक्षाने लक्ष द्यावे.
लहान-लहान बाबींचे पालन केल्यास निश्चितच गर्भारपण व प्रसूती अडचणीची अथवा ‘कष्टदायक’ न ठरता, एक ‘सुखद स्वप्न’ घडेल.
शरीर व मन
संतुलित ठेवा
* डॉक्टरांकडे नियमितपणे, दिलेल्या तारखेनुसार तपासणीसाठी जावे.
* पूर्वी आपणास काही व्याधी असेल आपण काही औषधोपचार घेतले असतील, अथवा सध्या काही उपचार सुरू असतील तर त्याची पूर्ण माहिती आपल्या डॉक्टरांना द्यावी.
* रक्तस्राव, पोट दुखणे, कंबर दुखणे, लघवीला त्रास आदी कोणतेही लक्षण कमी अथवा अधिक असो ताबडतोब आपण ही बाब आपल्या डॉक्टरांच्या निदर्शनास आणून द्यावी.
* डॉक्टरांच्या परवानगीशिवाय कोणतेही औषध स्वत:हून घेऊ नका.
* डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य ती औषधी, आहार, व्यायाम, योगासने ध्यान धारणा करून शरीर व मन संतुलित ठेवा.
फास्ट फूड
टाळा...
* अति जड वजन उचलू नये.
* रोज संपूर्ण दिवसभरात एकूण सहा ते आठ तास झोप अवश्य घ्या.
* मुबलक मात्रेत पाणी प्या.
* बाजारातील आयते खाद्यपदार्थ (फास्ट फूड), बेकरीचे पदार्थ, कोल्ड ड्रिंक्स टाळा.
* मलावरोध (मलावष्टंभ) होणार नाही या गोष्टीची काळजी घ्या.
* सकस व संपूर्ण आहार घ्या.
* आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या, ताजी फळे यांचा जास्त समावेश असू द्या.
* एकाचवेळी भरपेट खाण्यापेक्षा थोडे थोडे अधिक वेळेस खा.
* यशावकाश विश्रांती घ्या, अतिश्रम करू नका.
* अवघडलेल्या स्थितीत बसणे, उठणे, झोपणे असल्या कोणत्याही विषम स्वरूपाच्या हालचाली करू नका.
* शरीरास अडचणीचे नसणारे, सैलसर कपडे वापरावेत, तंग घट्ट कपडे अजिबात वापरू नका.
* उंच टांचाचे बूट, चप्पल वापरू नका.
* वैद्यकीय सल्ल्याशिवाय परस्पर एक्स-रे, सोनोग्राफी असल्या तपासण्या करू नका.
* वाकून बसणे टाळा, ताठ बसण्याचा प्रयत्न करा.
* वैद्यकीय सल्ल्यानुरूप, नियमित पायी फिरणे सुरू ठेवा.
* अनावश्यक प्रवास टाळा.
* मन प्रसन्न व आनंदी राहील, अशा स्वरूपाची वातावरण निर्मिती ठेवण्यासाठी सतत प्रयत्नशील रहा.
* ताणतणावापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा, अनावश्यक चिंता, काळजी करू नका.
* गर्भधारणेच्या व प्रसूतीनंतरच्या सूतिकावस्थेत (अर्थात जोपर्यंत बाळ आहाराच्या दृष्टिकोनातून, मातृस्तनांवर-आईच्या दुधावर अवलंबून असते, तोपर्यंत) कटाक्षाने पाणी उकळून गार केलेले प्यावे, शक्यतो दूषित पाण्यामुळे होणा-या संसर्गजन्य व साथीच्या आजारांपासून दूर राहता येईल.