आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Challenges In Front Of Grandmother And Grandfather

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजी-आजोबांपुढचे आव्‍हान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाभारतातील युद्धाच्या सतराव्या दिवशी विजयासाठी उतावीळ झालेले युधिष्ठिर युद्धात जखमी झाले. रागावून त्याचा ठपका त्यांनी अर्जुनावर ठेवला. अर्जुनाचे पौरुष आणि त्याचे गांडीव निर्वीर्य आहेत, शत्रूचा पराभव करायला असमर्थ आहेत, अशा शब्दांत त्यांनी अर्जुनाची निर्भर्त्सना केली. याआधी अर्जुनाने प्रतिज्ञा केली होती की, जो कोणी त्याच्या गांडिवाची-धनुष्याची निंदा करेल त्याचा तो वध करेल. प्रतिज्ञा आठवून अर्जुनाने ज्येष्ठ बंधू युधिष्ठिरांचा वध करण्यासाठी तलवार उपसली आणि कृष्णाला म्हटलं, ‘मी प्रतिज्ञापालनाने बद्ध आहे’ हे ऐकून कृष्ण उद्गारला, इदानी पार्थ जानामि न वृद्धा : सेवितास्त्वया (कर्ण पर्व 69/16)


हे पार्था, तुझ्या बोलण्यावरून कळतंच की तू वृद्धांची सेवा केलेली नाहीस. याचा अर्थ असा : जर तू वृद्धांची सेवा केली असतीस तर त्यांच्या अनुभवातून बरेच शिकला असतास आणि या क्षणी (असा) बावचळून जाऊन असे अविचारी कृत्य करायला सज्ज झाला नसतास.

जीवन ही एक यात्रा आहे. या जीवनयात्रेत माणूस जसजसा पुढे जातो तसतसे पावलोपावली त्याला विविध प्रकारचे अनुभव येत असतात. हे सारे अनुभव स्वैच्छिक-स्वत:च्या इच्छेने घेतलेले नसतात. बरेचसे अनैच्छिक- इच्छा नसताना येऊन कोसळलेले असतात. या अनुभवांतून माणूस बाहेर पडतोच. कारण काळ क्षणभरही थांबत नाही. या अनुभवातून जाताना माणूस काय शिकतो हे महत्त्वाचे आहे. घटनेतून काही शिकणं झालं नाही तर तो अनुभव बनत नाही. वाढत्या वयाबरोबर माणसाचे अनुभव वाढायला हवेत. त्यामुळे जो कुणी वृद्धांची सेवा करतो तो वृद्धांच्या अनुभवांचा भाव घेऊन त्यातून शिकू शकतो. इथे कृष्णाच्या बोलण्याचा मथितार्थ असा की वृद्धांची सेवा केल्याशिवाय कित्येक गोष्टी शिकता येत नाहीत.

हा मुद्दा वृद्ध आणि तरुण दोघांसाठीही महत्त्वाचा आहे. जे वृद्ध केवळ वर्षामागून वर्षं जगले, जीवनातील घटनांमधून काहीही न शिकता बाहेर पडले, अनुभवातून ज्यांच्या हाती काही शिदोरी लागली नाही ते ख-या अर्थाने वृद्ध नाहीत. वृद्ध म्हणजे जो वाढला, विकसला, अनुभवाने संपन्न झाला असा माणूस! नाही तर तो म्हातारा झाला, आजोबा झाला, आणखी काही झाला, पण वृद्ध नव्हे.

वर ज्यांना अवृद्ध म्हटलंय ती पुढची पिढी. या पिढीला अजून अनुभवप्राप्ती व्हायची आहे. तरीही ही पिढी काही वेळा स्वत:ला अतिशय चलाख, हुशार समजते. त्यांच्यापाशी अपार माहिती असते आणि या माहिती भांडारालाच ते बुद्धी मानतात. माहिती भांडार गोळा करणं ही हुशारी आहे पण बुद्धिमत्ता नव्हे. अशा मंडळींनी किंवा या अवृद्ध पिढीच्या प्रतिनिधींनी वृद्धांकडून त्यांचे अनुभव यथामती, यथाशक्ती ग्रहण करायला हवेत. काही अनुभव तत्कालीन परिस्थितीमुळे आलेले असतील, आता ती परिस्थिती राहिली नसेल, तरी वृद्धांच्या अनुभवांचा पुढच्या पिढीने लाभ घ्यावा, कृष्णाचं हे सांगणं लक्षात ठेवण्यासारखं आहे - वृद्ध-अवृद्ध दोघांनी!
थोडं व्यक्तिगत सांगायचं तर मी नशिबाने माझ्या आईच्या आईवडिलांबरोबर बरीच वर्षे राहिलो. मी चाळिशीला आलो तोवर नानी होत्या. त्यामुळे त्यांचं पुष्कळसं बोलणं आठवतं. त्यांच्या सहज बोलण्यातून जो अनुभव प्रकट होई तो मला माझ्या आयुष्यात बोधपाठ ठरला आहे. नानींना अक्षरज्ञान मुळीच नव्हतं आणि विसाच्या पुढचे आकडे त्यांना मोजता येत नसत. तरीही त्यांच्या अनुभवातून आलेल्या शहाणपणाचा एक प्रसंग माझ्या कायमचा स्मरणात आहे.
एकदा घरातल्या स्त्रियांपैकी कुणीतरी स्वयंपाकघरातून बाहेर सांगून पाठवलं, ‘घरातलं तूप संपलंय, एक-दोन दिवसांत येणा-या-जाणा-यांकडून मागवून घ्यायला हवंय.’ हे शब्द ऐकून नानीमांनी लगेच बोलणारीला उद्देशून म्हटलं होतं, ‘सूनबाई, स्वयंपाकघरातली एखादी वस्तू संपली आहे असं कधीही म्हणू नये. फक्त तूप आणवून घ्यायचंय एवढंच म्हणावं.’ स्वयंपाकघर हे अन्नपूर्णेचं ठाण/ स्थान आहे, अन्नदेवता आपल्या स्थानावरून उठून गेली तर त्याला दुर्दैव म्हणतात, असे अशुभ शब्द गृहलक्ष्मीनं कधी उच्चारूही नयेत हा त्यांच्या बोलण्याचा आशय होता. तेव्हा हे फारसं कळलं नव्हतं, आज कळतंय.
आजच्या 40-45 या वयोगटातील ब-याच जणांनी आजी-आजोबांबरोबर राहण्याचा, त्यांच्या सहवासाचा अनुभव घेतला असेल. पण आजच्या विशीच्या आतील किशोरवयीन आणि बहुतेक बालके आजी-आजोबा हरवून बसले आहेत. त्यांच्या दृष्टीनं आजी-आजोबा ही week-end luxury असते, सुटीत भेटीला जाण्याची संधी असते किंवा सणासुदीला आजी-आजोबांच्या पायावर डोकं ठेवण्याचा, नमस्कार करून येण्याचा एक उपचार असतो.

आजी-आजोबांनी स्वत:च्या बाल्यावस्थेत आजी-आजोबांकडून जे मिळवलं होतं त्याचा आपल्या नातवंडांवर वर्षाव करणं आता अवघड होत चाललं आहे, सामाजिक परिवर्तनाचा मोठा अडसर मध्ये निर्माण झाला आहे. आजची किशोरवयीन मुले आजी-आजोबांकडे येतात तेव्हा त्यांनाही आजी-आजोबांच्या बोलण्यात फारसा रस नसतो. यामध्ये सर्वात अधिक नुकसान झालेला पक्ष आजी-आजोबांचा आहे. तरुण पिढीला तर आपलं काय नुकसान होतंय याची जाणच नाही.
घरोघरी तासन्तास चालू असलेला टीव्ही हे यामागचं एक मोठं कारण आहे. टीव्हीच्या पडद्यावर कार्टून फिल्मपासून रिअ‍ॅलिटी शोपर्यंतचं जे तण फोफावलं आहे त्यात लपलेल्या अदृश्य विषधराच्या फुत्कारांनी सगळं वातावरण कलुषित केलं आहे. उगवत्या पिढीवरील त्याच्या प्रभावाची भयानकता अजून आपल्याला पूर्णपणे कळलेली नाही. कौटुंबिक कलह, सर्व स्तरांवरची फसवणूक आणि अविश्वास, एकमेकांविरुद्ध रचली जाणारी षड्यंत्रे... हे सगळं मनोरंजनाच्या नावाखाली दाखवल्या जाणा-या मालिकांमधून ही मुलं पाहतात. अंग-प्रत्यंग हलवणं आणि काही अवयवांचं हिडीस प्रदर्शन म्हणजे नृत्य अशीच नव्या पिढीची कल्पना झाली आहे की काय कुणास ठाऊक! टीव्हीच्या पडद्यावर हे सगळं करणा-यांचा हेतू पैसा कमावणं एवढाच असतो आणि सत्याचा लवलेशही नसतो हे त्यांना पूर्णपणे माहीत असतं. दुर्दैवानं जी लहान आणि किशोरवयीन मुलं हे सतत पाहत असतात, त्यांच्यासमोर ‘हेच खरं जग आहे, आपणही असंच जगायचं आहे’, असा आदर्श निर्माण होतो. बलात्कार किंवा खुनाचं दृश्य ही मुलं वारंवार पाहतात, परिणामी त्यांच्या संवेदना बधीर होऊ लागतात. त्यांचे कुटुंबाशी असलेले भावबंध सैल होऊ लागतात. जे पालक भविष्याचं हे मूल्यांकन या घडीला, तत्काळ करू शकणार नाहीत त्यांना पुढे जे सहन करावे लागेल त्याला तेच जबाबदार असतील.

अनुवाद-प्रतिभा काटीकर, सोलापूर