आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chandrakant Shinde Interview Of Boolywood Star Amir Khan

चित्रपट माझ्यामुळे नव्हे, कथानकामुळे चालतात-आमिर खान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘धूम-3’साठी आमिर खान काही निवडक पत्रकारांशी गप्पा मारणार असल्याचा मेसेज आला. आमिरशी शेवटची भेट ‘धोबी घाट’च्या वेळेस झाली होती. या वेळी मात्र त्याने आपल्या वांद्रे येथील कार्टर रोडवरील नव्या घरात मुलाखतीचे निमंत्रण दिले होते.
दिवंगत राजेश खन्नाच्या प्रसिद्ध ‘आशीर्वाद’ बंगल्याच्या रांगेत एक आलिशान इमारत तयार होतेय. या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील आपल्या नव्या घरात ही भेट ठरली होती. हे घर कुणा स्टारपेक्षाही एका कलासक्त माणसाची साक्ष देत होतं. हॉलमध्ये सोफा आणि काही खुर्च्या ठेवल्या होत्या. एका भिंतीला भला मोठा प्रोजेक्टर स्क्रीन गुंडाळून ठेवलेला होता आणि डोक्यावरच प्रोजेक्टर होता. संपूर्ण हॉलमध्ये आधुनिक म्युझिक सिस्टिम लावलेली दिसत होती. हॉलच्या दोन भिंती संपूर्ण काचेच्या होत्या. एका काचेतून समुद्राचे दर्शन होत होते. समुद्राच्या बाजूला हॉलची गॅलरी होती आणि तेथे काही स्टूल्स मांडून ठेवलेले होते. तेथे उभे राहून चहाचे घोट घेत घेत, अस्ताला जाणाºया सूर्याचे दर्शन घेणे आनंददायी अनुभूती ठरावी, हा विचार मनात डोकावला होता...
थोड्याच वेळात कारकीर्दीची पंचविशी पूर्ण करणारा आमिर आला आणि स्क्रीनसमोरील खुर्चीवर बसला. म्हणाला, मुलाखत वगैरे काही नाही, आपण सहजच गप्पा मारू.
० गजनी 100 कोटी, थ्री इडियट 200 कोटी आणि आता धूम किती कोटींची मजल मारेल?
मी आकड्यांवर कधीच विश्वास ठेवत नाही. ही जी कोटींची मजल आहे, ती आमची नसते. कलाकार हा फक्त प्रेक्षकांना पहिले तीन दिवस चित्रपटगृहांपर्यंत खेचून आणू शकतो. त्यानंतर चित्रपट चांगला असेल तरच तो प्रेक्षकांना आवडतो आणि ही कोटींची उड्डाणे होतात. थ्री इडियट्स चालला तो त्यातील कथानकामुळे; माझ्यामुळे नाही. आज तुम्हीही वाचता की, काही चित्रपटांनी 150, 200, 300 कोटींचा व्यवसाय केला. त्यामुळे तुम्ही त्या चित्रपटांना यशस्वी म्हणता. परंतु मी तसे म्हणणार नाही. चित्रपटाच्या कमाईचा आकडा हा पहिल्या वीकेंडच्या पाचपट असेल तरच तो चित्रपट यशस्वी झाला, असे म्हणता येईल. थ्री इडियट्सने पहिल्या वीकेंडमध्ये 40 कोटी रुपयांचा गल्ला गोळा केला आणि नंतर त्याने 200पेक्षा जास्त कोटींचा व्यवसाय केला. म्हणजे पहिल्या वीकेंडच्या एकूण गल्ल्याच्या पाचपट गल्ला गोळा केला. थ्री इडियट्स 1500 चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला होता. आज काही चित्रपट अडीच-तीन हजार चित्रपटगृहांत प्रदर्शित होतात आणि पहिल्या वीकेंडमध्ये 100 कोटींचा वगैरे गल्ला गोळा करतात. परंतु त्याच्या पाचपट म्हणजे 500 कोटींचा गल्ला त्या चित्रपटाने गोळा केला पाहिजे. परंतु असे झालेले दिसत नाही. त्यामुळे मी अशा चित्रपटांना यशस्वी म्हणणार नाही. मी जर आकड्यांच्या खेळात असतो तर ‘तलाश’सारखा चित्रपट केला नसता. हा चित्रपट 100 कोटी गोळा करणार नाही, हे मला ठाऊक होते. एक चांगला संवेदनशील चित्रपट म्हणून मी तो केला.
० मोठ्या नायकाचा चित्रपट असेल तर तिकिटांचे दर वाढवले जातात, हे तुला पटते का ?
हे व्यावसायिक गणित आहे आणि मी जरी निर्माता असलो तरी मला ते पटत नाही. मोठा चित्रपट असेल तर तिकिटांचे दर वाढवले जातात. मग दोन कोटींचा चित्रपट असेल तर तिकिटांचे दर कमी का करत नाहीत, असा प्रश्नही उद्भवू शकतो. वितरक, निर्माता लवकरात लवकर आपले पैसे काढू इच्छितो. दुसरी गोष्ट अशी की, परदेशाच्या तुलनेत आपल्याकडे प्रतिहजारी चित्रपटगृहांची संख्या कमी आहे. त्यामुळे जास्त तिकीट दर ठेवले जात असावेत, असे मला वाटते. मध्यमवर्गीयांसाठी स्वस्त दरातील मल्टिप्लेक्सची एक शृंखला तयार केली पाहिजे, असे मला वाटते. कारण तेच आमचे खरे प्रशंसक असतात. चोरी-छुपे चालणारे व्हिडिओ पार्लरही कायदेशीर केले पाहिजेत. त्यामुळेही निर्माता-वितरकांना थोडे पैसे मिळतील.
० बॉलीवूडमध्ये नायिकांना नायकापेक्षा कमी पैसे का दिले जातात?
बॉलीवूडमध्ये पुरुष, स्त्री असा भेदभाव केला जात नाही. कोणता कलाकार प्रेक्षकांना चित्रपटगृहांपर्यंत खेचून आणू शकतो, त्यावर त्याचे मानधन ठरलेले असते. नायिकांपेक्षा नायकांच्या नावावर प्रेक्षक मोठ्या संख्येने येतात; त्यामुळे नायकांना जास्त मानधन मिळत असल्याचे दिसून येते. परंतु यापूर्वी अनेक नायिकांना नायकांपेक्षा जास्त मानधन मिळालेले आहे. नायक-नायिकाच नव्हे तर लेखकांनाही चांगले पैसे मिळालेले आहेत. सलीम-जावेद या लेखकद्वयीला निर्मात्यांनी चांगले पैसे दिलेले आहेत, कारण त्यांचे नाव वाचून प्रेक्षक चित्रपट पाहायला येत असे. त्यामुळे बॉलीवूडमध्ये स्त्री-पुरुष असा भेदभाव केला जातो, हे म्हणणे चुकीचे आहे.
० चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तू नेहमी काहीतरी नवे करतोस; या वेळी काय?
या वेळी काहीही नाही. प्रत्येक वेळेला काहीतरी केलेच पाहिजे, असे नाही. आम्ही तर या वेळी छोट्या पडद्यावरील कोणत्याही कार्यक्रमात न जाण्याचे ठरवले आहे. एखादा नवीन निर्माता, नवीन कलाकार असतील तर त्यांनी मात्र या कार्यक्रमामध्ये जाऊन आपल्या चित्रपटाची प्रसिद्धी केली तर ती योग्य ठरेल. मोठ्या नायकांना, निर्मात्यांना याची गरज आहे, असे मला वाटत नाही.
० मुलगा आझादला वेळ देता येतो का?
शूटिंगमुळे त्याला वेळ देता येत नव्हता. परंतु ‘धूम-3’च्या वेळेस तो शिकागोला माझ्यासोबत असल्याने त्याला भरपूर वेळ देता आला. तसेच मुंबईत फिल्मसिटीला शूटिंग असताना मी सकाळी जात असे. तोही सकाळी उठत असल्याने माझ्यासोबतच तो गाडीतून येत असे. तो मोठा झाल्यावर कलाकार होईल, असे मला वाटत आहे. ‘धूम-3’मध्ये माझा टॅप डान्स आहे. मी त्याचे प्रशिक्षण घेत असताना तो पाहत असे. एक दिवस मी पाहिले की तो पाय हलवत आहे. मला अगोदर कळेना, तो काय करतोय; पण नंतर लक्ष देऊन पाहिले तेव्हा जाणवले, की मी टॅप डान्स करताना ज्या स्टेप्स करत होतो, त्याच तो करत आहे.
० जुनैदही चित्रपटात येणार का?
त्याची इच्छा असेल तर तो येईल. सध्या तो राजकुमार हिरानीबरोबर सहायक म्हणून काम करत आहे.
० बाइक चालवण्याचे तुला किती वेड आहे?
मला बाइक चालवायला आवडत नाही. ‘धूम-3’साठी मी बºयाच कालावधीनंतर बाइक चालवली आहे. चित्रपटात बाइकचे जे स्टंट असतात, ते पूर्ण काळजी घेऊन आणि रिहर्सल करून केलेले असतात. स्टंट करणारे अत्यंत प्रशिक्षित असतात. तरुणांनी चित्रपटात दाखवले जातात तसे स्टंट कधीही करू नयेत, असे मला सांगावेसे वाटते.
shindeckant@gmail.com