आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परवलीच्या शब्दाची गोष्ट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पासवर्ड म्हणजे नेमकं काय हे आजच्या अद्ययावत युगातल्या लोकांना परिचित असेलच. पासवर्ड ही एक गुप्त कळ आहे एक द्वार उघडण्याची, तुमच्या संगणकामधील कार्यप्रणालीत शिरकाव करून घ्यायची. जिथे तुमचा पासवर्ड, जो फक्त तुम्हालाच माहीत आहे, तो तुम्हाला सहजपणे प्रवेश मिळवून देतो. म्हणजे यामुळे तुमच्या संगणाकावर इतर कोणी माहिती मिळवू शकत नाही.

त्या दिवशी माझी सहकर्मचारी मैत्रीण वैतागतच बोलली, “काय हे पासवर्ड प्रकरण आहे. माझं नाव, नवऱ्याचं नाव, मुलांची नावं, जन्मदिनांक, सगळं टाकून झालंय. आता काय टाकू ते सुचत नाही. बरं प्रत्येक मेनूचे वेगळे पासवर्ड आिण सारखे महिन्यामहिन्याने बदलावे लागतात.’

मला जोरात हसू आले. मी तिला म्हटलं, रिलॅक्स. तू एक काम कर. कॉलेजमध्ये असताना किती कॉलेजकुमार आवडायचे त्यांची यादी कर आिण एक के बाद नंबर लावून टाक. निदान यात ते सारखे बदलायची मुभापण आहे. नाही तरी आता काय बदलू शकतो आपण आणखी काही आिण कधीकाळच्या आवडीचा याच्यापेक्षा चांगला उपयोग तरी काय?

यावर एक जोरात हशा पिकला. पासवर्ड ही काही आजची संकल्पना नाही. ती पूर्वापार चालत आली आहे. आठवा अलिबाबा आिण चाळीस चोर कथेतील तिळा दार उघड. हाच पासवर्ड हाेता. अलिबाबाने फार चातुर्याने त्याचा उपयोग केला. गुजरातेतील द्वारका हे तीर्थक्षेत्र. इथल्या दंतकथेप्रमाणे कृष्णाला छलकपट यापासून बचाव करण्यासाठी भूमिगत व्हावं लागत होतं. त्यावरूनच कृष्णाला रणछोडदास असं नावं पडलं होतं. बेट द्वारकेच्या भूमिगत महालात तो सुरक्षित होता. त्या वेळी त्याच्या साथीदारांचा परवलीचा शब्द होता द्वार कहा. द्वार कहा म्हणजे सख्या, तू कुठे आहेस? मी आलोय संदेश घेऊन. मग त्याचा अपभ्रंश होऊन द्वारका हेच नाव त्या ठिकाणाला पडलं ते कायमचं.

पौराणिक कथा काय किंवा सध्याचं अत्याधुनिक युग काय, अहो, माणसं सगळीकडे तीच आहेत. प्रवृत्ती त्याच आहेत. इर्षा, स्वार्थ, कपट या स्थायीभावात काहीही फरक पडला नाही. युगं बदलली, पण परवलीचा शब्द हाच बचाव करतोय युगानुयुगे.

मध्यंतरी एका कामानिमित्त एका राजकीय पुढाऱ्याशी परिचय झाला. त्यांच्याशी बोलून मी खूप अंतर्मुख झाले. त्यांनाही मी चार गोष्टी सुनावल्या. म्हणजे राजकारणी लोक कामं पूर्ण करत नाहीत, अर्धवट ठेवतात. तुमच्याकडून काय अपेक्षित आहे, वगैरे. तेव्हा ते पटकन म्हणाले, अहो, सगळी कामं झाली तर आमच्याकडे तो माणूस परत येतोय कशाला? दिमाग की बत्ती जल गयी! म्हणजे आम्हा नोकरदार माणसांना कसं प्रशिक्षण असतं पटापट काम हातावेगळं करण्याचं; पण त्या नेत्यानं सूचित केलं, दुसऱ्याला मदत करा, पण पासवर्ड स्वत:कडे ठेवा.
तोच आपला पासवर्ड आपल्या सामाजिक, वैयक्तिक जीवनातही. कोणाकडे आपण किती उघडपणे, मनमोकळे बोलू शकतो, कोणाला किती सहजसाध्य आहोत. अनावश्यक लोकांना मज्जाव करण्यासाठी एक कोरा, मस्त चेहरा हाच आपला पासवर्ड नाही का? स्वत:चं सत्त्व, व्यक्तिमत्त्वाभोवतीचं रिंगण, पैसा सुरक्षित ठेवायला पासवर्डच उपयुक्त आहे.मग तुम्हाला तुमचा खरा पासवर्ड सापडला का की अजून शोधताय? मिळाला असेल तर अभिनंदन! जर शोधात असाल तर शुभेच्छा.

charushila_golam @rediffmail.com