आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'सशर्त' प्रार्थना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सौ.सत्त्वशीला चव्हाण - मी पृथ्वीराज चव्हाणांची पत्नी. आमचे सीएमसाहेब तसे व्यवस्थित आहेत; पण यांच्या स्वच्छता प्रेमाचा काही काही वेळा कंटाळा येतो. सकाळी चहाचा कप दिला की त्याच्या दांडीवर बॅक्टेरिया बसलेत का, हे भिंग लावून बघत बसतात. अमेरिकेत खूप वर्षे राहिल्याने त्यांना आपल्या आसपास बॅक्टेरिया किटाणूंचे राज्य असावे, असे वाटत असते. मंत्रालयात बसल्यावर तसे वाटणे ठीक आहे हो. पुढच्या जन्मी तरी त्यांचे स्वच्छतेचे वेड कमी व्हावे, एवढेच माझे म्हणणे आहे. आणखी एक मागणे आहे, आमच्या यांना समोर कोण आहे, हे बघून साधं, सरळ, सोप्पं बोलायला शिकव. परवा पुण्यात शैक्षणिक वर्षाची सुरुवात म्हणून यांच्या हस्ते ‘प्रवेशोत्सव’ नामक कार्यक्रम ठेवला होता. त्या लहानग्या पोरांसमोर आमचे हे मनुष्यबळ व्यवस्थापन, बौद्धिक संपदा असलं बोजड भाषेतलं बोलत बसले होते. त्या पोरांना काय कप्पाळ कळणार यांचे भाषण? तेव्हा यांचे बौद्धिक डोस जरा कमी कर, हीच यवतेश्वरचरणी प्रार्थना.
सौ. शर्मिला ठाकरे - आमचे हे म्हणजे ‘मराठी हृदयसम्राट’ कसे आहेत हे तुम्हाला नव्याने सांगण्याची गरज नाही. ‘बोनलेस’ जिभेचे आमचे ‘हे’ सभेत काहीबाही बोलून पब्लिकची तुफान करमणूक करत असतात. असो. त्यांचा हा स्वभाव सात जन्मात तरी बदलणार नाही, याची खात्री आहे. म्हणून तो बदलावा, अशी प्रार्थना करण्यात काही अर्थ नाहीये. यांचा हिंदीवरचा राग पुढच्या जन्मी कमी कर, एवढंच माझं मागणं आहे. काही झाले की लगेच बिहार, यूपीवाल्या भय्यांच्या नावाने प्रेमाचे दोन शब्द बोलतात. सगळे हिंदी, इंग्रजी चॅनलवाले मग यांच्या नावाने शंख करतात आणि यांना प्रसिद्धीचे ‘रिटर्न गिफ्ट’ देतात. यांना हिंदीबद्दल एवढा राग का आहे, हे कळत नाही. यांना काहीतरी जोरदार, टाळ्याखाऊ बोलायचे असेल त्या वेळी हे हिंदीतले डायलॉग टाकत असतात. ‘एकच मारा लेकिन सॉलिड मारा’, ‘मौका सभी को मिलता है’ हे हिंदी पिक्चरमधलेच डायलॉग यांनी टाकले होते. त्या वेळी यांना निळू फुले, यशवंत दत्त यांच्या गाजलेल्या मराठे पिक्चरमधले डायलॉग आठवले नाहीत. वेळ आल्यावर स्वत: हिंदी बोलायचे; मात्र हिंदी बोलणार्‍या लोकांचा राग राग करायचा, हे बरोबर नाही, एवढंच मला म्हणायचं आहे. तेव्हा ‘पुढच्या जन्मी हाच पती मिळो’... लेकिन ‘शर्ते लागू’... आयी बात समझ में?
सौ. प्रज्ञा मुंडे - आमचे हे म्हणजे गोपीनाथराव भला माणूस आहे. स्वभाव मात्र भलता हट्टी आहे. बाहेर म्हणजे राजकारणात हट्ट करणे ठीक आहे. म्हणजे प्रदेशाध्यक्ष मी म्हणेन तोच झाला पाहिजे; मुंबई, पुण्याचा अध्यक्ष मीच ठरवणार, हे मला मान्य आहे. पण घरातसुद्धा यांना मनाविरुद्ध झालेले अज्जिबात चालत नाही. जेवायला भाजी कोणती हवी, नाष्ट्याला काय हवे, हे सगळं हेच ठरवतात. परवा मी नाष्ट्याला उपमा केला. यांच्यापुढे डिश ठेवली तर बाबा रुसून बसलेला. म्हणाले, मी तुला दडपे पोहे सांगितले होते. कशीबशी समजूत घातली. यांचा हा स्वभाव पुढच्या जन्मी बदलावा, एवढंच आपलं मागणं आहे. पार्टीमध्ये मनासारखे घडले नाही तर घर सोडून जाईन, अशा धमक्या द्यायची यांना सवय लागली आहे. नशीब घरात चिडल्यावर अशा धमक्या देत नाहीत.
सौ. गुरुशरण कौर- नाव वाचल्यावर माझी पटकन ओळख लागणार नाही म्हणून सांगते, मी मनमोहनसिंगांची पत्नी. आता मनमोहनसिंग कोण, हे मी सांगायला नको. माझा नवरा तुमच्या सगळ्यांच्या टिंगलीचा विषय झालेला, हे मला माहीत आहे. यांच्या ‘न बोलण्या’बद्दल अनेक जोक केले जातात. एफबीवर कार्टून्स टाकली जातात, हे सगळं मला माहीत आहे. यांच्याबद्दल मला किती ‘बोलू’ असे झालेय. आत्ता हे काही बोलत नाहीत, पण पूर्वी आमचे हे असे नव्हते हो. एकदम बडबडे होते. मला तर इतके घालून पाडून बोलायचे, की विचारू नका. भाजी थोडी ऑइली झाली की ‘वडलांची तेलाची गिरणी आहे वाटतं’ असं कुजकं बोलायचे. तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे खूप बोलायचे. यांचा तो स्वभाव परत येवो, एवढेच माझे मागणे आहे. समोर लाखोंचा जनसमुदाय बसलेला आहे आणि यांच्या प्रत्येक वाक्याला टाळ्या पडताहेत, असं दृश्य मला पाहायचं आहे. आणि हो, आणखी एक किरकोळ मागणी होती, वटपौर्णिमेचा आणि त्या मागणीचा तसा संबंध नाहीये. आमच्या यांचा 26 सप्टेंबरला वाढदिवस आहे. त्या दिवशी यांना शुभेच्छा देणारा एक तरी फ्लेक्स लावण्याची बुद्धी कुणाला तरी दे. चिल्ल्यापिल्ल्या पुढार्‍यांचे फ्लेक्स गावभर लागतात. आमचे हे इतकी वर्षे प्राइम मिनिस्टर आहेत. बाहेरच्या लोकांचे जाऊ द्या, यांच्या पार्टीचे लोकही यांच्या वाढदिवसाला यांचा एक फ्लेक्स कुठे लावत नाहीत.

ता. क. फिक्सिंग कलेचे प्रवर्तक श्रीशांत यांची भावी सौ.ही वडाच्या झाडाची पूजा करताना दिसली. जन्मोजन्मी हाच पती मिळो, असे शब्द तिच्या तोंडी नव्हते. ती म्हणत होती, ‘लग्न झाल्यावर मी जेवायला कोणती भाजी करणार, वांग्याची की दोडक्याची? यावर तरी माझ्या नवर्‍याने फिक्सिंग करू नये, एवढेच माझे मागणे आहे.

cm.dedhakka@gmail.com