आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिशन चायना !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमिताभ बच्चन, सलमान खान, आमिर खान, शाहरुख खान, कॅटरिना कैफ, करिना कपूर हे बॉलीवूडचे कलाकार यापुढे चीनची बोलीभाषा असलेल्या मँडरिनमध्ये संवाद म्हणताना दिसले, तर आश्चर्य वाटून घेऊ नका. आता तुम्ही म्हणाल, असे कसे शक्य आहे? तर याचे कारण एवढेच की, चीनची भलीमोठी मनोरंजनाची बाजारपेठ हिंदी चित्रपटांसाठी लवकरच खुली होत आहे. चीनमध्ये हिंदी चित्रपट प्रदर्शित करण्याबाबत वाणिज्य मंत्रालयाच्या पातळीवर नुकताच एक करार झाला. त्या करारानुसार चीनमध्ये वर्षाला आठ हिंदी चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत. याची सुरुवात यशराज बॅनरच्या ‘धूम 3’ने होत आहे. पुढील महिन्यात ‘धूम 3’ चीनमध्ये दोनशे चित्रपटगृहांत प्रदर्शित केला जाणार आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर चीनमध्ये चित्रपटाची प्रसिद्धीही केली जात आहे. ‘धूम 3’ला जर चिनी प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला, तर अन्य चित्रपटांसाठी ही एक आनंदाची बातमी ठरेल आणि पाठोपाठ इतरही हिंदी चित्रपटांसाठी चीनचे दरवाजे खुले होतील.

आता तुमच्या मनात प्रश्न उद्भवेल की, चीनमध्ये प्रदर्शित होणारा ‘धूम 3’ पहिला चित्रपट आहे का? तर या प्रश्नाचे उत्तर ‘नाही’ असे आहे. 1950च्या आसपास चीनमध्ये राज कपूरचा ‘आवारा’ प्रदर्शित झाला होता. भाषा कळत नसतानाही भांडवलशाहीविरोधातील हा चित्रपट त्या वेळच्या कम्युनिस्ट चीनमध्ये चांगलाच यशस्वी झाला होता. त्यानंतर आमिर खानचा ‘लगान’ ‘वन्स अपॉन ए टाइम इन इंडिया’ या नावाने, तर शाहरुख खानचा ‘माय नेम इज खान’ असे काही चित्रपट प्रदर्शित झाले; परंतु ‘धूम 3’ ज्याप्रमाणे प्रदर्शित होत आहे, तसा एकही चित्रपट यापूर्वी झळकला नव्हता. यामागे केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाचा फार मोठा वाटा आहे. काही महिन्यांपूर्वीच चीनच्या चित्रपट इम्पोर्ट करणार्‍या संस्थेबरोबर केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या अधिकार्‍यांनी चर्चा करून चीनचा बाजार भारतासाठी खुला करण्याचे प्रयत्न केले होते. हॉलीवूडमध्ये केलेल्या एका सर्व्हेनुसार 2014मध्ये चीन हा जगातील सगळ्यात मोठा चित्रपटांचा बाजार असलेला देश म्हणून समोर येणार आहे. अर्थातच अमेरिकेपेक्षाही चीनची बाजारपेठ मोठी ठरणार आहे. त्यामुळेच भारतीय चित्रपटसृष्टीनेही चीनकडे विशेष लक्ष द्यायचे ठरवले आहे.

राजकीय आणि लष्करी संबंधात वेळोवेळी तणाव येत असले तरीही, चीन आणि भारताचे संबंध अनेक शतकांपासूनचे आहेत. भारतीय आणि चिनी संस्कृतीचा परस्पर प्रभाव सर्वश्रुत आहे. चिनी नागरिकांना भारताविषयी आपुलकी आहे, तर भारताला चिनी जीवनशैलीविषयी कुतूहल आहे. बोधीधम्माने चीनमध्ये मोठा प्रभाव राखला आहे. बोधीधम्माच्या जीवनावर आधारित ‘सेव्हन्थ सेन्स’ नावाचा चित्रपट ए. आर. मुरुगदोस यांनी तीन-चार वर्षांपूर्वी तयार केला होता. हा चित्रपट दक्षिण भारत आणि चीनमधील प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. हे संबंध हिंदी चित्रपटांच्या माध्यमातून आणखी दृढ करण्याचा प्रयत्न आता केला जाणार आहे.

चित्रीकरणाच्या निमित्ताने थेट सैबेरियापर्यंत (अब्बास-मस्तान दिग्दर्शित ‘प्लेयर्स’) मजल मारल्यानंतर बॉलीवूडने आता केवळ चीनच नव्हे पारंपरिक विदेशी बाजार सोडून अन्य देशांकडे म्हणजेच पोलंड, जर्मनी, फ्रान्स, रोमानिया, बल्गेरिया, बेल्जियम, पेरू, उझबेकिस्तान या अस्पर्शित देशांकडेही लक्ष वळवले आहे. गेल्या वर्षी इरफान खान अभिनित चित्रपट ‘लंचबॉक्स’ फ्रान्समध्येही प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटाने जवळजवळ 27.22 कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. भारतात या चित्रपटाला प्रेक्षकांचा म्हणावा तसा प्रतिसाद लाभला नव्हता. त्यापूर्वी ‘रेस 2’ म्यानमार, तिमोर, मालदीव आणि व्हिएतनाममधील सात चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता.

आघाडीची अकाऊंटन्सी फर्म असलेली डेलॉईट आणि एमपीए इकॉनॉमिक काँट्रिब्युशन स्टडी यांनी संयुक्तपणे 2013मध्ये प्रकाशित केलेल्या अहवालात हिंदी चित्रपटांचा 2017मध्ये परदेशातील व्यवसाय जवळजवळ 1310 कोटी रुपयांचा होईल, असे म्हटले आहे. या वर्षीच्या दुसर्‍या तिमाहीत हाच व्यवसाय 980 कोटी रुपयांचा होणार असून तीन वर्षांत त्यात 15 टक्के वाढ होण्याची अपेक्षा या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. भारतात चित्रपटाचे तिकीट तीन ते पाच डॉलर (अंदाजे 150 ते 250 रुपये) असते, तर परदेशात हेच तिकिटांचे दर 10 ते 15 डॉलर (अंदाजे 600 ते 1000 रुपये) असल्याने जास्तीत जास्त चित्रपटगृहांत चित्रपट प्रदर्शित केला, तर निर्मात्याला मोठा आर्थिक फायदा होतो. पूर्वी चित्रपटाची रिळे पाठवावी लागत; मात्र आता डिजिटल युग असल्याने एका पेनड्राइव्हमधून यूएफओसारख्या सेवेच्या माध्यमातून एकाच वेळी अनेक चित्रपटगृहांत चित्रपट दाखवणे सोपे झाले आहे. अशा वेळी विदेशातून देशाला जे विदेशी चलन मिळते, ते मिळवून देण्यात हिंदी चित्रपटांचा वाटा 43 टक्के आहे, तर तामीळ आणि तेलुगू भाषेतील चित्रपटांमुळे 36 टक्के विदेशी चलन भारताच्या तिजोरीत जमा होत आहे, असेही डेलॉईटच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

चित्रपट व्यवसायाचे जाणकार तरण आदर्श या संदर्भात बोलताना म्हणाले की, आगामी काळात चीन चित्रपटांचा जगातील सगळ्यात मोठा बाजार ठरणार असल्याने हिंदी चित्रपट तेथे मोठ्या प्रमाणावर प्रदर्शित होण्यास सुरुवात होणे हे चांगले लक्षण आहे. फक्त भारत आणि चीन या दोन देशांमध्ये चित्रपट चालला तरी, तो हजार कोटींच्या आसपास व्यवसाय निश्चित करेल. त्यामुळे हिंदी चित्रपटांमध्ये नवे प्रयोग करण्याबरोबरच खरोखरचा आंतरराष्ट्रीय चित्रपट तयार होण्यास नक्कीच सुरुवात होईल. चीनमध्ये कसलेही मसाला चित्रपट चालत नाहीत. यापूर्वी काही हिंदी चित्रपट प्रदर्शित करण्याचा प्रयत्न तेथे झाला, परंतु ते सर्व प्रयत्न अयशस्वी झाले होते. बॉलीवूड आता चीनप्रमाणेच अनटॅप्ड बाजार शोधत आहे. यामुळेच जपानमध्ये श्रीदेवीचा गौरी शिंदे दिग्दर्शित ‘इंग्लिश-विंग्लिश’ प्रदर्शित करण्यात आला. खरे तर जपानमध्ये हिंदी चित्रपट प्रदर्शित होत नाहीत. तेथे फक्त रजनीकांत लोकप्रिय आहे. परंतु श्रीदेवीने एक वेगळा प्रयत्न केला आणि त्याचा फायदा झाला, हा संकेत बॉलीवूडने समजून घेणेही यापुढील काळात महत्त्वाचे ठरणार आहे.

‘यशराज’ फिल्म्समधील पदाधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, ‘यशराज’चे पूर्वीपासूनच चीनकडे लक्ष आहे. चीनच्या एका टीव्ही चॅनेलबरोबर 150 चित्रपट देण्याचे कंत्राटही करण्यात आले आहे. 2010मधील जनगणनेनुसार चीनमध्ये 15051 भारतीय वास्तव्यास असून हाँगकाँगमध्ये मात्र ही संख्या 20444 आहे. त्यामुळे अमेरिका, कॅनडा वा आखाती देशांमध्ये ज्याप्रमाणे अनिवासी भारतीयांच्या जिवावर हिंदी चित्रपट प्रदर्शित केले जातात, तसे चीनमध्ये घडत नाही. परंतु चीनमधील अनिवासी भारतीय नव्हे, तर चिनी प्रेक्षकांनाही आपलेसे करण्याचा ‘यशराज’चा प्रयत्न असणार आहे. चीनच्या तुलनेत जर्मनीत 42500 अनिवासी भारतीय आहेत.

पोलंडमध्ये 1845, जपानमध्ये 22325, रोमानियामध्ये 878, बल्गेरियात 250, पेरूमध्ये 316 अनिवासी भारतीय राहतात. परंतु या देशांमध्येही मोठ्या प्रमाणावर हिंदी चित्रपट प्रदर्शित करण्याचा बॉलीवूडचा मानस आहे. यापुढील काळात आपली झेप विस्तारत हिंदी चित्रपटांना आंतरराष्ट्रीय दर्जापर्यंत नेण्याचा बॉलीवूडचा प्रयत्न असणार आहे. बदलत्या अर्थकारणाने जसा जगाचा केंद्रबिंदू भारत आणि चीन या दोन देशांवर स्थिरावला आहे, त्याचीच पुनरावृत्ती जगाच्या मनोरंजन क्षेत्रातही घडून येण्याची ही सुरुवात असणार आहे.