आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फसवणूक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टप्पोरे डोळे, हातात भरलेला चुडा, महागडा पंजाबी ड्रेस- एकंदरीत आधुनिक राहणी! जस्मिन माझ्यासमोर बसली होती. तिच्या सुंदर चेह-यावरची काळजी लपत नव्हती!
तिच्या लग्नाला जेमतेम एक महिना झाला होता आणि तिला आता कळलं होतं की तिच्या नव-याचं अफेअर आहे! प्रत्यक्ष त्याच्या गर्लफ्रेंडशीच तिचं बोलणं झालं होतं! मी ऐकतच राहिले. साधारण आठवडाभरापूर्वी माझ्याकडे आलेली आभा मला आठवली. सावळ्या सतेज वर्णाची आणि तरतरीत चेह-याची आभा! दुर्दैवाने जस्मिन आणि आभा दोघीही एकाच कहाणीचा हिस्सा होत्या. त्यातलं तिसरं महत्त्वाचं पात्र होतं - तो! हसतमुख, स्मार्ट, बघतच क्षणी दुस-यावर छाप पडणारा!

जस्मिन आणि तो तीन वर्षांपूर्वी एका आयटी कंपनीत भेटले. दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले. नंतर अधिक चांगली संधी मिळाली म्हणून ती पुण्याला गेली, तर त्याने स्वत:ची कंपनी सुरू केली. अर्थात त्यांच्यातील प्रेम मात्र कमी झालं नाही. साधारण वर्षभरापूर्वी त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. याच दरम्यान साधारण 8 -9 महिन्यांपूर्वी आभा त्याची जुनियर म्हणून रुजू झाली. आभा अतिशय हुशार होती. कंपनीत त्या लेव्हलवर काम करणारी ती एकटीच मुलगी! किती तरी प्रेझेंटेशन, डीलिंग्जमध्ये आभाची त्याला मोलाची मदत होत होती. कामाच्या निमित्ताने दोघंही सतत बरोबर असत. त्यातूनच दोघात नाजूक बंध निर्माण झाले. त्यांच्यात शारीरिक संबंधही निर्माण झाले. आभाच्या दृष्टीने ते दोघं आता एक कमिटेड कपल होते. एकदा आभाने सहज त्याचा फोन पाहिला असता तिला एका मुलीचे बरेच एसएमएस आढळले. तिने चौकशी केली असता ती आमच्या फॅमिली फ्रेंडची मुलगी आहे. ती माझ्या खूप मागे लागली आहे; पण मला तिच्यात इंटरेस्ट नाही, असे त्याने सांगितले.

गेल्या 3-4 महिन्यांत मात्र त्याच्या वारंवार पुण्याला खेपा होत होत्या. त्याबद्दल विचारणा केल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली; पण आभाने खोदून विचारल्यावर मात्र सांगितले की, ती मुलगी ऑस्ट्रेलियाला जाणार आहे, तिच्या कागदपत्रांबाबत मदत करायला जावं लागतं. तिच्या कुटुंबाचे त्याच्यावर फार उपकार आहेत, त्यामुळे तो तिला टाळू शकत नाही. त्यावर आभाने त्याला तिच्याशी ओळख करून द्यायला सांगितली; पण त्याने टाळाटाळ केली.

अचानक महिनाभरापूर्वी तो कामानिमित्त मुंबईबाहेर गेला. सुरुवातीला तो फोनवर संपर्कात होता; पण नंतर तर तो फोनही घेईनासा झाला. आभा सतत त्याचा फोन ट्राय करत राहिली आणि एकदा तो फोन उचलला गेला! तो फोन जस्मिनने उचलला होता! तो फोन आल्यापासून जस्मिनच्या पायाखालची जमीनच सरकली होती. अनपेक्षितपणे येऊन आदळलेल्या या परिस्थितीचा सामना ती करू शकत नव्हती. जस्मिनची केस स्वीकारण्याआधी, आभा माझ्याकडे येऊन गेल्याचं तिला सांगणं नैतिकदृष्ट्या अतिशय आवश्यक होतं, मी तिला ते सांगितलं. मात्र, तिच्या संतापाचा स्फोट झाला. माझ्या आयुष्यात माती कालवली, तिला कसली मदतीची गरज पडली आहे? जस्मिन, मी म्हटले, अगं तीसुद्धा तुझ्याबद्दल नेमकं असंच म्हणत होती. उपकाराच्या ओझ्याखाली दबवून तू त्याला लग्न करायला भाग पाडलंस म्हणून! उपकार? आमचं प्रेम होतं! ती म्हणाली. हो, आभाच्या म्हणण्यानुसार त्यांचंही एकमेकांवर जिवापाड प्रेम होतं! मी म्हटलं, जस्मिन, तुला कळतंय का? तुम्हाला दोघींनाही फसवलंय त्याने! तिला कळत होतंच; पण वळत मात्र नव्हतं. साहजिकच आहे, आभाचीही अवस्था काहीशी अशीच नव्हती का झाली!

असंही ज्या माणसाला आपलं सर्वस्व दिलं त्यानेच आपल्याला फसवलं हे स्वीकारणं कुणालाही कठीणच असतं. आपण कुठे तरी कमी तर पडत नाही नं असा न्यूनगंड मनात डोकावू लागतो. कुठे तरी तुमच्या स्वप्रतिमेला धक्का पोहोचत असतो. आणि यातूनच एक बचाव म्हणून त्या दुस-या स्त्रीची प्रतिमा डागाळली जाते! आभा आणि जस्मिन नेमकं हेच करत होत्या. आपल्या प्रियकराला आपल्यापासून हिरावून घेणा-या खलनायिकेच्या रूपात त्या एकमेकींना पाहत होत्या. गंमत म्हणजे दोघींचा जिवलग त्यांच्याशी प्रतारणा करत असताना त्या दोघींच्या रागाचा रोख मात्र प्रामुख्याने एकमेकींवरच होता. त्या एकमेकींना प्रतिस्पर्धी समजू लागल्या होत्या. आपल्या नात्यातील अस्थिरता त्यांना भेडसावत होती.
जस्मिनला तिच्या नव-याच्या विवाहबाह्य संबंधांना कोणत्याही प्रकारे ती जबाबदार नाही हे पटवून द्यावे लागले. तिचे विचार, भावना आणि वागणं या सगळ्याचा केंद्रबिंदू तिचा नवरा आणि त्याची प्रेयसी हाच झाला होता. त्यामुळे तिचं स्वत:कडे पार दुर्लक्ष झालं होतं. तिला परत स्वत:ला केंद्रस्थानी मानण्यासाठी उद्युक्त करावं लागलं. तिच्या जोडीदाराच्या दुस-या नातेसंबंधामुळे तिच्या आयुष्यातील कोणत्या गोष्टींवर परिणाम झाला आहे किंवा होऊ शकतो - ज्यात ब-याच आर्थिक आणि व्यावहारिक बाबी समाविष्ट होत्या - त्याचा आढावा घ्यावा लागला. त्याचबरोबर आभालाही हे समजवावं लागलं की तिच्या आयुष्यातल्या काही महत्त्वाच्या बाबींपैकी एक म्हणजे तिचा प्रेमसंबंध! परंतु त्याशिवायही तिच्या आयुष्यात बरंच काही आहे जे तितकंच महत्त्वाचं आहे! आणि तिला त्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. लग्नाआधीच तिला त्याचं खरं स्वरूप कळलं हे तिच्या दृष्टीने चांगलंच झालं याची तिला जाणीव करून दिली.

आभा आणि जस्मिनच्या बाबतीत त्यांची उत्तम व्यावसायिक कारकीर्द ही एक मजबूत बाजू होती आर्थिक स्वातंत्र्यही ब-यापैकी होतं. दोघींच्याही कुटुंबांचं त्यांना सहकार्य होतं. जस्मिनच्या बाबतीत तर कायदेशीर हक्कही तिच्या बाजूने होतेच. या सगळ्याचा फायदा त्यांना या परिस्थितीला यशस्वीपणे तोंड देण्यासाठी निश्चितच झाला. अर्थात मनावरचे घाव बुजण्यासाठी वेळ हा लागतोच! जस्मिनच्या मनात लग्नसंबंधांबद्दल एक कडवटपणा निर्माण झाला आहे, तर आभाला तिच्या लग्नपूर्व शारीरिक संबंधांबद्दल काहीशी अपराधीपणाची भावना अद्यापही आहे. मात्र, आज जीवनातील अनेक अपघातांपैकी हाही एक अपघात होता हे स्वीकारून त्यांनी आपली वाटचाल पूर्वीइतक्याच उमेदीने पुढे चालू ठेवली आहे!


mrudulasawant13@gmail.com