आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोविंद गोडबोलेंच्या पाच पुस्तकांसह येताहेत चॅटकथा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लहान मुलांसाठीचे लेखन हे तसे सर्वात अवघड समजले जाते. शिवाय, बालसाहित्याचे क्षेत्र तसे दुर्लक्षितच यात लेखन तसे आव्हानात्मकच याच क्षेत्रात गोविंद गोडबोले यांचं नाव प्रामुख्याने घेतलं जातं. आकाशवाणीवरील 30 वर्षांची नोकरी करत आणि आता सेवानिवृत्तीनंतरही गोडबोले यांची लेखन एक्स्प्रेस जोरात सुरू आहे. मुलांना आवडेल अशा फॉर्ममध्ये लिखाण करणं ही गोगोंची खासियत आहे. त्यामुळेच आता आजोबा आणि नातीतील फेसबुकवरचा संवाद ते चॅटकथाच्या माध्यमातून आणणार आहेत.

आकाशवाणीवर 14 वर्षे संहिता लेखन आणि नंतर 16 वर्षे कार्यक्रम अधिकारी म्हणून काम करताना गोगोंनी लेखन क्षेत्रात मोठी कामगिरी केली आहे. त्यासाठीही त्यांनी मुलांसाठीच्या लेखनाचा निर्णय घेतला. त्यांनी प्रारंभी नवसाक्षरांसाठी 33 पुस्तकं लिहिली. आतापर्र्यंत त्यांनी 77 पुस्तके लिहिली आहेत. यातील गोगो गोष्टी, हा वारसा तुमच्यासाठी आणि गोष्टीची गोष्ट या तीन पुस्तकांना महाराष्ट्र राज्य शासनाचे पुरस्कार मिळाले आहेत. आजरा येथे झालेल्या बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही गोडबोले यांनी भूषवले आहे. निवृत्तीनंतरही गोगोंनी आपले लेखन सुरू ठेवले असून लवकरच त्यांची 5 पुस्तके बाजारात येणार आहेत. वयात येणा-या मुलींच्या आयुष्यावर नवी कादंबरी, एलियन एलियन हे बालनाटक, फेसबुकवरच्या चॅटकथा तसेच बालकविता आणि आजोबांच्या गोष्टी हा बालकथासंग्रह प्रकाशित होणार आहे.

एक रुपयात पुस्तक : लहान मुलांसाठी चित्रे आणि कथा यांचा समावेश असलेलं एक रुपयाचं पुस्तक गोडबोले यांनी काढलं आहे. खाऊच्या पैशातून पुस्तक या संकल्पनेतून त्यांनी खिशात मावणा-या या पुस्तकाच्या 71 हजार प्रती लहान मुलांना वितरित केल्या आहेत.

शब्दांकन : समीर देशपांडे