आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहज बरे करता येतात जन्मजात वाकडे पाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साधारणत: एक हजार जन्मांपैकी 1 ते 2 मुलांमध्ये जन्मत:च पाय वाकडे असतात. हे प्रमाण मुलींपेक्षा मुलांमध्ये जास्त आढळून येते. 50 टक्के बाळांमध्ये दोन्ही पायांत वाकडेपणा असतो. ही व्याधी बरी करता येण्याजोगी असून ही मुले पूर्णपणे सर्वसामान्य आयुष्य जगू शकतात. समाजात असलेल्या गैरसमजामुळे या मुलांना उपचारांपासून वंचित राहावे लागते आणि आयुष्यभर अपंगत्वाचा सामना करावा लागतो.
या आजाराची अनेक कारणे असून खालीलपैकी काही कारणे साधारणत: सांगितली जातात.
कारणे :
बाळाची गर्भाशयातील स्थिती : गर्भाशयात बाळ अधिक काळ त्या स्थितीत असल्यास पाय वाकडे राहतात.
नसांचा वा स्नायूंचा आजार : जन्मत: नसांची कमजोरी अथवा स्नायूंचा ताठपणा असल्यास पाय वाकडे होतात.
मणक्याचा आजार : मणक्याच्या आजारामुळे पायांत ताकद नसते किंवा स्नायू ताठरतात व पाय वाकडे होतात.
इतर काही व्याधी (सिंड्रोम्स) -एएमसी.
निदान : याचे पूर्णपणे clinical असून उपचाराआधी बाळाची संपूर्ण तपासणी करणे गरजेचे असते.
बाळाचे पाय जन्मत:च घोट्यापासून वाकडे असतात.
पायांची हाडे आत वळलेली असतात.
पायांचे स्नायू कडक वा ताठारलेले असतात.
घोट्याच्या मागील स्नायू (tendoacbilies) आखूड वा ताठरलेला असतो.
तपासणी : पायाचा एक्स-रे काढून हाडांच्या स्थितीचा व आजाराच्या गंभीरतेचा अभ्यास केला जातो. स्नायूंचा अभ्यास करून त्यातील ताठरपणा तपासला जातो. शरीरातील इतर सांध्यांचादेखील अभ्यास करणे गरजेचे असते. अभ्यासावरून असे सिद्ध झाले आहे की, 18 टक्के बाळांमध्ये इतर सांध्यांतसुद्धा दोष असू शकतो. उदा. जांघेचा अथवा गुडघ्याचा सांधा निखळलेला किंवा कडक असू शकतो. मणक्यामध्ये दोष असू शकतो.
उपचार : हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो व ही मुले सर्वसामान्य आयुष्य जगू शकतात. याचा उपचार दोन प्रकारे करता येतो.
1. प्लास्टर
2. ऑपरेशन
सध्या प्लास्टरची जी पद्धत अवलंबली जाते. त्यास ponseti casting म्हणतात. ही पद्धत जगात सर्वमान्य असून याचे यशस्वी होण्याचे प्रमाण अधिक आहे. या पद्धतीचा अभ्यास मागील 65 वर्षांहून अधिक काळापासून केला गेला आहे. यामध्ये दर आठवड्यातून एकदा प्लास्टर बदलला जातो. प्रत्येक आठवड्यात टप्प्याटप्प्याने थोडा थोडा फरक जाणवतो. साधारणत: 4-5 वेळा प्लास्टर बदलावे लागते. शेवटच्या प्लास्टरच्या वेळी एका छोट्या ऑपरेशनची गरज भासू शकते. हे बिनटाक्याचे ऑपरेशन असून यात कसलाही रक्तस्राव होत नाही. पाय पूर्णपणे सरळ झाल्यानंतर प्लास्टर काढून विशिष्ट प्रकारचे बूट (splint) वापरण्यासाठी दिले जातात. ज्यांच्यामध्ये प्लास्टरने पाय सरळ होत नाहीत किंवा व्यंग परत उद्भवला आहे. त्या रुग्णास ऑपरेशन हा उपाय असतो. ऑपरेशनमध्ये कडक असलेले स्नायू सैल केले जातात व सरकलेली हाडे पूर्ववत जागेवर आणली जातात. ज्यांच्यामध्ये खूप कडकपणा आहे. त्यांना पायास बाहेरून मशीन लावून (external fixator) पाय सरळ केले जातात. ऑपरेशनमध्ये काही प्रमाणात रक्तस्राव होऊ शकतो व जखम भरण्यास काही कालावधी लागतो.
उपचारानंतर घ्यायची काळजी : प्लास्टर वा ऑपरेशननंतर सरळ झालेला पाय तसाच ठेवण्यासाठी काही काळजी घ्यावी लागते. गर्भाशयात असल्यापासून पायाची वाकडे असण्याची प्रवृत्ती जाण्यास काही काळ लागतो. याकरिता उपचारानंतर विशिष्ट प्रकारचे बूट (splint) बाळास घालावयास दिले जातात. सुरुवातीचे हे बूट 24 तास वापरावे लागतात. हळूहळू याचा कालावधी कमी केला जातो. जर हे बूट वापरले नाही, तर व्यंग पुन्हा उद्भवू शकते. म्हणून दिलेल्या बुटांचा वापर आवश्यक आहे.
जन्माआधी निदान होऊ शकते काय?
होय! जन्माआधीच्या सोनोग्राफी (antenatal scan) तपासणीमध्ये याचे निदान होऊ शकते; पण हे निदान 100 टक्के होईलच याची खात्री देता येत नाही. बाळाची गर्भाशयातील स्थिती व सोनोग्राफी करते वेळेस बाळाची होणारी हालचाल यावर याचे निदान अवलंबून आहे. याचे निदान गर्भाच्या 20 व्या ते 24 व्या आठवड्यानंतर अधिक अचूकरीत्या होऊ शकते.
गैरसमज
या आजाराबद्दल खूप गैरसमज आपल्या समाजात आहेत.
एकदा वाकडे असलेले पाय सरळ होऊच शकत नाहीत.
प्लास्टरने पायांची वाढ थांबते व पाय बारीक होतात.
एका संततीत हा आजार असल्यास तो दुसर्‍यातही होतोच.
हा आजार पूर्व जन्मीच्या पापाची शिक्षा आहे.
उपचार सुरू करण्याची योग्य वेळ
जन्मानंतर जितक्या लवकर उपचार सुरू केला जातो, त्यावर लागणार्‍या प्लास्टरची संख्या अवलंबून असते. लवकर उपचार सुरू केल्यास कमी प्लास्टरमध्ये चांगला फरक दिसून येतो.
drvishalchandk@gmail.com