आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आव्हान ड्रायव्हिंगचं

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही दिवसांपूर्वी माझ्या नणंदेचा, प्रियाचा, फोन आला. ‘वृषाली, आपण लवासा विमेन्स ड्राइव्हमध्ये भाग घेऊया? मुंबईहून लवासापर्यंत ड्राइव्ह करायचं आहे आणि मला नेव्हिगेटर (दिशादर्शक) म्हणून ड्रायव्हिंग येणारी, लायसन्स असणारी एक बरोबर हवी आहे.’ नुसतं प्रियाच्या बाजूला बसून इथून लवासापर्यंत जाऊन यायचे या कल्पनेत राहून मी तिला बिनधास्त हो म्हणून टाकलं आणि तिने आमचा ऑनलाइन फॉर्म भरला. तोपर्यंत संभाव्य धोक्याची कल्पना अजिबातच नव्हती. मी याच भ्रमात होते की आता एकदम 24 फेब्रुवारीला रॅली. त्याच्याआधी कधी तरी बोलावून मार्ग, नियम वगैरेची कल्पना देतील.
6 फेब्रुवारीला आमची निवड झाल्याचं कळलं आणि हुश्श झालं. कारण त्यासाठी एसएमएस वगैरे गोळा केले होते आम्ही. एवढा खटाटोप कामी आला. निवड झालीच आहे तर प्रकार तरी काय आहे म्हणून त्यांच्या साइटवर जाऊन पाहिलं. बापरे! फारच एक्सायटिंग प्रकार होता. मस्त सजवलेल्या गाड्या आणि बायका, सेलिब्रिटीजची हजेरी आणि कर्करोगाविषयी जागृती. यंदाचं पाचवं वर्ष असल्यामुळे Hi 5 ही थीम घेऊन ही रॅली होणार होती. 16 फेब्रुवारीला रॅलीबद्दल माहिती मिळणार होती एका बैठकीत. त्याआधी गाडीचे सर्व ओरिजनल पेपर्स, रॅली इन्शुरन्स वगैरे पाठवायचे होते. पण प्रियाची गाडी न्यायची असल्याने मी निवांत होते.


आणि अचानक 10 फेब्रुवारीला प्रियाचा फोन आला. ‘अगं, शनिवार, रविवार पूर्ण दिवस मी माझ्या गाडीचे ओरिजनल पेपर्स शोधतेय; पण कुठेच मिळत नाहीयेत. तुझी गाडी न्यावी लागणार. चालेल का?’ दुसरा पर्यायच नव्हता! त्यामुळे लगेचच सोमवारी सगळे पेपर्स घेऊन गेलो. इन्शुरन्स दुस-या दिवशी मिळणार होता.


आता माझी गाडी न्यायची म्हटल्यावर प्रियाला गाडीची प्रॅक्टिस तर व्हायला हवी आणि रस्ताही माहीत व्हावा म्हणून आम्ही 17च्या रविवारी लवासाला जाऊन यायचं ठरवलं. शनिवारी क्लिनिक बुडवून सकाळी बैठकीला गेलो. तिथे आम्हाला कार नं. 177 मिळाला होता. इतरही सामग्री मिळाली. त्यांनी आम्हाला सॅम्पल ट्युलिप म्हणून लिबर्टी सिनेमा परिसरातील पाच किमीचा नकाशा दिला होता व तो समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.


पहिल्यांदाच हे असं काही बघितल्यामुळे फारच गोंधळ माजला होता. तेव्हा गाडी नेली नसल्यामुळे पहिले 4-5 ट्युलिप पॉइंट्स पायीच फिरून साधारण नकाशाचा अंदाज घेतला आणि प्रचंड टेन्शन घेऊनच घरी आले. नेव्हिगेटर म्हणून सगळी जबाबदारी माझी होती. काळ-काम-वेग हे शाळेत शिकलेले त्रैराशिक प्रत्यक्षात वापरायची वेळ आली होती. रविवारी सकाळी 7.30 वाजता लवासाला जाऊन यायचं ठरलं होतं. जाताना प्रिया गाडी चालवणार आणि येताना मी. आतापर्यंत जेमतेम 30 किमी एवढीच माझ्या ड्रायव्हिंगची मजल असल्याने येताना एवढं एक्स्प्रेस हायवे, घाट एकदम मला जमेल का हेही आजमावून बघायचं होतं. रॅलीच्या दिवशी येताना मला गाडी आणायची होती त्याची प्रॅक्टिस म्हणून मी गाडीचं चाक हाती घेतलं आणि आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. माझ्या दृष्टीने पहिल्यांदाच घाटाचा रस्ता, एक्स्प्रेस-वेवरील भरधाव ट्रॅफिक अशा आव्हानांना तोंड देत संध्याकाळी 8 वाजेपर्यंत आम्ही मुलुंडला परतलो; पण एक वेगळंच समाधान मिळालं. थोडं टेन्शन कमी झालं. निदान लवासा कुठे आहे हे तरी माहीत झालं होतं. आता रॅलीच्या दृष्टीने इतर माहिती जमवायला सुरुवात केली. आधी दोन-तीन-चार वेळा जाऊन आलेल्या स्पर्धकांशी संपर्क साधला असता टेन्शन वाढवणा-या एकेक गोष्टी समजत गेल्या. मी मग गाडीच्या सर्व्हिसिंगच्या मागे लागले. टायर बदलणे, ऑइल चेक करणे इ. आतापर्यंत कधीच लक्ष न घातलेली कामं करावी लागत होती. गाडी छान सजवायलाही हवी होती. पण दोन्ही वेळेला क्लिनिक आणि घरचं रोजचं काम, त्यात रॅलीची तयारी यात डोकं इतकं शिणून जात होतं की काही विचार करायला वेळ होत नव्हता आणि कल्पना सुचत नव्हती. स्पीड लिमिट आणि ट्युलिप्स आम्हाला आयत्या वेळीच मिळणार होते. त्यामुळे दोन स्पीडमधील फरक मोजून वेळेवर पोहोचणे हे महत्त्वाचे होते कारण पॉइंट कुठेही अचानक दिसणार होते. लवकर पोहोचलो तर जास्त पॉइंट कट, उशिरा पोहोचलो तर थोडे कमी कट. हे सगळं गणित आमच्याबरोबर असणा-या दोघींना बघायचं होतं. त्यांना ते सगळं आयत्या वेळी नकाशा हातात पडल्यावरच समजवायला लागणार होतं.


दिवस जात होते तसं टेन्शन वाढत होतं. रात्री स्वप्नातसुद्धा आपण रस्ता चुकलोय, टायर पंक्चर झालाय अशीच स्वप्नं पडत होती. शनिवारी दुपारी प्रिया आल्यावर ऌ्र 5 ही कल्पना घेऊन आम्ही पाच स्त्रीशक्तीची रूपं आमच्या गाडीवर सजवायची ठरवलं. त्यानुसार आधुनिक तंत्रज्ञान (इंटरनेट) व माझी मुलगी मानसी यांच्या मदतीने इंदिरा गांधी, सायना नेहवाल, मेरी कोम, कल्पना चावला व सुनीता विल्यम्स अशी स्त्रीशक्तीची पाच रूपं आमच्या गाडीवर अवतरली. त्यांनी दिलेले स्टिकर्स, आमच्या गाडीचा नंबर 177 आणि त्याला थोडीफार फुलांची सजावट केली. पेट्रोल टाकी फुल्ल करून आणि कार प्रेशर चेक करून आमची झेन एस्टिलो रॅलीसाठी तयार झाली. आमच्या गाडीचं रिपोर्टिंग टाइम 7 वाजताचं दिलं होतं. त्यामुळे सकाळी 6.15 वाजता सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन आम्ही चौघी लवासा मोहिमेवर निघालो. सात वाजता कमला मिल कंपाऊंडला पोहोचलो. तिकडचं वातावरण म्हणजे एकदम उत्साहाने, चैतन्याने भरून गेलं होतं. सगळ्या सहभागी महिला गाड्या सजवून, काही जणी तर स्वत:ही सजूनधजून तयार होत्या. पहिल्या गाड्या निघण्याच्या तयारीत होत्या. जॉन अब्राहमने झेंडा दाखवल्यावर पहिली लाल फेरारी 0000 क्रमांक लावलेली बाहेर पडली आणि नंतर रॅलीमधली पहिली गाडी निघाली. बरोबर 8.31 मिनिटांनी आमच्या गाडीला हिरवा झेंडा मिळाला 0.0 कि.मी. इंडिकेटरवर केल्यावर आमच्या हातात रोड मॅप ट्युलिप दिलं गेलं. ते कमला मिल कंपाऊंड ते खालापूर फूड मॉलपर्यंतचे होते. सगळ्यात महत्त्वाचं होतं ते गाडीचा वेग कायम राखणं आणि रस्ता न चुकणं.


आमच्या सहकारी आम्हाला किती वेळात पुढचा टप्पा पार करायचा ते सांगत होत्या. खालापूरला पॉइंट्स मिळाले तेव्हा लक्षात आलं की पुढचा रस्ता आम्ही मागच्या वेळी गेलो होतो त्यापेक्षा वेगळा होता. आली का पंचाईत? वाटेत काही गाड्या बंद पडलेल्या, पंक्चर झालेल्या दिसल्या. पण संपूर्ण रॅलीचं आयोजन इतकं व्यवस्थित होतं की त्यांची माणसं लगेच मदतीला येत होती. वाटेत अ‍ॅम्बुलन्सही उभ्या दिसल्या. टप्प्याटप्प्यावर त्यांचे स्वयंसेवक होते. त्यामुळे आपण बरोबर जात आहोत हा विश्वास मिळत होता. शेवटी एकदाचे आम्ही लवासाला पोहोचलो. आत शिरल्या शिरल्या ढोल-ताशांनी प्रत्येक गाडीचं स्वागत होतं होतं. तिथे सगळा माहोल उत्फुल्ल, जोशपूर्ण होता. दमलेल्या असल्या तरी सगळ्यांच्या चेह-यावर काही तरी मिळवल्याचा आनंद दिसत होता. लवासाच्या निसर्गसौंदर्याचे फोटो काढून जेवणाच्या हॉलकडे निघालो. कारण आता परतीचे वेध लागले होते. परत एवढा प्रवास करून मुलुंड गाठायचं होतं तेही वेळेवर. अंधार पडल्यावर एक्स्प्रेस हायवेवरून गाडी आणण्याचं आव्हान मला पेलायचं होतं. आता ड्रायव्हिंग करायचं अगदी जिवावर आलं होतं. मस्त ताणून द्यावीशी वाटत होती. जेवल्यावर थोडी विश्रांती घेऊन परतीच्या प्रवासाला लागलो. एकदम आरामात आजूबाजूच्या निसर्गाचा आस्वाद घेत मुलुंडला परतलो. घरी मुलुंडमधल्या तमाम नातेवाइकांनी जंगी स्वागत केलं. आम्हाला भारावल्यासारखं झालं आणि हिमालयातली मोहीम पार करूनच आल्यासारखं आम्हाला वाटत होतं.


vrishalidr@rediffmail.com