आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'जीनियस' येती घरा...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माणसाला नेहमी कला आणि विज्ञान या दोन्ही क्षेत्रांत घडणाऱ्या नावीन्यपूर्ण गोष्टींचं अप्रूप वाटत आलं आहे. तो नेहमीच त्या निर्माण होणाऱ्या नव्या गोष्टीकडे आकर्षित झाला आहे. जगात या नावीन्यपूर्ण गोष्टी घडतात तरी कशा? त्यामागे असणारे मेंदू हे सर्वसामान्यांच्या मेंदूपेक्षा वेगळे असतात का? एखादी गोष्ट जाणून घेण्यासाठी त्यांच्यातली चिकाटी इतरांपेक्षा वेगळी का असते? असे अनेक प्रश्नही माणसाला पडत आले आहेत. या प्रश्नांच्या उत्तराच्या शोधात झपाटल्यासारखं कार्य करणारी आणि इतरांना प्रकाश देणारी ही माणसं बघितली, ऐकली किंवा वाचली, तर सहजपणे त्यांना ‘जीनियस’ असं संबोधनही सामान्य माणूस देत आला आहे. अशा विलक्षण आयुष्य आणि कर्तृत्व गाजवलेल्या जीनियस व्यक्तींचा जीवनपट ज्येष्ठ लेखक अच्युत गोडबोले आणि दीपा देशमुख यांनी शब्दबद्ध केला आहे. यंदाच्या दिवाळीत या जग बदलणाऱ्या ७२ लोकांची एक टीम १२-१२च्या संख्येनं वाचकांच्या भेटीला येणार आहे.
यात आधुनिक खगोलशास्त्राचा ‘पितामह’ म्हटला जाणारा गॅलिलिओ असणार आहे. त्यानं पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते, असं म्हटलं आणि गतीच्या नियमापासून अनेक गोष्टी प्रयोगानं सिद्ध केल्या. पण त्या वेळच्या सनातन्यांचा रोषही ओढवून घेतला. न्यूटन म्हटलं की गुरुत्वाकर्षणाचा शोध, हे आपल्याला ठाऊकच आहे; पण याच न्यूटननं गणित या विषयाशी साधर्म्य साधून आपल्या बुद्धिमत्तेचा दरारा पुढची कित्येक दशकंच नव्हे तर शतकं टिकवला, हेही वाचणं वाचकांसाठी रंजक ठरणार आहे. तसंच शास्त्रज्ञ हा शब्द उचारला, की ताबडतोब आइन्स्टाइन याचं नाव आपल्या ओठांवर आपोआप येतं. आइन्स्टाइनविषयी तर मोजता येणार नाहीत एवढी पुस्तकं, एवढ्या फिल्म्स बनवल्या गेल्यात; पण त्या माणसाविषयीचं आकर्षण कमीच होत नाही. त्याच्या अनेकविधी किश्श्यांबरोबर त्यानं लावलेले शोधही आपल्याला सोप्या पद्धतीनं इथं वाचायला मिळणार आहेत. अपंगत्वावर मात करून आपल्या संशोधनानं जगभर प्रसिद्ध असलेल्या स्टिफन हॉकिंगची भेटही होणार आहे.

पूर्वी अनेक औषधोपचार नसलेले रोग साथीच्या रूपात येऊन जगभर धुमाकूळ घालत आणि हजारो नव्हे, तर शेकडो लोकांचे प्राण घेत. अशा वेळी अशा रोगांवर औषधं शोधून त्यांना या जगातून पिटाळून लावणारे जेन्नर, फ्लेमिंग, कॉख यांसारखे वैज्ञानिकही इथेच आपल्याला भेटणार आहेत. पाश्चरायझेशनचा शोध लावणारा लुई पाश्चरही ‘जीनियस’मधून दाखल होणार आहेत.

भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या दोन्ही क्षेत्रांत दोनदा नोबेल पारितोषिक मिळणारी मेरी क्युरी आपल्याशी ‘जीनियस’मधून गप्पा मारणार आहे. तिच्या आयुष्यातल्या संघर्षाची गाथा वाचली, तर तिचं आकाशाएवढं विशालपण आपल्या मनात मावू शकणार नाही, असं आहे. त्याच वेळी लीझ माइट्नर या स्त्री-वैज्ञानिकाला मात्र १५ वेळा नोबेल पारितोषिकासाठी नामांकन होऊनही, केवळ स्त्री असल्यानं डावलण्यात आलं, तरीही तिनं स्वत:ला कसं सिद्ध केलं, हा प्रवास ‘जीनियस’ उलगडणार आहे. हायड्रोजन बॉम्बचा जनक जे. रॉबर्ट ओपेनहायमर आणि उघड्या डोळ्यांनी बॉम्बस्फोटाचं दृश्य पाहणारा रिचर्ड फाइनमन यांचं कार्य आणि आयुष्यपट बघणं, हा एक आनंददायी आणि रोमहर्षक भाग आहे.

‘जीनियस’ ही दिवाळीत येणाऱ्या १२ पुस्तकांची मालिका विद्यार्थ्यांना तर नक्कीच उपयोगी ठरणार आहे; पण त्याचबरोबर शिक्षक, पालक, उद्योजक, गृहिणी आणि कोणाही माणसाला, ज्याला जगाविषयी कुतूहल आहे, अशा सगळ्यांच्याच ज्ञानवृद्धीत भर टाकणारी आहे. हा उपक्रम मनोविकास प्रकाशनानं हाती घेतला आहे. त्यातही प्रत्येक पुस्तकाच्या मिळकतीतले २० रुपये दुष्काळग्रस्तांना मदत म्हणून देण्याचं ‘मनोविकास’ने ठरवलं आहे.- चिन्मय अजित आचार्य
(chinmayachaya28@gmail.com)

पुढील स्लाइड्‍सवर वाचा इतर दर्जेदार पुस्तकांचे परीक्षण...