आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवाघरचे शिरीषफूल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किती भरात येऊन बहरले आहे हे झाड
गंधाची केवढी लयलूट
साऱ्या फुलांची तळाशी रास
कशी बेभान पसरली आहेत मातीवर
स्वत:चा शेवट करताना
 
 
‘एका पावसाळ्यात’ या शिरीष पैंच्या कवितासंग्रहातल्या काव्यपंक्ती किती गूढ, उत्कट, आणि आशयघन. शिरीषताई आपल्यात आता सदेह नाहीत. अतिशय आव्हानात्मक अवस्थेत मी चिंतन करतेय. शिरीषनामक गारुड, त्यांचं अफाट लेखन, विविध साहित्यप्रकारातील हातोटी, आवाका माझ्या इवल्याशा किलकिल्या डोळ्यांनी न्याहाळते आहे. होय, सूर्याचं तेज मी नाही धरू शकत उघड्या डोळ्यांत, पण थोडेसे कवडसे जरूर आहेत माझ्यापाशी जपलेले, तेच उलगडतेय, त्यांच्याच आशीर्वादाने. विचारमंथनाची चक्रं गतिशील बनलीत, माझ्या परीने.
पित्याच्या कलेचा आणि दिलदारपणाचा वारसा ज्यांनी पुढे नेला, आणि तरीही साहित्यक्षेत्रात स्वत:चा स्वतंत्र ठसा उमटवला, त्या शिरीषताई सर्वपरिचित आहेत. एकीकडे साहित्यसम्राट बहुगुणी पिता, तर दुसरीकडे प्रेमळ व तितकीच शिस्तबद्ध, स्वाभिमानी, स्वावलंबी, शिक्षिका आई या मुशीतून शिरीष नामक अद्भुत अजब रसायन निर्माण झालं नसतं तरच नवल. 
मी आणि शिरीषमावशी (माझी आई लेखिका शरदिनी महाडेश्वर ही शिरीषताईंची सखी) हा ऋणानुबंध माझ्या बालपणापासूनचा. कपाळावर ठसठशीत कुंकवाचा टिळा, उंच सावळी हसतमुख देहकाया, सहज साधेपणाने उठून दिसणारी मूर्ती. कथा, कविता, गीते, नाट्यलेखन, आत्मचरित्र, लघुनिबंध, शब्दचित्रे, प्रवासवर्णने, वृत्तपत्रीय स्तंभलेखन अशा विविध वाङ्मयीन दालनांतून त्या लीलया संचारल्या. अत्रे घराण्याचा वर आणि शाप, यातून त्यांना मुक्ती नाही मिळाली, हे आम्हा वाचकांचं सुदैवच म्हणायला हवं. पण त्याही पलिकडे मला आठवते ती नम्र, मृदुभाषी, प्रेमळ सगळ्यांना सामावून घेणारी हळुवार शिरीषमावशी. आपल्या घरावर, संसारावर, नातवंडांवर प्रेम करणारी, बागेतल्या हरिणीवर ममता करणारी, मराठा/नवयुगच्या संपादकीय खुर्चीत असून आपलं कविमन अलवार जपणारी, अनेक नवोदित कवींच्या पहिल्यावहिल्या काव्यसंग्रहांना कौतुकाची प्रस्तावना लिहिणारी शिरीषमावशी. तसंच आईसोबत खमंग चिवडा धाडणारी पाककलापारंगत शिरीषमावशी. अशी अनेक रूपं.
 
समग्र शिरीषवाङ्मयाने वाचकांना काय दिलं, तर आनंदाची उधळण, आयुष्यातील मंतरलेले क्षण अंथरलेली वाटचाल, हाच मोलाचा खजिना.
किती क्षण बहुमोल
पावसा तू दिले मला
सांगशील काय सख्या
काही दिले का मी तुला?
एका पावसाळ्यात लिहिलेली
ही असंख्य प्रेमपत्रे
प्रीतीच्या वर्षावात भिजलेले
अनंत आर्द्र शब्द
ही न संपणारी आश्वासने
कोसळताना दिलेला धीर
पावसात चिंब नावलेली
विरहाची दीर्घ रात्र
त्यांच्या अक्षरांतून आकारलेले प्रसंग हे केवळ वाङ्मयीन न राहता त्यातील पात्रे अनंत काळापर्यंत आपली सोबत करत राहतात, त्यांच्या त्यांच्या व्याकुळतेसहित, तृष्णेसहित.
रोजचं सांसारिक व्यावहारिक जीवन प्रत्येकाच्याच नशिबी लिहिलंय, तरीही त्याला न जुमानता शिरीषताईंचा प्रवास हा आभासी, स्वप्नवत, काहीशा अंधुक अस्पष्ट जाणिवांचा मागोवा घेणारा आहे. कधीकधी असा शोध व्यर्थही ठरतो, मान्य. पण एखाद्या अद्भुत क्षणी शब्दांचा साक्षात्कार व्हावा तसं दिव्य इंद्रधनुष्य कवीच्या हाती लागतंच. ते इतकं प्रभावी आणि उत्कट असतं की, वाचकांनाही क्षणभर व्यावहारिक जगाचा विसर पडावा. निसर्गाच्या दिव्यत्वाचा स्पर्श होत शब्दांचे टिपूर दाणे अलगद कवितेच्या वहीत विराजमान होतात, रसिकांना त्याचे हिंदोळे सुखावल्याखेरीज राहात नाहीत.
 
हायकू, एक जपानी काव्यप्रकार. सरळसाध्या भाषेत सांगायचं तर तीन ओळींची कविता. निसर्गशी एकरूपता आणि त्याचा तरल साक्षात्कार, तोही जीवनातील गूढ सत्य याची उकल करणारा. नि:शब्द तरीही प्रेरित करणारा. या प्रकाराची लेखिकेला खूप भुरळ पडली आणि हायकूचं मराठीत आगमन झालं. त्यांचा ध्रुव हा हायकूसंग्रह ध्रुव ताऱ्याप्रमाणे अढळ स्थान राखून आहे. आजवरची हायकूकारांची व्याप्ती आणि प्रगती पाहता लामणदिव्याच्या उजेडात सुनेला घरात आणावं तशी ही जपानी कवितासुंदरी मराठी मुलखात आली आणि मराठी मातीत रुजली, स्वयंपूर्णतेनं मराठमोळंपण जपत राहिली.
प्रत्येक फांदीवर तरारलीय
तांबूस कोवळी पालवी
रोजची वाट, झालीय नवी
सकाळ झालीय तरी 
जळताहेत दिवे रस्त्यावर
जळून जळून रात्रभर
ठाऊक आहे तुला
तुझ्या दिशेनं साधी झुळूक येईल
तरी प्रत्येक कळीचं फूल होईल
नको रे धरूस चिमटीत
फुलपाखराचं नाजूक अंग
आधीच दुखतोय पंखावरला रंग

कवितेप्रमाणेच कथालेखिका शिरीषताईही खूप भावल्या. त्यांच्या हृदयरंग, कांचनगंगा, चैत्रपालवी, यांतल्या कथा अजूनही स्मरणात आहेत. 
किती लिहू आणि काय लिहू. गेली तब्बल ४० वर्षं जिच्या लेखणीने आमची साथसंगत केली, मनाला रिझवत राहिली, अंतर्मुख करत राहिली ती लेखणी, ती धगधग शांत झाली. शिरीषताई आपल्यात नाहीत हे मानायला तयार नाही. माझी लेखणी प्रसवताना मला भास होतोय की, शिरीषताईंची अंधुक प्रतिमा पाठीशी प्रकट झाली आहे. खांद्यावर मायेने हात ठेवत आश्वासन देते आहे, ‘अगं वेडे, मी कुठे गेलेय, मी आहे इथेच. तुझ्या आणि तुझ्यासारख्या असंख्य चाहत्यांच्या अवतीभवती. माझ्या कलाकृतींच्या रूपाने, पारिजातकाची पसरलेली रास निरखतो ना आपण, झाडापासून विलग होऊन संपुष्टात आली तरी, तशीच मी दरवळतेय तुझ्यापाशी. तू दु:ख नको करूस, हसत राहा, फुलत राहा, माझ्या लाडक्या पारिजातकासारखी दरवळत राहा.’
मी आवंढे गिळत म्हणतेय, ‘शिरीषमावशी, तू धन्य आहेस, माझी प्रेरणा अाहेस.’
 
- चारुशीला गोलम, मुंबई     
charushila_golam@rediffmail.com
बातम्या आणखी आहेत...