आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अ‍ॅलिसची अक्षर मैफल!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अ‍ॅलिस मन्रोच्या कथा कथेतल्या पात्रांची रोजनीशी वाचावी, तशा पुढे सरकतात. त्यात विलक्षण लय असते व त्या लयीत वाचक कधी सामावून जातो, त्यालाच कळत नाही. मग मैफल कधी द्रूत होते तर कधी विलंबित; पण तालात पुढे सरकते. त्यात केवळ घटना नसतात, तर घटना व पात्रांमध्ये अवकाश व्यापलेले असते. केवळ लौकिक जीवनाचे नाही, तर त्यातील भावभावनांच्या असंख्य सुरावटींचे. त्या घटनाही कधी काही क्षणात घडतात, तर कधी कित्येक वर्षांच्या अंतराने, अगदी सहजपणे, वाचकाच्या जाणिवेतल्या अंतर्गत स्थल-कालाचे भान भेदून जात! आणि मैफल संपते, पण तो राग वाचकाच्या मनात घोळत राहतो, जणू त्या कथेतल्या पात्रांचे जीवन पुढे सरकलेले असते, असंख्य शक्यतांच्या धांडोळ्यात!
ओतप्रोत भरलेले जीवन आणि जीवनेच्छा हा अ‍ॅलिस मन्रोच्या कथांचा गाभा आहे. त्यामुळेच त्यांच्या गेल्या वर्षी प्रसिद्ध झालेल्या कथासंग्रहाचे नाव ‘डिअर लाइफ’ आहे आणि या सर्व लघुकथा आहेत. किंबहुना अ‍ॅलिस मन्रोनी कायमच लेखनाचा हाच फॉर्म वापरलेला आहे. त्यांची प्रत्येक लघुकथा एखाद्या कादंबरीप्रमाणे वाटावी, इतकी भरगच्च असते. जीवनातल्या वास्तवाचा वेध घेताना, त्या वास्तवाच्या पलीकडे असणा-या जीवनाच्या सुप्त आकांक्षा, मनातल्या असंख्य धुमा-यांना त्या अगदी सहज स्पर्श करतात. एखादी घटना, एखादी व्यक्ती, एखादी परिस्थिती माणसाचे जीवन आमूलाग्र बदलते. परंतु तो बदल तितक्याचे आवेगाने परिस्थिती शोषत नाही. मग परिस्थिती व्यक्तीचे जीवन जगू लागते. व्यक्तींचे जीवन त्या केंद्रबिंदूपासून आवर्तने घेत लाटांसारखे पुढे सरकते. परंतु जीवनाच्या केंद्रबिंदूत बदल होत नाही. त्यातून सुटका करून घेण्याचा व्यक्ती आटोकाट प्रयत्न करते. तिच्यासाठी तो मुक्तीचा मार्ग असतो. बंधन आणि मुक्तीच्या हिंदोळ्यांवर आठवणींचा कॅन्व्हास, जीवन जसे पुढे सरकते, तसे रंग बदलू लागतो. ‘म्युटेट’ होतो...
‘डिअर लाइफ’मधल्या एका कथेतील विविअन क्षयरोगी मुला-मुलींची शिक्षिका म्हणून शहरापासून दूर असणा-या एका वसतिगृहात येते. शहरापासून दूर असणारं, काहीसं एकलकोंडं, रुग्णांच्या वेदनांनी व अकाली निधनानं मुसमुसणारं हॉस्पिटल. काही परिचारिका व त्यांचा प्रमुख असलेला एक वयाने मोठा असलेला, परंतु रुबाबदार डॉक्टर. हाडे गोठवून टाकणारा हिवाळा. त्या हिवाळ्याच्या व जीर्ण पाचोळ्याच्या श्वेतकृष्ण वातावरणात भावना मात्र गोठत नाहीत, त्या जगण्याची पालवी शोधू लागतात. विविअन डॉक्टरच्या प्रेमात पडते. नकळत, अपरिहार्यपणे. किंबहुना, असेही म्हणता येईल की, डॉक्टरचे असणे प्रेमात पडण्याची गरज निर्माण करते किंवा कदाचित विविअनला झोकून द्यायचे असते. कशात तरी! कदाचित सुखासाठी! डॉक्टर तिला लग्न करण्याचे वचन देतो. त्या मोबदल्यात ती तिचं कौमार्य. लग्न करण्यासाठी ते त्या जागेपासून दूर एका शहरात जाऊ लागतात. गाडी अशी पुढे सरकू लागते, तशी विविअनची स्वप्ने बदलू लागतात. शहर येते; बहुतेक डॉक्टर चर्च शोधत असावेत, असे तिला वाटते. डॉक्टर प्रत्यक्षात घेऊन येतो विविअनच्या परतीची दोन तिकिटे. विविअनला रेल्वे स्थानकावर सोडतो. विविअन शून्यात बघत राहते. कदाचित डॉक्टर परत येईल या आशेने. गाडी येते. विविअन गाडीत बसते. तिला बसावेच लागते. वास्तविक एखादी कथा इथे संपली असती; परंतु मन्रो ‘फास्ट फॉर्वर्ड’ करते आणि येऊन ठेपते, विविअनच्या मध्यमवयात!
‘पुढे कित्येक वर्षे मला वाटत होते तो भेटावा. मी जगत होते आणि अजूनही जगते आहे. टोरेन्टोमध्ये. मला नेहमीच वाटत आले आहे, सगळी माणसं केव्हा ना केव्हा तरी टोरेन्टोमध्ये येतात, याचा अर्थ असा नव्हे की, ती व्यक्ती तुम्हाला भेटलेच. अर्थातच कसेही करून तुमची भेटण्याची इच्छा असेल तरच. पण शेवटी ते घडले...’ ‘कशी आहेत?’ त्याने विचारले, मी म्हणाले, ‘ठीक’ आणि जरा अधिक जोर देऊन ‘उत्तम’! तो उत्तरला ‘चांगले आहे.’ काही क्षणांपुरते मला वाटले की, गर्दीतून वाट काढून काही क्षणांपुरते का होईना, आम्ही एकत्र असू, पूर्वीसारखे. परंतु ‘तसे’ काहीच घडले नाही. मी आजही ‘त्या’ क्षणातच स्थिरावलेली आहे. प्रेमात खरोखरच काहीच बदलत नाही.’
आपल्या बहुतेक कथांत स्त्रीचे मनोज्ञ भावविश्व रेखाटणारी मन्रो लौकिकार्थाने स्त्रीवादी लेखिका नाही. स्त्रीचे जीवन, किंबहुना स्त्रीच्या दृष्टिकोनातले जीवन तिला अधिक जवळचे वाटते; परंतु ते तिचे उद्दिष्ट नाही. माणसाच्या स्वभावाचा, त्यातील स्रोतांचा त्रयस्थपणे वेध घेताना, त्या पात्रांच्या जीवनाशी तादात्म्य पावण्याचा तिचा प्रयत्न आहे. नैतिकतेच्या चौकटीत न अडकता. त्यामुळे स्त्री-पुरुष संबंधातले प्रस्थापित निकष न मानताही, त्यातील गुंतागुंत तिला मांडायची आहे. हाडामासाच्या माणसांच्या भावनेत डोकावणारे जीवनाचे अस्तित्व उतारवय, आजारपणे, धूसर होत जाणा-या आठवणी, ‘लोकांची आयुष्ये कंटाळवाणी, सरळ, आकर्षक आणि अगम्य असतात; कोरलेल्या खोल गुहांप्रमाणे.’ मन्रो नमूद करते. एरवी, मन्रोच्या कथा कोणताही निष्कर्ष मांडत नाहीत. निर्णय देत नाहीत. कुणाची बाजू तर कधीच घेत नाहीत. आयुष्यातली व्यामिश्रता मांडण्याचा मात्र शब्दा-शब्दांत प्रामाणिक प्रयत्न करत राहते...
मन्रोचा जन्म 40च्या दशकातला. तिच्या कथांमध्ये युद्धाचे संदर्भ येतात. धर्माचे संबंध येतात व माणसाच्या आयुष्यातले वेळेचे संदर्भ येतात. ‘तरुणांचे युद्धात मरणे हा एक धक्काच होता आणि तरीही वातावरणात एक ऊर्जा होती आणि लोकांच्या खिशात पैसे होते.’ ‘आयुष्यातल्या अनेक गोष्टींप्रमाणेच माझ्या बाबतीत निश्चित काहीतरी असणार.’ ‘मी गोष्टींबाबत योग्य वेळी विचार करत नाही. मला नेहमीच असे वाटते, अजून खूप अवकाश आहे.’ हे त्याचे काही कवडसे.
मन्रो कथेचा पाठलाग करत नाही. कथाच कथेला उलगडत जाते. सर्वच काही आलबेल होईल, वा व्हावे, असाही मन्रोचा आग्रह नसतो. जीवनातल्या अनपेक्षित वा ब-याच वेळेस दु:खद वळणांनाही तिच्या दृष्टिकोनातून महत्त्व आहे. पण ती पात्रांची ‘नियती’ नव्हे; जीवनाच्या समग्रतेपासून, करुणेपासून व प्रेमापासून तोडले गेलेली. तो एक जीवनाचा भाग आहे, मृत्यूप्रमाणे त्याला मर्यादितच स्थान आहे व त्याचे उल्लेखही तिच्या कथांमध्ये तसेच येतात. वृद्धत्व, एकाकीपण तिला अस्वस्थ करते, पण ती अस्वस्थता कथेत डोकावत नाही. तिच्या ‘प्राईड’ या कथेत दोन एकाकी, शहराच्या तरुण गजबजाटापासून अलग झालेल्या वृद्धाची कथा आहे. त्याने जाणूनबुजून कोणाच्याही दयेपासून स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी कोणाशीही मैत्री केलेली नाही. परंतु अनवधानाने, काहीशा निरीच्छेने तो वनिदा नावाच्या वृद्धेशी मैत्री करतो. तरीही त्याला तिच्याबरोबर राहणे मान्य नसते. एके दिवशी, वनिदा काहीशा नैराश्यग्रस्त स्वरात त्याच्याशी बोलू लागते आणि अचानक उडी मारते. खिडकीबाहेर तिने काही तरी पाहिलेले असते. पक्ष्यांनी भरलेले. काळ्या-पांढ-या. अतिवेगात धुरळा उठवत. पक्षी नव्हेत ते रॉबिन पक्ष्यांपेक्षा मोठे, कावळ्यांपेक्षा छोटे स्कंक आहेत. बेबी स्कंक. दोन आजूबाजूला उभे असणारे. त्यांच्या निराश आयुष्याकडे एका दृष्टिकोनात बघणारे. पण किती सुंदर चकाकणारे आणि नाचणारे. आम्ही बघत असताना ते तिथून निघाले आणि अत्यंत सरळ रेषेत पुढे चालत गेले. जणू त्याचा त्यांना अभिमान होता. खिडकीबाहेर बघताना त्या दोन ‘स्कंक’च्या नृत्याकडे बघताना काही क्षण का होईना, माणसे स्वत:चे अस्तित्व विसरलेली असतात. असे क्षण मन्रोला महत्त्वाचे वाटतात. पण असे क्षण जेव्हा आठवणींचा भाग बनतात, तेव्हा त्यात बदल झालेला असतो- मग ते कोणतेही असोत; सुखाचे वा दु:खाचे. अशा अनेक क्षणांभोवती मग जीवन घुटमळू शकते.
खुद्द मन्रोच्या आयुष्यात तिला अत्यंत प्रिय असणा-या आईच्या आजारपणावेळी तिला जाणे शक्यच नव्हते. ‘आई खूप आजारी होती आणि माझ्यापासून खूप दूर होती. तिच्या अखेरच्या दिवसांत मला तिच्या सोबत राहता आले नाही. मला दोन छोटी मुले होती आणि त्यांना बघणारे कोणीही नव्हते. आपण असे नेहमी म्हणतो, की आपण आयुष्यात काही गोष्टींबाबत स्वत:ला कधीही माफ करू शकत नाही. पण सत्य हेच, की आपण स्वत:ला माफ करत असतो.’ मन्रोच्या आईचे व्यक्तिमत्त्व तिच्या कथांमधून वारंवार डोकावत असते.
अ‍ॅलिस मन्रो सारख्या लघुकथा लिहिणा-या लेखिकेला यंदाचा नोबेल पारितोषिक जाहीर झाल्यावर साहित्य वर्तुळात बहुतांश आनंदाच्या प्रतिक्रिया उमटल्या. मन्रोची बंदिस्त शब्दात गंभीर व खोल आशय मांडण्याची शैली, मानवी स्वभावाचे व मनाचे तिने केलेले टोकदार चित्रण यामुळे तिला ‘लेखकांचा लेखक’ असे म्हटले गेले. वस्तुत: तिच्या कथा या कॅनडातल्या छोट्याशा गावांभोवती व परिसरात घडतात. त्यांचा वावर वैश्विक नाही. बहुतेक सगळ्याच कथा गंभीर; विनोद जवळजवळ नाहीच. मानवी स्वभावाचे चित्रण मात्र सर्वव्यापी; त्यामुळेच त्याला झळाळी प्राप्त होते. 2012मध्ये प्रसिद्ध झालेला ‘डिअर लाईफ’ हा कथासंग्रह तिचा अखेरचा कथासंग्रह असेल, असे तिने जाहीर केले होते. परंतु त्या आधी म्हणजे, 2006मध्येदेखील तिने अशी निवृत्ती जाहीर केली होती. परंतु कथेची ऊर्मी प्रचंड असल्याने तिला आपला निर्णय बदलावा लागला. कदाचित आताही तिला तसे वाटू शकेल किंवा तिच्या कथेतल्या पात्रांप्रमाणे ‘दिल ढूंढता है’ अशीच तिची भावना असेल!