आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हट्टी मीरा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लेखिका व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट आहेत. वृत्तपत्रे व नियतकालिकांतून नियमित पुस्तक परिचयात्मक लेखन करतात.
 
समुपदेशन क्षेत्रात काम करणारी माझी एक मैत्रीण एकदा गप्पांच्या ओघात म्हणाली, ‘तू कथा-कादंबऱ्या कशा काय वाचू शकतेस? मला तर ते सगळं खोटं-खोटं वाचताना भारी कंटाळा येतो.’ ‘कल्पनेहूनही अद्भुत’ असणाऱ्या वास्तवातील समस्याग्रस्त व्यक्तींच्या सततच्या संपर्कात असणाऱ्या तिला काल्पनिक कसं रुचणार? तिचं म्हणणं त्या क्षणाला तरी पटलं. नंतर मात्र मी विचारांत पडले की, कल्पित साहित्य आपण का वाचतो? त्यातलं आपल्याला नक्की काय आवडतं? 
कोणतीही कथा-कादंबरी सजगतेने वाचताना जगणं समजून घेण्याविषयीचं आपलं भान जागं होतं का? समांतर पातळीवर आपणही त्यातील पात्रांशी स्वत:ला जोडत असतो का? आपल्या रोजच्या जगण्याशी त्याची तुलना करतो का? साहित्य आणि वास्तव यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न आपल्याकडून घडतो का? वाचलेलं धरून ठेवत त्यानुसार स्वत:कडे, स्वत:च्या जगण्याकडे तिऱ्हाइताच्या नजरेने आपण बघू शकतो का? काही काळापूर्वीपर्यंत यातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर नकळतपणे ‘होय’ आहे, असं जाणवलं. 
आता मात्र असं वेगळं काय घडलंय, की हे प्रश्न निरर्थक वाटताहेत? त्याचं कारण म्हणजे, वरील प्रश्नांचं ‘होय’ किंवा ‘नाही’ असं एकच एक ठाम उत्तर असू शकतं का, असा एक नवीनच प्रश्न मनात निर्माण झाला आहे. हे घडायला कारणीभूत ठरली मीरा... मेघना पेठेंच्या ‘नातिचरामि’ची नायिका.
अगदी पहिल्या वाचनात पूर्णपणे डोक्यावरून जायला लागली, म्हणून सुरुवातीच्या काही पानांनंतर मिटून ठेवली होती तिला. कोणतीही व्यक्ती समजून घेण्यासाठी तिच्यापासून दूर होणं हा त्यावरचा उपाय नाही, तर पुन:पुन्हा तिच्या मनात शिरायला पाहिजे, हे ठाऊक असल्याने पुन्हा एकदा तिला जवळ केली. कठोर संवेदनशीलतेने वास्तवाची चिरफाड आणि रोखठोक मूल्यमापन करणाऱ्या मीराच्या मनोगतांतून ही कादंबरी नव्याने वाचताना जाणवलं की, आपल्या मनातील शंकांची रेडीमेड उत्तरं न देता आपला आपण विचार करायला ती भाग पाडतेय, कारण त्या शंका आपल्या आहेत, तिच्या नाहीत. अन्न-वस्त्र-निवारा या मूलभूत गरजा भागत असतील तर जगणं किती सहज-सोप्पं असायला हवं ना! मात्र प्रत्यक्षात तसं घडतं का? रूढी-परंपरांच्या कोंडलेल्या अवकाशात स्त्री काय किंवा पुरुष काय, दोघांनाही मोकळेपणाने जगता येतं का? स्वत:तील माणूसपण जपत, दुसऱ्यातील माणूसपण समजून घेत सहजीवन जगणं अवघड का बनतं? याची उत्तरं एकास एक अशी नसून व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायाने वेगवेगळी असणार आहेत, हे मीरामुळे उलगडत राहिलं. आपल्या आईवडिलांच्या सहजीवनाकडे डोळसपणे बघताना मीराला पक्कं समजतं की, “माझी आई ही कायम लग्न या गोष्टीला सगळ्यात प्राधान्य देणारी बाई होती. लग्न होण्यासाठी आणि नंतर ते टिकण्यासाठी माणसांनी, विशेषत: माणसांतल्या बाई या प्राण्यानं काहीही करावं, कशाचीही किंमत द्यावी, कारण ती किंमत या बदल्यात तिला जे मिळणार आहे त्या मानानं क्षुल्लकच आहे, असं तिचं म्हणण होतं.”
लग्नानंतरच्या सहजीवनात हळूहळू मीराच्या लक्षात येऊ लागतं की, “जुजबी प्रश्नांची जुजबी उत्तरं चालणारा, नव्हे जुजबीच उत्तरं हवी असणारा माझा नवरा!” आणि त्याच्यासाठी “आपल्याला जे मनोमन पटतं, वा करावंसं वाटतं तसं जगायचं असेल वा करायचं असेल, तर कुणाची बायको वा नवरा व्हायचं नसतं, हेसुद्धा न कळण्याइतकी पागल” झाले आहे. आणि त्या पागलपणातच “तू माझा मित्र आहेस म्हणून कुठल्याच तराजूत तुला न घालता, तुझा पगारच कशाला, तुझं संपूर्ण नावही न विचारता, आणि इतरही काही -- तुझ्याशी बिनदिक्कत लग्न केलं.”
“लग्न नावाच्या व्यवस्थेतला एक पायाभूत नियम म्हणजे, जे काही हवं असणार आहे, ते दुसऱ्या माणसाकडूनच मिळू शकणार आणि तो दुसरा माणूसही एकच एक असला पाहिजे. जे काही आता मिळायचं ते आता याच एका समोर ठाकलेल्या, पदरी पडून पवित्र झालेल्या व्यक्तीकडून; आणि तिथं जे मिळण्यासारखं नाही, ते विसरून जायचं. इथं इच्छापूर्तीच्या परीक्षेनंतर, पूर्ण होणार असलेली इच्छा तेवढी रुजू द्यायची. आणि पूर्ण होण्याची शक्यताही नसलेली इच्छा पाडून टाकायची. पण मला नाही आल्या माझ्या इच्छा पाडता.” 
“लग्नासारख्या जवळच्या नात्यात Importance and attention या दोन गोष्टी मिळाव्यात, अशी माझी अपेक्षा आहे. त्या मिळत नसतील तर कशासाठी लग्न?”
“सोबत, सहानुभूती, आधार, कौतुक, लाड आणि थोडासा हातभार... हेच. बापाचं घर सोडून बरोबरीच्या मित्राचा हात धरून निघालेल्या कुठल्याही बाईला सुरुवातीला तरी हेच हवं असतं ना? तेच... तेच मला हवं होतं.”
आणि ते देणारा मित्र मीराला लाभला. “किती वर्षांनी आपल्याला काही सांगायचं आहे ते ऐकताना तंतोतंत कळणारा, आणि त्यापेक्षाही मुळात ते ऐकण्यात रस असणारा कुणी मनुष्य जो किती वर्षांपासून आपल्याला हवा होता, तो मिळाला होता त्या क्षणाला तरी दुसऱ्या कुठल्याच शक्यतेवर विश्वास टाकणं मला परवडणार नव्हतं. भले उद्या तू नसशील. पण आत्ता तू होतास.” 
नवऱ्याला जेव्हा या मैत्रीविषयी समजलं आणि मीराला त्याबद्दल जाब विचारलेला असताना तिच्या तोंडून नकळत ‘हो’ असं उत्तर दिलं गेलं, त्या क्षणी विवाहाचं नातं संपुष्टात आलं. स्त्रीला मनासारखं जगता येण्याची, तिच्या व्यक्तिस्वातंत्र्याची किंमत काय असते? एकटेपणा? वैवाहिक जीवनाला नकार? तथाकथित वैवाहिक नाती, कुटुंबव्यवस्थेतील त्यांची उतरंड, कामांची-जबाबदाऱ्यांची काटेकोर विभागणी व्यक्तीच्या विकासाला पोषक ठरतात - असं का घडत नाही? त्याऐवजी बऱ्याचदा त्यांचा काच का जाणवतो? अशा वेळी आपल्या मनाप्रमाणे जगायचं असेल तर ‘एकटं’ राहण्याला पर्याय का उरत नाही? विवाहबंधनात असताना दुसऱ्या पुरुषाशी केवळ मैत्रीपूर्ण संबंध राखण्याचा पर्याय स्वीकारला असेल, तर तो गुप्त न राखता नवऱ्याला मोकळेपणाने सांगता येतो का?
मीरा एके ठिकाणी म्हणते, “माझ्या जगण्यातूनच मला काहीही चूक आहे की बरोबर, योग्य की अयोग्य, चांगलं की वाईट, हे कळू शकलं पाहिजे आणि कळल्यावर पटलं पाहिजे, हा हट्ट जगण्याला मूल्य देतो आणि माझ्या जगण्याला मूल्य देणं हे माझं कर्तव्य आहे.” 
शेवटी, कुणाच्याही जगण्यातल्या प्रश्नांना ‘सत्य’ उत्तरे वा समर्थने नसतात का आणि ‘योग्य’ जगणे असेही काही असते का, हे आपल्यालाही लागू होतंच की!
 
अगदी पहिल्या वाचनात पूर्णपणे डोक्यावरून जायला लागली, म्हणून सुरुवातीच्या काही पानांनंतर मिटून ठेवली होती तिला. कोणतीही व्यक्ती समजून घेण्यासाठी तिच्यापासून दूर होणं हा त्यावरचा उपाय नाही, तर पुन:पुन्हा तिच्या मनात शिरायला पाहिजे, हे ठाऊक असल्याने पुन्हा एकदा तिला जवळ केली.
 
chitrarjoshi@gmail.com
बातम्या आणखी आहेत...