आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यटनाचा करिअर-मार्ग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतात येतात दरवर्षी ४० लाख पर्यटक
भारतात दरवर्षी ४० लाखांपेक्षा अधिक पर्यटक येतात. त्यामुळे भारतातही या क्षेत्रामध्ये व्यवसाय करण्यासाठी खूप संधी उपलब्ध झाल्या आहेत. ट्रॅव्हल एजन्सीज, हॉटेल, गाइड, हवाई प्रवासाची सोय करणारे एजंट इत्यादी अनेक रोजगार आणि व्यवसाय या क्षेत्रामध्ये उपलब्ध झाले आहेत.

बोलका स्वभाव हवा, मुलींनाही मोठी संधी
आपला देशच नव्हे तर परदेशी फिरायला जाणं, तिथली ठिकाणं पाहणं ही गोष्ट काही नवीन राहिली नाही. मात्र परक्या ठिकाणी जायचं म्हणजे तिथे जाण्याची, राहण्याची, खाण्या-पिण्याची व्यवस्था असं सगळंच बघावं लागतं. अशा वेळी एखाद्या ट्रॅव्हल एजन्सीला ती जबाबदारी दिली की आपण अगदी निश्चिंत राहतो. गेल्या काही वर्षांपासून ट्रॅव्हल अँड टुरिझमचा व्यवसाय भरभराटीला आला असून पर्यटन मार्गदर्शकांची संख्या वाढली आहे. मुलींनाही या क्षेत्रात भरपूर संधी आहे. अशा या क्षेत्राची थोडक्यात माहिती..

परदेशी टुर्स वाढल्या : ट्रॅव्हल अँड टुरिझमचा व्यवसाय गेल्या काही वर्षापासून भरभराटीला आला आहे. पर्यटक आता केवळ स्वत:च्या देशातच फिरण्याऐवजी परदेशी फिरण्यासाठी जास्त उत्सुक असतात. त्यामुळे अशा देशी आणि परदेशी पर्यटकांना त्यांच्या टूरचे व्यवस्थितरीत्या नियोजन करणाऱ्या व्यावसायिक संस्थांची आणि व्यक्तींची गरज मोठ्या प्रमाणावर असते, जे त्या पर्यटकांना नवे काही तरी दाखवतील आणि त्यांची ट्रिप अधिक आनंददायी बनवतील. भारतात दरवर्षी ४० लाखांपेक्षा अधिक पर्यटक येतात. त्यामुळे भारतातही या क्षेत्रामध्ये व्यवसाय करण्यासाठी खूप संधी उपलब्ध झाल्या आहेत. ट्रॅव्हल एजन्सीज, हॉटेल, गाइड, हवाई प्रवासाची सोय करणारे एजंट इत्यादी अनेक रोजगार आणि व्यवसाय या क्षेत्रामध्ये उपलब्ध झाले आहेत. विशेष म्हणजे मुलींनादेखील या क्षेत्रात रुची असेल तर व्यवस्थितरीत्या अभ्यास करून स्वत:च्या कौशल्यावर या क्षेत्रात त्या वेगळे स्थान निर्माण करू शकतात. लोकांशी बोलायला अर्थात बोलका स्वभाव असणाऱ्या, नवीन गोष्टींची माहिती देण्याची आवड असणाऱ्या व्यक्ती या व्यवसायासाठी पात्र ठरतात.

टुर ऑपरेटर्स व काही हंगामी काम : पर्यटकांना हव्या त्या ठिकाणी नेणे, तिथे त्यांच्या राहण्याची, खाण्या-पिण्याची व्यवस्था करणे आणि प्रेक्षणीय स्थळांचे पर्यटन सुखकर होण्याची व्यवस्था करणं ही कामं टूर ऑपरेटर्स करत असतात. ही कामं हंगामी असतात.

संस्था : या क्षेत्राशी संबंधित अभ्यासक्रमांची सोय आता सगळ्याच विद्यापीठांमध्ये केली जात आहे. मुंबई, गोवा, पुणे या विद्यापीठांत या ट्रॅव्हल अँड टुरिझमशी संबंधित अभ्यासक्रम आहेत. काही विद्यापीठांत तर पदव्युत्तर पदवीचीही सोय आहे. औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात तर या विषयाचा फार जुना अभ्यासक्रम आहे. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाच्या स्कूल ऑफ सोशल सायन्स या संस्थेत पत्राद्वारे पदव्युत्तर पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याची सोय करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी अँड टुरिझम (गुरगाव), हेरिटेज इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल अँड टुरिझम (आग्रा), अवदेश प्रताप सिंग युनिव्हर्सिटी (मध्य प्रदेश), डिपार्टमेंट ऑफ टुरिझम – एचएनबी गढवाल युनिव्हर्सिटी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॅव्हल अँड टुरिझम मॅनेजमेंट (मध्य प्रदेश) अशा ठिकाणी या विषयावर आधारित विशेष अभ्यासक्रम चालवले जातात.

अभ्यासक्रम : अंडर ग्रॅज्युएशन : डोमेस्टिक टूर मॅनेजमेंट (पदवी)

पोस्ट ग्रॅज्युएशन :
>एमबीए इन टुरिझम (पदव्युत्तर)
>पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन ट्रॅव्हल अँड टुरिझम(पदव्युत्तर)

वर्ल्ड टूर मॅनेजमेंट : एमबीए इन इंटरनॅशनल टुरिझम बिझनेस

नोकरीच्या संधी : यावर अभ्यास केल्यावर तुमच्या कौशल्यानुसार समोर अनेक संधी उपलब्ध होतात. त्यातील काही संधी म्हणजे बुकिंग एजंट, टूर ऑपरेटर, बँकिंग, टुरिस्ट गाइड, हॉलिडे कन्सल्टंट इत्यादी.
१ बुकिंग एजंट : पर्यटनासाठी एखाद्या ठिकाणी जायचं म्हणजे पहिलं काम असतं ते गाड्यांच्या तिकिटाचं किंवा गाडीचं बुकिंग करणं. रेल्वे, बस, एअरलाइन्स किंवा खासगी गाड्यांचे बुकिंग करून देण्याचं कार्य बुकिंग एजंट करून देत असतात. कित्येक वेळा पर्यटकांना केवळ हॉटेल बुकिंगचीच गरज असते, अशा वेळी हे काम बुकिंग एजंट करतात.

२ टूर ऑपरेटर : एखाद्या नवीन आणि कोणतीही माहिती नसलेल्या ठिकाणी पर्यटक फिरायला जात असतात. तिथल्या ठिकाणांविषयी योग्य माहिती नसल्यामुळे त्याचे नियोजन न करता त्या ठिकाणी फिरणं कठीणच होतं. अशा वेळी टूर ऑपरेटरकडून त्या ठिकाणी कोणत्या वेळी, कुठे फिरणे? कोणतं ठिकाण पाहायला जाणं? अशा गोष्टींचं नियोजन करून घेतलं जातं. टूर ऑपरेटरचा रोजगार हा त्या ट्रॅव्हल एजन्सीवर आणि त्याने व्यवस्थापित केलेल्या टूरवर अवलंबून असतो.

३ बँकिंग : दूर दूर फिरणाऱ्या पर्यटकांना बँकिंग सोयीचीही आवश्यकता असते, म्हणून वेळोवेळी बँका पर्यटकांसाठी खास ऑफर्स जाहीर करतात. कित्येक बँकांनी त्यांच्या सेवांमध्ये पर्यटक सेवेचाही सामावेश केला आहे. त्यामुळे या क्षेत्राकडे वळणाऱ्या तरुणांना बँकेतही नोकरी मिळण्याची संधी आहे.

४ गाइड (मार्गदर्शक) : प्रेक्षणीय ठिकाणी त्या ठिकाणाची योग्य माहिती देण्यासाठी सरकारतर्फे किंवा खासगी संस्थेतर्फे मार्गदर्शक (गाइड) नेमले जातात. अशा गाइड्सना सरकारतर्फे परवानेही दिले जातात. शिवाय खासगी ट्रॅव्हलमधे जे गाइड कार्यरत असतात त्यांना ठरावीक रोजगारही दिला जातो.

५ हॉलिडे कन्सल्टंट : ग्राहकाला कोणत्या दिवसात कोणत्या ठिकाणी जावं? किंवा सहलीबाबतच्या इतर बाबींचं मार्गदर्शन करण्याचं कार्य हॉलिडे कन्सल्टंट करत असतो. हॉलिडे कन्सल्टंट हा खासगी आणि सरकारी दोन्ही क्षेत्रांमध्ये कार्य करू शकतो. हॉलिडे कन्सल्टंटचे वार्षिक उत्पन्न १,००००० ते ३,००००० इतकं आहे. याशिवाय तुम्ही खासगी ट्रॅव्हल एजन्सीसुद्धा सुरू करू शकतात. ज्यामध्ये पर्यटनासाठी लागणाऱ्या सगळ्या सेवा पर्यटकांना देता येतील. खासगी एजन्सीसाठी प्रत्येक पर्यटन स्थळाचीदेखील माहिती हवी.

कौशल्य
>टूर ऑपरेटरकडे संपूर्ण सहलीची जबाबदारी असते. त्या ठिकाणच्या प्रत्येक गोष्टींची माहिती हवी. कोणत्याही मौसमात फिरतीवर जाण्याची तयारी असावी लागते. त्याचप्रमाणे सुसंवाद साधण्याची कला, पर्यटकांची जबाबदारी असल्यामुळे आपत्कालीन प्रसंगी शांत डोक्याने विचार करून काम करण्याची तयारी टूर ऑपरेटरमध्ये असली पाहिजे. {गाइड म्हणून काम करण्यासाठी त्या ठिकाणाची सखोल माहिती हवी.

>हॉलिडे कन्सल्टंट म्हणून काम करण्यासाठी बुकिंग एजंट, जगभरातील प्रत्येक ठिकाणाची माहिती, समोरील ग्राहकाची मानसिक स्थिती समजून योग्य मार्गदर्शन करता आलं पाहिजे.

>स्वत:ची ट्रॅव्हल एजन्सी असेल तर प्रत्येक सहलीचं योग्य प्रकारे व्यवस्थापन करण्याचं कौशल्य असलंच पाहिजे.
(संकलन : राहुल रणसुभे, औरंगाबाद)