आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'ख्रिस्ताय'कर्त्या लक्ष्‍मीबाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खरे सांग गे ताई! अपुल्या बाळपणी प्रेमाने
शिकवी आई कशी आपणा गोड-गोड पक्वाने
तूप सांडले, मिसळून गेली साखरेतही माती,
दूध वाहिलें भूमातेला, थेंब येईना हाती
तरी जननीनें नाहिं दण्डिले आपणाला त्या वेळे,
मूल लाडकी अजाण म्हणूनी कौतुक उलटें केलें।
कुठल्याही काळात सुधारित विचारांचे वारे वाहू लागले की, संवेदनशील मन बंडखोर होते आणि नवविचारांनी झपाटून जाते. लक्ष्मीबाचे पती रेव्हरंड टिळकांचे आयुष्य तर अशा नवचळवळींनी भारलेले होते. मुळात अशिक्षित असलेल्या लक्ष्मीबाना 1892च्या सुमारास प्रथम अक्षरओळख झाली आणि त्याच दरम्यान टिळकांनी धर्मांतर केले. त्या काळी समाजमनावर ब्राह्मणी कर्मकांडाचे खूप वर्चस्व होते. त्यात एका ब्राह्मण व्यक्तीने ख्रिस्ती धर्म स्वीकारणे म्हणजे एक प्रकारे स्वत:ला बहिष्कृत करून घेणेच होते. याचा परिणाम म्हणजे कौटुंबिक जीवनाची घडी क्षणात विस्कटली व सहजीवन अस्थिर झाले. लक्ष्मीबाना दत्तूला (मुलगा) घेऊन निर्वासिताचे जीवन काही काळ जगणे नशिबी आले. इथपर्यंत लक्ष्मीबाचे कुठल्याही प्रकारातले लेखन प्रकाशित नव्हते. किंवा त्या लिहीत असल्याचे दाखले उपलब्ध नाहीत. लक्ष्मीबाई आपल्या मोठ्या बहिणीच्या घरी राहू लागल्या; पण चैतन्यदायी संसाराची वाताहत होऊन एक उद्विग्नता पसरली. प्रिय पतीचा विरह असह्य होऊ लागला. त्यातच नव-याबद्दल लोक काय वाट्टेल ते बोलत. ते सगळं सहन करण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. निर्वासित लेकराकडे पाहून पोटात तुटत राही. चीड, संताप, दु:ख आणि हतबल अगतिकता यात लक्ष्मीबाच्या मनाची नुसती घुसमट होऊ लागली. अशा व्याकूळ क्षणी त्यांनी कविता स्फुरू लागली. कविता लिहिली की दु:खाचे भार हलके होऊ लागत. मनातले दु:ख मोकळे करण्याचा उपाय सापडला होता. त्या कविता लिहित आणि आपल्या नव-या ला त्या पत्र म्हणून पाठवत.

गुण माने मनासारखा परंतु झाला पिसा
साजणी हा तरी नवरा कसा?
आपल्या संसाराचे वाटोळे झाले या विचाराने सारखे रडून आणि व्यथित होऊन लक्ष्मीबाई अंथरुणाला खिळल्या. दिवसेंदिवस या विरह वेदनेचा कडेलोट होऊ लागला. तसतसा लक्ष्मीबाच्या काव्यनिर्मितीला बहर येऊ लागला.

‘सखि रात्रंदिन छळित मला सवत कल्पना।
घोर तमोजाल विणूनि गुंतवी मना’।।
किंवा ;
नवकाव्याच्या गुंफून माळा पतीला मी धाडाव्या,
फुलाबद्दल मी रत्नमालिका आल्या प्रेमे घ्याव्या।।

त्या कविता लिहून टिळकांना पाठवीत व उत्तरादाखल टिळकही पत्रातून लक्ष्मीबाना प्रेमाच्या, विरहाच्या, त्यागाच्या, निष्ठापूर्वक जगण्याच्या, बायकोची स्तुती करणा-या कविता लिहून पाठवत. याचा परिणाम म्हणजे तुटलेली मनं पुन्हा सांधली गेली. एक दिवस रे. टिळक आले आणि बायको-लेकराला घेऊन गेले. एकत्र संसार सुरू झाला. 1900 मध्ये लक्ष्मीबानीही ख्रिस्ती धर्म स्वीकारला. नंतरच्या काळात टिळकांच्या सहवासाने लक्ष्मीबाच्या काव्यनिर्मितीला भावनिक हळवेपणासोबतच टापटिपीची झालर लागून अभिव्यक्तीचे नेटकेपण तिला प्राप्त झाले. टिळक अभिजात कवी असल्याने कळत-नकळत लक्ष्मीबाच्या काव्यावर त्यांचा प्रभाव जाणवतो. त्याबद्दल त्या नम्रपणे लिहितात.
‘सतार जड मी खरोखरी गे परंतु कुशल कराचा
स्पर्श कवीचा होता फुटते परि मला ही मधुवाचा’

लक्ष्मीबानी जरी हे ऋण मान्य केले असले तरी त्यांची काव्यस्फूर्ती स्वतंत्र होती. टिळकांच्या सहवासात त्या काव्यरचनाचातुर्य शिकल्या असतील. परंतु स्वत:चे वस्त्र असताना ते आटोपशीर व आकर्षक पद्धतीने नेसण्यासाठी दुस-या चा हातभार लागला, म्हणजे ते वस्त्र दुस-या चे होते, असे मुळीच नाही. याचे उत्तम उदाहरण म्हणजे ख्रिस्तायन होय. ख्रिस्तायनाचे साडेदहा अध्याय लिहिल्यानंतर टिळकांचे निधन झाले. लक्ष्मीबानी 65 अध्यायांची भर घालून पतीचे अर्धवट राहिलेले वाङ्मयकार्य पूर्ण केले. अशा प्रकारे कार्य करण्याचे भाग्य पूर्वी बाणभट्टाच्या पुत्राला ‘कादंबरी’ पूर्ण करून मिळाले होते. ख्रिस्तायनाची ओघवती भाषा प्रासादिक आहे. उपमा, दृष्टांत, रुपकं, मांडणी पाहता लक्ष्मीबाचा काव्यशास्त्राचा अभ्यास नाही, असे जाणवतसुद्धा नाही. ‘ख्रिस्तायन’ आणि ‘भरली घागर’ या काव्यसंग्रहातल्या सौदर्यवादी, सामाजिक आशयाच्या, प्रासंगिक, वात्सल्योद्भव, पती-पत्नी प्रेमविषयक, उपदेशात्मक, निसर्गवर्णनाच्या व बालगीते आदी अनेक स्वरूपांतील कविता पाहिल्या की त्यांच्या काव्याचे वेगळेपण लक्षात येते. कवितांचे विषय जरी सर्वसाधारण दैनंदिन घटना-प्रसंगाचे असले तरी त्यातील नव्या विचारांची मांडणी व वैशिष्ट्यपूर्ण रचना कौशल्य यामुळे या लक्षवेधी ठरल्या आहेत. ‘करंज्यांत मोदक कशाला?’, ‘सवत’, ‘आज मी नवल पाहिले’ व ‘नाही तू जवळ म्हणून’ या कवितांमधून लक्ष्मीबाच्या प्रगल्भ जाणिवांची खोली जाणवत राहते.
स्त्री सोशिक असली तरी एखाद्या क्षणी तिच्या भावनांचा कडेलोट होऊन ती आपल्या पद्धतीने नकार नोंदवताना दिसते. समाजाच्या दुटप्पी धोरणाचा निषेध नोंदवताना लक्ष्मीबानी लिहिले आहे.
कितीक ललना ठार बुडाल्या अंध तमाच्या दारी
तयाची दाद न कोणा परी
बुडवून त्यांना खुशाल असती नांदत अपुले घरी
देऊनी ताव पुन्हा मिशिवरी
हे बंधू कुणाचे चिरंजीव वा पती
जन परि तयांचा विटाळ ना मानिती
असे श्रेष्ठ नर, म्हणूनि जगाला विटाळ त्याचा नसे
स्त्रियांना का जग बुडवितसे?

वांझोट्या समाजाने स्त्रियांवर केलेल्या अत्याचाराला वाचा फोडताना लक्ष्मीबानी आंतरिक संताप अशा पद्धतीने त्यांनी व्यक्त केला. देहविक्रय करणा-या स्त्रीला हीन समजणा-या पुरुषवर्गाला त्या ठणकावून प्रश्न विचारतात की, हे कोणते पुरुष आहेत?
त्या काळी लहान वयात मुलीचे लग्न होई, त्या इवल्याशा जिवाला आनंदाने खेळणे-बागडणे सोडून सासरघरी निमूटपणे काम करावे लागे, त्या वेदनेची सहवेदना अनुभवताना त्या लिहितात;
‘ही भरली घागर तुझ्या शिरावर बाळे
सासुरवासी । मी जन्मापासून ऐशी ।।
घोर सासरा माझा भारी
घेऊन बडगा बसला दारी
जाऊ देईना मज बाहेरी
छळवणूक सारी । गांजले पुरी संसारी।।

हे दु:ख खरं तर कमी-अधिक प्रमाणात अनेक सासुरवाशिणींचं आहे. मात्र आजही कवयित्री ते उघडपणे व्यक्त करत नाहीत. असं म्हणतात की, ‘मोठ्या झाडाच्या सावलीत दुसरं झाड वाढत नाही’ पण लक्ष्मीबाई याला अपवाद ठरल्या. प्रतिभासंपन्न नव-या च्या तेजाने दिपून न जाता, त्याच्या मदतीने आयुष्य सत्कारणी तर लावलंच; पण वादात वेळ वाया न घालवता सकारात्मक विचाराने कार्य केले तर किती दूरचा पल्ला गाठता येतो, याचं लक्ष्मीबाचं जीवन म्हणजे एक उत्तम उदाहरण होय.

tadegawkarsanjiwani@yahoo.com