आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चांदोरकरांचे ‘आर्यलिपी’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रामदास आणि रामदासी पंथ यांच्या संशोधनामुळे महाराष्ट्रात विख्यात असलेल्या धुळ्याच्या शंकर श्रीकृष्ण देवांनी आपल्या गावात 1893मध्ये ‘सत्कार्योत्तेजक सभा’ स्थापन केली आणि संशोधन आणि ग्रंथप्रकाशन यांचा एक दीर्घोद्योग गेल्या शतकाच्या प्रारंभी सुरू केला. या त्यांच्या कार्यात ज्यांनी दीर्घकाळ त्यांना साह्य केले त्यात गोविंद काशीनाथ चांदोरकर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. संशोधकाला लागणा-या शिस्तीचे मनोमन पालन करणारे आणि संशोधन कार्यावर निष्ठा असणारे चांदोरकर हे व्यवसायाने वकील होते. परंतु त्यांचा अधिक काळ संशोधनकार्यातच गेलेला दिसतो.
मराठी अभ्यासकांना चांदोरकर अधिक माहीत आहेत ते त्यांनी केलेल्या ‘महाराष्ट्रीय संत कवी- आणि काव्यसूची’मुळे. 1916मध्ये प्रसिद्ध झालेली ही त्यांची सूची ब-याच नोंदी मोघम करत असली तरी प्राचीन कवींची माहिती एकत्र आणून त्यांचा कोश करावा ही कल्पना प्रथम चांदोरकरांनीच राबवली, म्हणून या सूचीचे महत्त्व आहे.
ही सूची प्रसिद्ध होण्याच्या अगोदर सुमारे आठ वर्षे ‘आर्यलिपी’ हे चांदोरकरांचे पुस्तक सत्कार्योत्तेजक सभेने प्रसिद्ध केले आहे. मराठीतील प्रारंभीच्या आणि महत्त्वाच्या भाषिक अभ्यासांपैकी हे एक उल्लेखनीय पुस्तक आहे. नारायण भवानराव पावगी यांचे ‘भाषाशास्त्र’, ‘प्राकृत भाषेची विचिकित्सा’ यासारखे काही महत्त्वाचे निबंध लिहिणारे आणि इतर लेखनातही भाषाशास्त्राचा विचार मांडणारे राजारामशास्त्री भागवतांचे लेखन, भाषेचा विविध अंगाने विचार करणारे विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांचे लेखन या काळात प्रसिद्ध झालेले आहे. मात्र लिपी हा स्वतंत्र विषय घेऊन मराठीत प्रसिद्ध झालेले पहिले पुस्तक 1908 सालचे ‘आर्यलिपी’ हेच असावे. अवघ्या पाऊणशे पृष्ठांचे हे छोटेखानी पुस्तक चांदोरकरांनी त्यात व्यक्त केलेल्या आपल्या साधार मतांमुळे अभ्यासकांना दखल घ्यावे लागणारे झाले आहे.
या पुस्तकाचे दोन भाग आहेत. पहिल्या भागात देवनागरी लिपीबद्दल आणि दुस-या भागात मोडीबद्दल चांदोरकरांनी विवेचन केले आहे. लिपीची आवश्यकता का निर्माण होते, सांकेतिक चिन्हे का अस्तित्वात आली, वर्ण हे प्रारंभी वस्तुद्योतक आणि प्रियाद्योतक कसे होते, हे प्रारंभी त्यांनी संक्षेपाने सांगितले आहे. त्यानंतर रोमन आणि इतर लिप्यांपेक्षा देवनागरी ही लिपी अधिक चांगली का, याचे विवेचन त्यांनी केले आहे. लिपीमध्ये असू शकणारे वर्णातिरेक, वर्णाभाव, असंगती, वर्णमूल्याभाव, अनुच्चारता, वर्णमूल्यापेक्षा वर्णोच्चार वेगळा असणे आणि वर्णोच्चाराचा भाषिक दुरुपयोग, असे सात भाषिक दोष देवनागरीत बहुधा सापडत नाहीत, त्यामुळे ही वर्णमाला ‘आमच्या भेदकबुद्धीचा मूर्तिमंत प्रभाव आहे’ असे चांदोरकरांना वाटते.
इ.स.पूर्वी चारशे वर्षे हिंदुस्थानात लिपीच अस्तित्वात नव्हती, या डॉ. बर्नेल यांच्या मताचे चांदोरकरांनी खंडन करण्याचा प्रयत्न केला आहे. बर्नेल यांच्या मताला दुजोरा प्रो. सेस आणि मॅक्समूलर यांनी दिला होता. त्यांच्याही मताचा परामर्श चांदोरकरांनी घेतला आहे. अशोकाचे शिलालेख जर इ.स.च्या पूर्वी तिस-या शतकात कोरले गेले आणि त्या काळात सर्वसामान्य लोकांनाही त्या लिपीतील राजाज्ञा वाचता येत होत्या, तर लिपीचा जन्म आणि प्रसार फार पूर्वी भारतात झाला असला पाहिजे. केवळ शंभर वर्षांच्या काळात लिपीचा एवढा विकास होऊन देशाच्या दूरदूरच्या भागात लोकवापरात ती येणे शक्य नाही, असे चांदोरकरांचे प्रतिपादन आहे. (अशोकाचे शिलालेख ज्या लिपीत आहेत त्या ब्राह्मी लिपीला अशोक लिपी असे चांदोरकरांनी नाव दिले आहे.) आरामशाळा (अतिथीगृहे), पाण्याच्या विहिरी येथून किती अंतरावर आहेत हे पाषाणावर प्रवाशांसाठी कोरून ठेवलेले असे, असा उल्लेख मेगॅस्थनीजने केला आहे. तो भारतात येऊन गेला त्या काळात लिपी ही विकसित झालेली होती, हे उघड आहे. असे अनेकविध पुरावे देत चांदोरकरांनी भारतीय लिपीचा जन्मकाळ इ.स.च्या पूर्वी सुमारे दोन हजार वर्षे असा अंदाजिला आहे. आमच्या लिपीचे इतर लिप्यांशी फारसे साधर्म्य नाही यावरून इतर लिप्यांच्या प्रभावातून देवनागरी लिपी तयार झाली असावी हे मत ग्राह्य वाटत नाही, असे चांदोरकरांनी लिहिले आहे. सर्व पाश्चात्य लिप्यांची आद्य लिपी म्हणून जी लिपी ºहीज डेविड यांनी गृहीत धरली आहे, तिचा काळ आपल्याकडील महर्षी पाणिनीच्या काळाजवळ येतो. म्हणजे त्याच्या कितीतरी अगोदर भारतात लिपी अस्तित्वात होती, असे मानावे लागते. अशी अनेकविध मते लक्षात घेऊन काल, संख्या, स्वरूप आणि विद्वज्जनसंमति या चारही पुराव्याने देवनागरी मानवाने जिचे परिष्कृत रूप ओळखले जावे ती लिपी प्राचीनतम आहे, असे मत चांदोरकरांनी व्यक्त केले आहे.
पुस्तकाच्या दुस-या भागात मोडी लिपीबद्दल चांदोरकरांचे विवेचन आहे. प्राकृत भाषा का व कशा निर्माण झाल्या, याविषयी काही मते मांडल्यानंतर चांदोरकरांनी मोडीबद्दल त्यांचा सिद्धांत मांडला आहे. ‘मला वाटते ते हे की, बालबोध ही प्राचीन देवनागरीचे अर्वाचीन रूप आहे व मोडी ही प्राचीन पाली अथवा प्राकृत, अथवा अशोकलिपी इत्यादींचे अर्वाचीन रूप आहे. म्हणून बालबोध व मोडी यांच्यात जन्यजनकसंबंध नाही, असे प्रथम दाखवून नंतर अशोकलिपीशी देवनागरीपेक्षा मोडीचे अधिक साम्य आहे, हे मी दाखवीन’ असा चांदोरकरांचा सिद्धांत आहे.
बालबोधीतील व्यंजने अस्वर असून मोडीत मात्र ती स्वभावताच सस्वर आहेत, हा दोन्हीतील पहिला आणि महत्त्वाचा फरक त्यांनी सांगितला आहे. टाक न उचलता बालबोध लिहिता यावे म्हणून मोडीचा जन्म झाला, हे मत चांदोरकरांना मान्य नाही. टाक उचलावा लागत नसतानाही आ, ई, ख, ट प, ब असे अनेक वर्ण मोडीत का बदलले आणि ग, झ, ष, क्ष हे वर्ण लिहिताना टाक उचलावा लागत असूनही मोडीत त्यांची रूपे का बदलली नाहीत, असा प्रश्न चांदोरकरांनी उपस्थित केला आहे. मोडीत अपूर्ण वर्ण लिहिता येत नाही. अशोक लिपीतसुद्धा तसेच आहे. ऋ सारखे स्वर मोडीत नाहीत आणि अशोकलिपीतही नाहीत, अशी मोडी आणि अशोकलिपी यांच्यातील साम्यस्थळेही चांदोरकरांनी चर्चिली आहेत.
मोडी लिपी ही हेमाडपंतांनी श्रीलंकेतून आणली, अशी दंत्तकथा महाराष्ट्रात लोकप्रिय आहे. बौद्ध धर्म श्रीलंकेत गेला त्याच्याबरोबरच पाली वाङ्मयही श्रीलंकेत पोहोचले. पालीचे आणि मोडीचे निकट साम्य आहे तेव्हा ही दंतकथा अगदीच निराधार आहे असे म्हणता येणार नाही, असे चांदोरकरांना वाटते. मोडी लिपीचा जन्मकाळ अगदी अलीकडे आणून तिचे उत्पादकत्व बाळाजीपंत चिटणीसांकडे देण्याचा उद्योग मात्र त्यांना अमान्य आहे. जास्तीत जास्त मोडी लेखनाचे वळण चिटणीसांच्या काळात थोडे बदलले असे म्हणता येईल. मोडी शब्द कसा उत्पन्न झाला याच्याही काही व्युत्पत्ती त्यांनी सांगितलेल्या आहेत. मौर्यांची लिपी ती मौर्यी म्हणजे मोडी; ही व्युत्पत्ती त्यांना अधिक ग्राह्य दिसते.
आपल्या या पुस्तिकेचा समारोप करताना मोडी संबंधीची उपपत्ती नव्याने मांडली जात असल्यामुळे आपल्यापेक्षा अधिक विद्वान आणि लिपीशास्त्रवेत्ता त्यासाठी हवा होता, असे चांदोरकरांनी नम्रतेने नमूद केले आहे. चांदोरकरांचे सर्व सिद्धांत मान्य होतील असे नाही; पण शेवटी संशोधन हे सत्यसंशोधनाकडे जाण्याच्या मार्गातला एक टप्पा असावे लागते. आर्यलिपी हे त्यांचे पुस्तक लिपींचे स्वरूप आणि त्यांची उत्पत्ती या बाबतचे मराठीतील एक महत्त्वाचे पुस्तक म्हणून गणले जाण्यास प्रत्यवाय नाही.