आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Chandrakat Kulkarni And Prashant Dalvi Tukaram Film

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

समृद्ध वाचनशैली!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंद्रकांत कुलकर्णी आणि प्रशांत दळवी हे नाटकाचा ध्यास घेतलेले दोन मित्र. रात्रभर प्रवास करून दिवसभर नाटके पाहत आणि रात्री औरंगाबादला परत जात. पुढे ते मुंबईत येऊन स्थायिक झाले. ‘ध्यानीमनी’, ‘चारचौघी’, ‘चाहूल’ अशी नाटके त्यांनी सादर केली. जी मराठी रंगभूमीवरची मैलाचा दगड ठरली. दोघांनी मिळून ‘बिनधास्त’, ‘भेट’सारखे वेगळे सिनेमेही दिले. आणि आता त्यांचा ‘तुकाराम’ येतो आहे.
अजित दळवी व प्रशांत दळवी हे दोघेही ‘तुकाराम’ या चित्रपटाचे लेखक. या लेखकद्वयांपैकी प्रशांत दळवी सांगत होता, ‘तुकाराम’वर चित्रपट करायचा असे ठरल्यावर लक्षात असे आले की, या विषयावर इतके लेखन उपलब्ध आहे की अनेक अंगांनी ते आपण वाचले पाहिजे. अगदी जुने पु. म. लाड यांनी लिहिलेले चरित्रही चांगले आहे किंवा भालचंद्र नेमाडे यांचे तुकारामावरचे छोटे पुस्तक किंवा सदानंद मोरे यांचे मोठे पुस्तक ही सारीच वाचली आहेत.
मुख्य म्हणजे दिलीप चित्रेंचे ‘पुन्हा तुकाराम’ हे पुस्तक जागतिक संदर्भात तुकाराम कुठे बसतो त्याचा विचार करते. त्यांच्या पुस्तकाच्या प्रकरणांची शीर्षकेही किती सुंदर आहेत, ‘कवी असणे’, ‘माणूस असणे’, ‘फक्त असणे’ इत्यादी. हे सारे वाचून अर्थात थेट नाही तर त्यातून आम्ही तुकाराम माणूस म्हणून कसा घडला याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला. त्यातून जे आम्ही पहिले स्क्रिप्ट केले त्याचा ड्राफ्ट पाच तासांचा सिनेमा होईल इतका होता. पण त्यातून 240 मिनिटांचे साहित्य चंदूने वेगळे काढले. पण मोह असा होता की, हे घ्यावे की ते? पण मग मला वाटले की तुकाराम केवळ दहा ओळीत एवढा मोठा आशय सांगतो तर आपल्यालाही ते जमले पाहिजे!
तुकारामाच्या काळातला समाज कसा होता हे समजण्यास ‘शिवकालीन महाराष्ट्र’ हे अ. रा. कुलकर्णी यांचे पुस्तक प्रशांतला उपयोगी ठरले. पण कुरुंदकरांनी शिवाजीवर जे छोटेखानी लेखन केले आहे, त्याचाही उपयोग झाला. त्यांनी म्हटले आहे की शिवाजी म्हणजे केवळ दोन-चार नाट्यपूर्ण प्रसंग म्हणजे त्याचे आयुष्य नव्हे, तर ख-या अर्थाने शिवाजी कसा होता हे महत्त्वाचे आणि या लेखनाने मला वेगळी दृष्टी दिली.
अर्थातच प्रशांत गेले काही महिने यावरच वाचन करतोय. एरवी श्याम मनोहर हे त्याच्या आवडत्या लेखकांत आहेत. तेंडुलकर, नेमाडे ते अगदी सचिन कुंडलकर, मनस्विनी लता रवींद्र अशा सा-यांचेच लेखन तो आवडीने वाचत असतो किंवा ‘शिंडलर्स लिस्ट’सारखा सिनेमा पाहिल्यावर त्यावरचे पुस्तक मिळवून वाचण्याचे कुतूहलही तो जपतो. पण त्यातही ‘गौतमची गोष्ट’सारखे अनिल दामलेचे पुस्तक त्याला वाचक म्हणून वेगळेच समाधान देऊन दाते. अर्थात ‘रघुनाथाची बखर’ हे श्री. ज. जोशींचे पुस्तक तर तो नेहमीच अधूनमधून वाचत असतो.
शेवटी चंदू कुलकर्णी काय, प्रशांत दळवी काय, दोघेही समाजवादी चळवळीत वाढलेले. त्यांचा अध्यात्माबद्दलचा दृष्टिकोन पूर्णत: वेगळा आहे. असे असताना तुकारामासारखा भक्तिमार्गी विषय निवडून लेखक म्हणून प्रशांतने तो समर्थपणे पेलला, हे त्याच्या समृद्ध अशा वाचनशैलीस शोभणारेच आहे.