आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीचा अबोला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एकदा पूर्ण पायी दिंडी करायची म्हटल्यावर कपड्यांची वगैरे सोय करावी लागली. पुण्यातच असलेल्या एका मानलेल्या नणंदेकडून दोन जुन्या साड्या, परकर आणि ब्लाउज घेतले व चालायला सुरुवात केली. अवघड अशा दिवे घाटातून मार्गक्रमण करीत आम्ही सासवडपर्यंत पोहोचलो. दिंडी सोहळ्यामध्ये भजने, भारुडे गात एकएक दिवस पार करत, पंधरा दिवसांनंतर पंढरीच्या विसाव्यावर केव्हा दाखल झालाे हेदेखील कळले नाही. गाव आणि घर जवळ आल्यावर न सांगता गेल्याची धास्ती मनाला अधिकच खाऊ लागली होती. लहान मुलांना एकट्यांना सोडून तसेच पतीची परवानगी न घेता पालखी सोहळ्याबरोबर मी पंधरा दिवस काढलेे होते. त्यामुळे माउलींचा तसेच विठुरायांचा धावा करत मनाची खंबिरी बांधत अखेर मी घर गाठले.

पाहते तर तिन्ही चिमुरडी पिल्ले दर्शनासाठी माझ्या पायावर आडवी झाली होती. प्रेमाने मी त्यांनी सर्वांना छातीशी धरले. नव-याकडे पाहिले, मात्र त्यांचा अबोला होता. त्यांचा हा अबोला सतत आठ दिवस सुरूच राहिला. नंतर त्यांच्या रागाचे आणि न बोलण्यामागचे गूढ कळाले. ते कळल्यावर मात्र मला आश्चर्याचा सुखद धक्कादेखील बसला. कारण त्यांनाही माझ्यासोबत पायी वारीचा आनंद लुटायचा होता. या कारणामुळेच ते रागावलेले होते. त्यानंतर आम्ही दोघांनी मिळून गेल्या तीस वर्षांहून अधिक काळ आळंदी ते पंढरपूर ही पायी वारीची सेवा आजपर्यंत सुरू ठेवली आहे. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून राज्य सरकारच्या शौचालय बांधणे, स्वच्छता आणि पर्यावरण आदींबाबत दिंडी सोहळ्यांमधून भजन आणि भारुडाच्या माध्यमातून जनजागृतीचे कामही मी करते आहे. शक्य आहे तोवर माझ्यातल्या कलेचा असा समाजासाठी उपयोग करतच राहीन. तुम्हा सर्वांशी मधुरिमाच्या माध्यमातून गप्पा मारून मस्त वाटलं. वारीच्या किंवा दर्शनाच्या निमित्ताने पंढरपूरला आलात तर नक्की भेटू.
समाप्त
(शब्दांकन : महेश भंडारकवठेकर)