आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहि‍ली पायी दिंडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माझ्या पहिल्या पायी दिंडीची आठवणदेखील कायम स्मरणात राहील अशीच आहे. पंढरपुरातल्या आमच्या गृहनिर्माण संस्थेच्या कामानिमित्त १९८३मध्ये मी पुण्यात आयुक्त कार्यालयात गेले होते. आमच्या गृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्ष लक्ष्मीबाई बाडगंडी मावशी याही माझ्यासोबत होत्या. सकाळी अकराच्या सुमारास स्वारगेटला एसटी पोहोचल्यावर समोर स्वच्छ पांढऱ्या वेशातील वारकरी भाविकांचे जथ्थे आमच्या नजरेस पडू लागले. उत्सुकतेपोटी मी एका भाविकाला विचारले की, एवढी गर्दी कशाची? त्या वेळी तो म्हणाला, आज आळंदीतून माउलींचे प्रस्थान आहे. दुपारी बरोबर चारच्या सुमारास दिंड्या पंढरपूरकडे रवाना होणार आहेत.

एकीकडे घेऊन आलेले गृहनिर्माण संस्थेचे काम आणि दुसरीकडे आळंदीला जाण्याची लागलेली ओढ. या घाईगडबडीमध्येच दुपारी दोनच्या सुमारास आयुक्त कार्यालयातील आमचे काम संपले. त्यानंतर पुण्याहून सिटी बसने आम्ही आळंदी गाठली. त्या ठिकाणी पंढरपूरच्या यात्रेप्रमाणे भाविकांचा महापूर मी पहिल्यांदाच अनुभवला. इंद्रायणी नदीमध्ये हातपाय धुऊन गर्दीतून वाट काढीत आम्ही माउलींच्या मंदिरापर्यंत पोहोचलो. तोपर्यंत माउलींची पालखी मंदिराबाहेर आलेली होती. सगळीकडे टाळमृदंगांचा गजर आणि हरिनामाचा जयघोष कानी पडत होता. माउली, माउलीच्या गजरात पालखी माउलींच्या गांधीवाड्यात केव्हा पोहोचली हेदेखील आम्हाला समजले नाही.

तोवर आम्ही माहेश्वरी धर्मशाळेमध्ये पोहोचलो. त्या ठिकाणी आमच्या समाजातील बऱ्याच ओळखीच्या महिला भेटल्या. अनायसे प्रस्थानाला आलीच आहेस तर पायी दिंडीचादेखील अनुभव घे, असा साऱ्यांनी मला आग्रह केला. जावे की नाही या विचारातच संपूर्ण रात्र निघून गेली. सकाळी निश्चय केला की, पंढरपूरपर्यंत पायी वारी करायचीच. बरोबर आलेल्या बाडगंडी मावशींना पंढरपूरला जाण्यासाठी आळंदीतून एसटीमध्ये बसवले आणि अंगावरील कपड्यांनिशी माउलींच्या पालखी सोहळ्यामध्ये माहेश्वरी दिंडीमधून चालण्यास सुरुवात केली.
भारूडसम्राज्ञी, पंढरपूर