आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरी सेवा परीक्षा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून राष्‍ट्रीय स्तरावर ज्या महत्त्वपूर्ण परीक्षांचे आयोजन केले जाते, त्यापैकी एक महत्त्वपूर्ण परीक्षा म्हणजे नागरी सेवा परीक्षा होय. या परीक्षेत पास होणारे उमेदवार भारत सरकारसाठी प्रशासकीय सेवा, पोलिस सेवा, विदेश सेवा, महसूल सेवा, व अन्य महत्त्वपूर्ण सेवांमध्ये उच्च पदांवर अधिकारी होतात. ही परीक्षा तीन पातळ्यांवर घेतली जाते.
(1) पूर्व परीक्षा
(2) मुख्य परीक्षा
(3) मुलाखत
या तिन्ही प्रक्रिया पूर्ण होऊन अंतिम निकाल हा एका वर्षाच्या काळात लागतो.


परीक्षेचे टप्पे : नागरी सेवा परीक्षा ही जगातील अत्यंत अवघड परीक्षांपैकी एक आहे. साधारणत: दरवर्षी 5 ते 6 लाख मुले या परीक्षेसाठी अर्ज करतात. यापैकी साधारणत: 3 लाख मुले ही परीक्षा देतात. मात्र अंतिम यादीत 1000च्या संख्येत अधिकारी निवडले जातात. परीक्षा देणा-या उमेदवाराने हे तिन्ही टप्पे पूर्ण करणे सक्तीचे आहे. साधारणत: या परीक्षेचा अर्धा ते एक टक्के एवढा निकाल लागतो. पूर्व परीक्षेमध्ये 2 पेपरचा समावेश आहे. पुढील वर्षापासून ऑगस्ट महिन्यामध्ये पूर्वपरीक्षा तर डिसेंबर महिन्यामध्ये मुख्य परीक्षा घेण्याचे आयोगाने ठरविले आहे. सामान्य अध्ययन आणि कल चाचणी (अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट) हे ते दोन पेपर आहेत.


पात्रता : या परीक्षेसाठी विद्यार्थी पदवीधर असणे गरजेचे आहे. भारतातील कोणत्याही केंद्रीय, राज्याच्या, अभिमत आणि मुक्त विद्यापीठातून त्याने पदवी संपादन केलेली असावी. पदवीच्या शेवटच्या वर्षाला असणारे विद्यार्थी पूर्वपरीक्षेस पात्र ठरतो. मात्र मुख्य परीक्षेवेळी तो पदवीधर असणे गरजेचे आहे. भारतीय प्रशासकीय सेवा आणि पोलिस सेवेसाठी तो उमेदवार भारतीय नागरिक असणे गरजेचे आहे.


वय : या परीक्षेसाठी किमान 21 ते कमाल 30 वर्षापर्यंत ही परीक्षा देता येते. अनुसूचित जाती व जमाती तसेच इतर मागासवर्गीय (ओबीसी) समुदायासाठी वयोमर्यादा वाढविली आहे. इतर मागासवर्गीयांसाठी 33 तर अनुसूचित जाती व जमातीसाठी 35 वयोमर्यादा आहे.


परीक्षेसाठीचे प्रयत्न : (attempt) खुल्या संवर्गासाठी 4 वर्षे, इतर मागासवर्गीयांसाठी 7 वर्षे तर अनुसूचित जाती व जमातीसाठी प्रयत्नांची मर्यादा नाही. या परीक्षेत पूर्वपरीक्षेला बसणारा उमेदवार हा परीक्षेसाठीचे प्रयत्न करीत असतो.
उमेदवारांची संख्या : साधारणत: या परीक्षेसाठी दरवर्षीच्या भरतीची संख्या ही वेगवेगळी असते. मात्र साधारणत: गेल्या काही वर्षात ही संख्या 900 ते 1000 च्या दरम्यान राहिलेली आहे. या परीक्षेत वरच्या क्रमांकापासून ते खालच्या क्रमांकापर्यंत पदाची पसंती अथवा पद मिळते. उदा. पहिल्या 100 क्रमांकात येणारे विद्यार्थी हे प्रशासकीय सेवेसाठी निवडले जातात.


बदललेला परीक्षा पॅटर्न : 2011 पासून नागरी सेवा परीक्षेच्या पूर्वपरीक्षेत बदल झाला. त्यामध्ये सामान्य अध्ययन व कल चाचणी हे दोन पेपर अंतर्भूत करण्यात आले. हे दोन्ही पेपर प्रत्येकी 200 मार्कांचे असून त्यासाठी प्रत्येकी 2 तासांचा कालावधी आहे. या दोन्हीही पेपरमध्ये वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात. मुख्य परीक्षेमध्ये 9 पेपर असून त्यातील 2 पेपरचे गुण अंतिम मार्कांमध्ये धरले जात नाहीत. मात्र या पेपरमध्ये पास होणे गरजेचे असते. 20 शब्दांपासून ते 600 शब्दांपर्यंत परीक्षेची उत्तरे लिहावी लागतात. (अपवाद निबंधाचा) 2013 साली डॉ. अरुण निगवेकर समितीने सुचविलेल्या शिफारशीनुसार मुख्य परीक्षेचा पॅटर्न बदलला गेला. मात्र या पॅटर्नला झालेला विरोध पाहून क्वालिफाइंग पेपर व मुख्य परीक्षेचे वैकल्पिक विषय म्हणून निवडले जाणारे प्रादेशिक भाषांचे पर्याय तसेच ठेवण्यात आले. मुख्य परीक्षेच्या नव्या पॅटर्ननुसार 2 क्वालिफाइंग पेपर प्रत्येकी 300 मार्क्स, निबंध 250 मार्क्स, सामान्य अध्ययनाचे 4 पेपर प्रत्येकी 250 मार्क्स, एका वैकल्पिक विषयाच्या दोन पेपरचे मिळून 500 मार्क्स व मुलाखतीचे 275 मार्क्स ठरविण्यात आले आहेत.


मुलाखत : या परीक्षेची मुलाखत अथवा व्यक्तिमत्त्व चाचणी ही निवृत्त अथवा ज्येष्ठ सनदी अधिका-यांकडून घेतली जाते. या मुलाखती पाठीमागील कारण हे आहे की, उमेदवार सेवेस पात्र आहे अथवा नाही ते ठरविणे. मुलाखतीत उमेदवाराचे सामाजिक भान, चालू घडामोडींचे आकलन, छंद, मानसिक तणाव, चिकित्सात्मक वृत्ती, विचारांमधील समतोलपणा, नेतृत्वक्षमता, सेवाभाव या वरती प्रश्न विचारले जातात. मुलाखतीत उमेदवाराकडून ज्ञानाच्या सखोलतेची अपेक्षा केली जात नाही तर या विषयाचे प्राथमिक ज्ञान उमेदवारास माहिती आहे का, हे तपासले जाते. केंद्रीय नागरी सेवेद्वारे निवडले जाणारे पदे, त्या पदांचे महत्त्व, त्या पदांद्वारे समाजात ज्या मोजक्या अधिका-यांनी केलेले महत्त्वपूर्ण काम यावर येणा-या लेखात सविस्तर लेखन केले जाईल.
क्रमश: