आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलोख्याचे बेट...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये, असा सल्ला वडीलधारी माणसे वर्षानुवर्षे देत आलेली आहेत. तंटे-बखेडे नाहीत असा गावगाडा नाही. ईर्षा आणि त्वेषामुळे शहाण्यासुरत्यांच्या मध्यस्थींचे प्रयत्नही अनेकदा निष्फळ ठरतात आणि कोर्टकचे-यांच्या भानगडी सुरू होतात. परंतु कालांतराने कोर्टाच्या चकरा मारून मारून नाकी नऊ येऊ लागल्यानंतर वडीलधा-यांच्या सल्ल्याचे मर्म आणि महत्त्व दोन्हीही उलगडू लागते. अशाच तंट्या-बखेड्यांशी झुंजणारे, जळगाव जिल्ह्यातील रत्नावती नदीच्या काठी वसलेले, चोपड्यापासून 18 किलोमीटर अंतरावरील चहार्डी हे गाव! एकवीस हजार लोकसंख्येच्या या गावात जवळपास 40 जातींचे लोक राहतात. 1935मध्ये भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी चहार्डीला आवर्जून भेट दिली होती. जळगाव जिल्ह्यातील सर्वाधिक स्वातंत्र्यसैनिकांचे गाव अशीही चहार्डीची दुसरी ओळख आहे. पाच-सहा वर्षांपूर्वी गावात काहीसे कलुषित वातावरण होते. मात्र गेल्या पाच-सहा वर्षांत गावाचा नूरच पालटलाय. शांतताप्रिय आणि सलोख्याने नांदणारे गाव असा चहार्डीचा ‘मेकओव्हर’ झाला आहे. सर्व जाती-धर्मांच्या लोकांच्या एकत्रित सहभागातून घडलेल्या या बदलाची दखल संयुक्त राष्ट्रात झालेल्या सादरीकरणातही घेण्यात आली आहे.

भांडण-तंटे आणि हेवेदावे हा खरे म्हणजे कोणत्याही गावाच्या विकास आणि समृद्धीतील सर्वात मोठा अडथळाच. दाखल होणा-या दिवाणी, फौजदारी आणि महसुली खटल्यांची सर्वाधिक संख्या ही गावखेड्यांतीलच. ही सगळी जळमटे बाजूला सारून सलोखा, शांतता आणि सौहार्दाच्या नव्या वाटेवर मार्गक्रमण करण्याचा निर्णय चहार्डीच्या ग्रामस्थांनी 2007च्या प्रजासत्ताकदिनी घेतला आणि एका नव्या क्रांतिपर्वाला प्रारंभ झाला. चंद्रकांत पाटील या जेमतेम दहावी शिकलेल्या वाटाड्याच्या नेतृत्वाखाली चहार्डीने नव्या उमेदीने, नव्या दिशेने वाटचाल सुरू केली. निमित्त ‘महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजने’चे होते. परंतु अठरापगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन ही वाटचाल करणे म्हणावे तितके सोपे नव्हते. जितकी तोंडे तितकीच मते आणि तितक्या प्रवृत्तीही. अशा वातावरणात हा नवा मार्ग चोखाळणे तसे जोखमीचे होते. परंतु सर्वांची मते विचारात घेतली, त्यांचा विश्वास संपादन केला तर अशक्य बाबीही चुटकीसरशी सोडवल्या जाऊ शकतात, हा वस्तुपाठच चहार्डी गावाने उभ्या महाराष्ट्राला घालून दिला आहे.

चहार्डी गावात देखणे प्राचीन महादेव मंदिर आहे. नव्या मार्गाने वाटचाल करण्याचा प्रारंभ येथूनच झाला. वर्षानुवर्षे स्थितप्रज्ञाप्रमाणे उभ्या असलेल्या या मंदिराच्या राजेरजवाड्यांच्या गडकिल्ल्यांसारख्या चिरेबंदी भिंती बोलक्या झाल्या. तंटे-बखेडे, व्यसनाधीनता, स्त्री भ्रूणहत्या, पर्यावरण संरक्षणाबाबतच्या माहितीने त्या रंगवण्यात आल्या. मग गल्लीबोळातील भिंतीही मंदिराच्या भिंतीच्या मदतीला धावून आल्या. व्यसनाधीनतेमुळे संसाराच्या राखरांगोळीचा बोलपटच त्यांनी गावक-यांसमोर मांडायला सुरुवात केली. सोबतीला अधूनमधून होणा-या कलापथकांच्या कार्यक्रमांतूनही प्रबोधन घडले. दारूच्या आहारी गेलेल्यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू झाले. तळीरामांना शिरपूर येथे नेऊन व्यसनमुक्तीसाठी उद्युक्त करण्यात आले. जवळपास 200 तळीरामांनी ‘एकच प्याला’चा नाद कायमचा सोडल्यामुळे त्यांचा गावातच सन्मानपूर्वक नागरी सत्कार करण्यात आला.

ऊठसूट पोलिस ठाण्यात जाऊन फिर्यादी गुदरण्यामुळे सरकारी यंत्रणेवरील ताण वाढतो आणि त्यावर अनाठायी खर्चही करावा लागतो. त्यातून शांतता आणि सलोख्याला बट्टा लागतो तो वेगळाच. तो टाळण्यासाठी महाराष्ट्र सरकारने महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना जाहीर केली. अदखलपात्र गुन्ह्यांचा गावच्या पातळीवरच निपटारा व्हावा, हा त्यामागचा मूळ हेतू. मात्र गावच्या पातळीवरील न्यायदानाची ही यंत्रणा कोणताही अभिनिवेश न बाळगता, जातपात व धर्म-पंथाच्या पलीकडे जाऊन धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वावर चालली तरच उद्दिष्टपूर्तीच्या दिशेने वाटचाल करणे सुकर होते. अन्यथा सगळेच मुसळ केरात जाण्याचा धोका असतो. चहार्डी गावात ग्रामसचिवालयाची देखणी इमारत आहे. येथे चालणा-या लोकअदालतीमध्ये नैसर्गिक न्यायाचे तत्त्व अंगीकारण्यात आल्यामुळेच गावात शांतता प्रस्थापित झाली, सलोख्याचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळेच एकमेकांप्रति विश्वास वाढीस लागल्यानेच नवे क्रांतिपर्व घडले. शांतता पुरस्कार तंटामुक्त गाव हा साडेबारा लाखांचा किताब चहार्डीच्या शिरपेचात खोवून इतिहासात गावाचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरण्यात आले.

चहार्डीने आपली वाटचाल केवळ तंटामुक्तीपुरतीच मर्यादित ठेवली नाही तर ग्रामसभांमधून स्त्री भ्रूणहत्या, पर्यावरण
संरक्षण, कुपोषण, बालमजुरीच्या प्रथेविरुद्ध जनजागरण करत या मोहिमांत महिलांचा सक्रिय सहभागही नोंदवून घेतला. परिणामी चूल आणि मूल एवढ्यापुरतेच मर्यादित असलेले येथील महिलांचे भावविश्व विस्तारले. त्याही हिरिरीने पुढे झाल्या. परिणामी पंचायत राज, ग्रामस्वच्छता, कुटंब कल्याण, पर्यावरण संरक्षण या क्षेत्रातही चहार्डीला भरीव कामगिरी करता आली आणि त्यामुळे विविध पुरस्कार चहार्डीच्या नावे जमा झाले आहेत. 50 बचत गटांतून या महिला विविध उपक्रमांमध्ये सक्रिय आहेत. गावातील सलोख्याच्या वातावरणामुळे त्यांना नवे आत्मभान मिळण्यास मदत झाली आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने जळगाव जिल्ह्यातील दुस-या क्रमांकाचे गाव असलेल्या चहार्डीने कात टाकली. वैराने वैर कधीच शमत नाही, त्यावर प्रेमानेच मात करावी लागते, हा संदेश चहार्डीकरांच्या नसानसात रुजल्यानेच सामाजिक शांतता आणि सौहार्दाचे ते एक आदर्श बेट ठरले आहे.

चहार्डी गावात जसे सामाजिक स्थित्यंतर घडले तशीच आधुनिकताही आली. जागतिकीकरणाने घडवलेल्या माहिती तंत्रज्ञान क्रांतीचा चहार्डीतही शिरकाव झाला. परिणामी करमणूक आणि दळणवळणाची अत्याधुनिक साधने वापरण्याकडे चहार्डीकरांचा कल वाढला. आबालवृद्धांच्या हाती मोबाइल फोन आले. घराघरात दूरचित्रवाणी आणि छतावर डीटीएचच्या छत्र्या आल्या आणि नकळतच आधुनिक जीवनशैलीचा अंगीकारही चहार्डीकरांनी केला. शेतीतही आधुनिक अवजारे, नव्या पीक पद्धतींचा वापर वाढला. त्याच्या पाऊलखुणा पावलोपावली पाहायला मिळतात. असे असले तरी सामाजिक ऋणानुबंधाची कास चहार्डीकरांनी सोडली नाही.
sureshpatil.aurangabad@gmail.com