आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिनेमॅटोग्राफी हेच माझे प्रेम- गोविंद निहलानी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘एक दिग्दर्शक म्हणून आणि आता निर्माता म्हणून काम करत असलो, तरी मुळात मी एक सिनेमॅटोग्राफर आहे आणि सिनेमॅटोग्राफी हेच माझे पहिले प्रेम आहे.’ या एकाच उत्तरात सिनेमॅटोग्राफीवरील त्यांचे प्रेम सिद्ध होते. सिनेमॅटोग्राफीमध्येच शिक्षण पूर्ण करून आलेल्या गोविंद निहलानी यांनी व्ही. के. मूर्ती यांचे असिस्टंट म्हणून कामाला सुरुवात केली. श्याम बेनेगल, श्रीराम लागू, गिरीश कार्नाड यांच्या चित्रपटांना अप्रतिम दृश्यभाषा देणा-या गोविंद निहलानी यांचा हळूहळू उत्तम सिनेमॅटोग्राफर म्हणून दबदबा वाढत गेला. रिचर्ड अ‍ॅटेनबरो यांच्या ‘गांधी’ या चित्रपटाने ‘ऑस्कर’ मिळवल्याने तर सिनेमॅटोग्राफर गोविंद निहलानी यांच्या कारकीर्दीवर सोनेरी मोहोर उमटवली. सिनेमॅटोग्राफीतील सर्व कौशल्ये संपादन केल्यानंतर त्यांच्यातील कलाकार अस्वस्थ होऊ लागला आणि सभोवतीचे भान असलेला दिग्दर्शक जन्माला आला. आक्रोश, विजेता, अर्धसत्य, द्रोहकाल, हजार चौरसी की माँ, तक्षक असा त्यांच्या सिनेमाचा चढता आलेख लक्षात घेतला तर ‘फिल्ममेकर’ म्हणून त्यांना आजूबाजूच्या परिस्थितीचे असलेले भान आणि त्याचा कलात्मकरीत्या त्यांनी केलेला उपयोग पाहून प्रेक्षक अवाक् होतात. ‘आणि मग त्यांनी मागे वळून पाहिले नाही.’ हा वाक्प्रचार गोविंद निहलानी यांच्या बाबतीत मात्र लागू होत नाही. कारण त्यांनी दिग्दर्शन केलेल्या प्रत्येक सिनेमाच्या सिनेमॅटोग्राफीची जबाबदारीही ते पार पाडत असत. विजय तेंडुलकर लिखित ‘शांतता कोर्ट चालू आहे’ या नाटकावर आधारित ‘आक्रोश’ हा पहिलावहिला सिनेमा दिग्दर्शित केल्यानंतर ‘अनुमती’ या चित्रपटासाठी तब्बल 20 वर्षांनंतर गोविंदजी मराठी चित्रपटासाठी काम करत आहेत. ‘दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी लिहिलेली स्क्रिप्ट आवडली आणि फारच साधे तसेच रिअ‍ॅलिस्टिक वातावरण तयार करायचे असल्याने मलाही छान वाटले.’ नेहमीच ग्लॅमरस ‘दिसण्या’कडे कल असलेल्या हिंदी चित्रपटसृष्टीतल्या एका दिग्गजाने काढलेले हे उद्गार ऐकल्यावर ‘साधेपणा’ हा मराठीचा यूएसपी असल्याचे तेसुद्धा मान्य करतात.


‘या चित्रपटात सिनेमॅटोग्राफरने जास्त हुशारी दाखवण्याची गरज नव्हती. तसेच मी जेव्हा सिनेमॅटोग्राफर असतो, तेव्हा मी दिग्दर्शकाच्या विचारांना महत्त्व देतो. मला काय वाटतं? यापेक्षा दिग्दर्शकाला दिसलेला प्रसंग पडद्यावर दाखवणे ही माझी जबाबदारी असते.’ असे सांगत हल्ली सिनेमॅटोग्राफी उठून दिसेल, अशा पद्धतीने काम करणा-या आणि स्वत:चेच म्हणणे बरोबर आहे, असे मानणा-या अनेक नवोदितांना त्यांनी जणू सल्ला दिला आहे. ‘चांगले विषय आणि विषयाशी प्रामाणिक असलेल्या कलाकृती फक्त मराठी भाषेतच बनत असतात. मराठी चित्रपटांच्या विषयांमध्ये जी ताकद असते, ती कोणत्याही स्थानिक चित्रपटांमध्ये जाणवत नाही. त्यामुळे मराठी चित्रपटांना चांगले भविष्य आहे.’ असे गोविंद निहलानी मानतात. मात्र त्याच वेळी ‘अनुमती’सारखे चांगले विषय घेऊन भटकणा-या दिग्दर्शकांना वेळीच चांगले निर्माते मिळत नसल्याची खंतही ते व्यक्त करतात. मध्यमवर्गीय वातावरण, वृद्ध नायक-नायिका असा विषय चित्रपटासाठी निवडल्यानंतर कोणतीही कॉमेडी, ग्लॅमरस गाणी नसलेल्या चित्रपटाला पैसा लावायला निर्माते तयार होत नाहीत. त्यामुळे कसदार असूनही चांगले चित्रपट बाद होतात. मात्र बुद्धिजीवी लोकांसाठी तयार झालेल्या अशा मराठी चित्रपटांना पुरस्कार सोहळ्यांना जास्त मागणी असते, असे सांगत पुढे एखादा मराठी चित्रपट तयार करण्याची इच्छाही गोविंद निहलानी यांनी व्यक्त केली. समांतर आणि व्यावसायिक सिनेमांमधील फरक संपुष्टात आला आहे, असे जरी गोविंद निहलानी सांगत असले तरी मराठी चित्रपटाला व्यावसायिक यश कमी मिळत असल्याचेही त्यांनी मान्य केले.