आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मिक्ता'चा धडाका !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॅसिनोसाठी जगप्रसिद्ध असलेल्या आणि रात्रंदिन दिव्यांच्या रोषणाईने झगमगणार्‍या मकाऊमध्ये म्हैसकर फाउंडेशन आणि ‘महाराष्ट्र कलानिधी’ प्रस्तुत ‘मिक्ता’चा चौथा पुरस्कार सोहळा रंगला. निर्माता-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या कल्पनेतून आकारास आलेल्या या पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. मराठी माणसांचा हा पुरस्कार सोहळा एक वर्षाआड सादर करावा, अशी एक उपयुक्त सूचना या वेळी पवार यांनी केलीच; परंतु इंदूर, दिल्ली अशा काही ठिकाणी मराठी माणसे मोठ्या प्रमाणावर वास्तव्य करून आहेत, त्यांच्यासमोर हा पुरस्कार सोहळा सादर झाला तर या सोहळ्याला अस्सल मराठी प्रेक्षक मिळेल, असेही निरीक्षण त्यांनी नोंदवले. त्यांचे म्हणणे खरे होते, हे भव्य बॉलरूममधील प्रेक्षक संख्या पाहिल्यानंतर जाणवत होते. पवार यांना यंदाचा ‘गौरव महाराष्ट्राचा’ पुरस्कार घोषित करण्यात आला होता. पुरस्कार स्वीकारण्यासाठी मकाऊमध्ये आलेल्या पवारांनी पुरस्कार सोहळ्याचा मनापासून आनंद घेतला.
मकाऊच्या आलिशान व्हेनेशियन या सप्ततारांकित हॉटेलच्या भव्य बॉलरूममध्ये चौथा मिक्ता पुरस्कार सोहळा रंगला. चार तास मनोरंजनाची उधळण करणार्‍या या पुरस्कार सोहळ्यात एक बाब खटकली; ती म्हणजे, पुरस्कार समारंभासाठी जो रंगमंच सजवण्यात आला होता त्यावर फक्त नायकांचीच चित्रे लावण्यात आली होती. एकाही नायिकेचे चित्र मंचावर नसल्याने मराठीत नायिका झाल्याच नाहीत की काय, असा प्रश्न उपस्थितांच्या मनात येऊन गेला. परंतु ही कसर क्रांती रेडकर, दीपाली सय्यद, भार्गवी चिरमुले, ऊर्मिला कानेटकर या नायिकांनी आपल्या अनोख्या अदाकारीने भरून काढली. क्रांती रेडकरने एका अमराठी नृत्य दिग्दर्शिकेच्या रूपात येऊन बहार उडवून दिली. नीलेश साबळेनेही तिला तशीच तोलामोलाची साथ दिली. वैभव मांगले आणि पुष्कर श्रोत्री यांनी खुसखुशीत निवेदन करून कार्यक्रमात रंगत आणली.
या वेळी अनेक कलाकारांनी अभिनयासोबतच आपल्याकडे गाता गळा असल्याचेही दाखवून दिले. मोहन जोशी यांनी ‘एक हसीन शाम को दिल मेरा खो गया’, भारती आचरेकर यांनी ‘आपकी नजरों ने समझा’, डॉ. महेश पटवर्धन यांनी ‘एक अजनबी हसीना से यूं मुलाकात हो गई’, महेश मांजरेकर यांनी ‘मेरे नैना सावन भादो’, मनवा नाईकने ‘आइये मेहरबां’ आणि सुनील बर्वेने ‘परदा है परदा’ ही कव्वाली गाऊन आपले गायनकौशल्य आजमावले.
गौरव महाराष्ट्राचा पुरस्कार प्राप्त करणार्‍या नाना पाटेकर यांची नक्कल संदीप पाठक आणि जितेंद्र जोशी यांनी सादर केली. सचिन खेडेकर, अनिरुद्ध देशपांडे आणि वंदना गुप्ते यांनी शरद पवारांना बोलते केले. महेश मांजरेकर, चंद्रकांत कुलकर्णी आणि सुशांत यांच्या उत्कृष्ट नियोजनासह संतोष मांजरेकर यांनी पुरस्कार सोहळ्याच्या पडद्यामागील तयारीसाठी केलेली मेहनत यशस्वी झाल्याचे दिसत होते. ‘वीणा वर्ल्ड’ने आतिथ्यात कसलीही कसर राहणार नाही याची उत्तम प्रकारे काळजी घेतली होती.
जेव्हा चिनी
माणूस मराठी बोलतो...
हॉटेलच्या बाहेर एक आलिशान लिमोझिन गाडी उभी होती. काही कलाकार उत्सुकतेने ती गाडी पाहत होते. तेथेच एक चिनी सुरक्षा रक्षकही होता. त्याने गाडीला हात लावू नको, असे काही जणांना सांगितले. तेव्हा एका कलाकाराने त्या सुरक्षा रक्षकाला मराठी येत नसेल असे वाटून ‘गाडी काय आम्ही चोरून नेतो’ असे घुश्शातच म्हटले. त्यावर त्या सुरक्षा रक्षकाने चक्क मराठीत म्हटले, ‘तुम्ही चोरून नेणार नाही हो, पण माझी नोकरी जाईल, त्याचे काय?’ तेव्हा सगळेच चकित झाले. त्यानंतर त्याने खुलासा केला, तो चिनी नसून भारतातील आसामचा नागरिक असून अनेक वर्षे मुंबईत राहिल्यानंतर काही वर्षांपासून तो मकाऊमध्ये काम करीत आहे.

कलाकारांच्या मदतीसाठी
कला संजीवनी ट्रस्ट


अनेक कलाकारांना वार्धक्यात आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागते. आजारपणाचा खर्च झेपत नाही. तर काही कलाकारांचे ऐन उमेदीत निधन होते आणि त्यांचे कुटुंबीय उघड्यावर पडतात. ही बाब लक्षात घेऊन कलाकारांचा विमा, अडचणीच्या वेळी त्यांना आर्थिक मदत करण्यासाठी ‘कला संजीवनी ट्रस्ट’ स्थापन करण्यात आल्याची घोषणा या वेळी चंद्रकांत कुलकर्णी यांनी केली. यासाठी महेश मांजरेकर, श्रीरंग गोडबोले, अजित भुरे आणि चंद्रकांत कुलकर्णी यांची एक समिती स्थापन करण्यात आली असून ट्रस्टच्या माध्यमातून पैसे गोळा करून कलाकारांना मदत केली जाणार आहे.

नशीब आजमावले

पुरस्कार सोहळ्याबरोबरच अनेक मराठी कलाकारांनी हॉटेलच्या भव्य अशा कॅसिनोमध्ये जाऊन आपले नशीबही आजमावले. तर मकाऊ टॉवरच्या साठाव्या मजल्यावर बाहेरच्या बाजूने रोपच्या मदतीने 360 अंशात फिरून मकाऊ शहराचे विहंगम दृश्य पाहण्याचा आनंदही घेतला.


shindeckant@gmail.com