आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रिय पावसा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स. न. वि. वि.
या वर्षी तरी तू तुझ्या वेळेस भेटायला येशील म्हणून डोळ्यात प्राण आणून तुझी वाट पाहत होते. पण तू नेहमीसारखा याही वर्षी उशिराच आलास. आता हे तुझं नित्याचंच झालं. नेहमी नेहमी उशिरा येऊन तुला तुझं महत्त्व तर वाढवायचं नसतं ना? अरे, पण उशिरा येऊन स्वत:चं महत्त्व वाढवून घेणं, हे माणसाचं काम आहे, तुझं नाही. असं वाटतं तुलाही आजकाल माणसाच्या सवयी लागल्यात की काय?
बरं, उशिरा आलास तो आलास, चार दिवस भेटलास आणि गेलास निघून परत. पुन्हा तेच तुझी वाट पाहणं. जीव टांगणीला लागला रे. तुझ्याविना माझी काय दैना होत आहे, याचा तरी विचार करायचा ना जरा. अंगणातली विहीर कोरडी, शेतातली विहीर कोरडी, नदी, नाले कोरडे. सगळंच कसं ओसाड, उजाड दिसतं. देहाची लाही लाही होते रे. चार दिवस आलास म्हणून शेतकऱ्यांनी माझ्यावर मोत्यासारख्या बी-बियाण्यांचा वर्षाव केला. त्याला कोंबही फुटले, पण तुझ्या परत जाण्याने ते कोमेजतात रे. आता जर तू त्या कोंबांना परत प्रेमाने शिंपलं नाहीस तर मरतील बिचारे ते आणि या मरणाऱ्या कोंबांबरोबर अनेक जीव जातील, अनेक संसार उद्ध्वस्त होतील. अनेकांचं बालपण करपेल. असा कसा रे निर्दयी तू, पण मला तसं वागता येणार नाही. मला तुझ्यासारखं कठोर होऊन चालणार नाही. कारण माझा तो धर्म नाही. एका बीजातून हजारो दाणे निर्माण करणे हेच माझं काम, हाच माझा धर्म. काही स्वार्थी माणसांनी माझ्यावर अनेक आघात केले तरी मी माझी निर्मिती सोडू शकत नाही. पण त्याला तुझी साथ हवीच ना?
तसाही तू आजकाल काही स्वार्थी माणसासारखा झालायस बेभरवशाचा! मनाला वाटेल तसा वागतोस. केव्हाही येतो, केव्हाही जातो, एखाद्या ठिकाणी एवढा मुक्कामाला थांबतोस की नकोसं वाटतं. अरे, वर्षभर जरी आपण सोबत राहत नसतो तरी, चार महिन्यांचा आपला सहवास प्रत्येक जिवाला सुखावून जाणारा असतो. पण आताशा तुझ्या लहरी वागण्यामुळे माझं अस्तित्वच धोक्यात आलं.
एक तर येतच नाहीस किंवा आलाच तर बेभान होऊन येतोस. मला बिलगून बसलेल्या वृक्षवेलींना उन्मळून टाकतोस. माझ्या अंगखांद्यावर खेळणाऱ्या पिकांची नासाडी करतोस. जे माझ्या सोबतीने पीक घेऊन जगाला पोसतात, त्यांनाच त्रास देतोस, तुला जराही त्यांची कीव येत नाही? मग हेच माझे सोबती मरणाला जवळ करतात! पण यांच्या मरणाला तूच जबाबदार आहेस हे विसरू नको पावसा!
पूर्वी कसा तीनचार दिवस निवांतपणे मुक्कामाला यायचास. तुझ्या हळुवार स्पर्शात मी चिंब भिजून जायचे. मग तुझ्याच कृपेने ल्यालेला तो हिरवा शालू. अहाहा. काय वर्णन करावं त्या माझ्या रूपाचं. सगळंच कसं अप्रतिम होतं.

पण आता आपल्यातला संवादच कमी झाला. जेव्हा केव्हा तू येतोस ते रौद्र रूप घेऊनच! कधी तुझ्या सोबत तो सोसाट्याचा वारा असतो, तर कधी कडकडाट करत अनेकांचे जीव घेणारी ती वीज असते. अरे ये कधी तरी शांत, िनवांत, आरामात बसू, एकमेकांची सुखदु:खं वाटून घेऊ. एकमेकांशी मनातलं बोलून मन मोकळं करू, आयुष्यात राहून गेलेले हळवे क्षण एकमेकांसोबत घालवू...

तुझीच
पृथ्वी
बातम्या आणखी आहेत...