आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिली शक्यता खरी मानून खुलासा करतो...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुरोगामी लोक प्रा मोरे यांच्या लेखनाची दखल घेत नाहीत, याचे कारण ते अभ्यासात
कमी पडतात किंवा त्याना चिकित्सा करता येत नाही असे नसून , प्रा मोरे व तथाकथित पुरोगामी यांचे दृष्टिकोन इतके परस्परविरोधी आहेत की, चर्चा वाद घालून काही निष्पन्न होत नाही असे पुरोगाम्यांना वाटते, हे माझ्या त्या लेखाचे मुख्य प्रतिपादन आहे...
‘पुरोगाम्यांनी परिघाबाहेर ठेवलेला अभ्यासक’ या शीर्षकाच्या माझ्या लेखावर काही आक्षेप नोंदवणारा ‘न्यायालयाच्या निर्णयाचे समर्थन का मान्य होत नाही?’ या शीर्षकाचा दीपक पटवे यांचा लेख मागील अंकात प्रसिद्ध झाला आहे. माझ्या ‘त्या’ लेखातून ठोस असे काही हाती लागत नाही, असा त्यांचा मुख्य आक्षेप आहे. आणि ‘त्या’ लेखातून मी खूप काही सांगितले आहे, असा माझा दावा आहे. त्यामुळे या विरोधाभासाच्या दोन शक्यता संभवतात. १) लेखक म्हणून मी कमी पडलो. आणि २) वाचक म्हणून ते कमी पडले. वस्तुस्थिती काहीही असो, पहिली शक्यता खरी मानून काही खुलासे करतो.
१. ‘सावरकरांच्या विचारांचा विपर्यास करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल केले पाहिजेत’, असे वक्तव्य प्रा. शेषराव मोरे यांनी संमेलनाच्या काळात केले आहे आणि ‘सावरकरांचा बुद्धिवाद आणि हिंदुत्ववाद’ या त्यांच्या पुस्तकातही तसेच विधान आहे. मात्र प्रा. मोरे यांचे ते विधान फक्त गांधी हत्येच्या संदर्भात सावरकरांवर आरोप करणाऱ्यांबाबत आहे, अशी सारवासारव प्रा. मोरे यांचे काही समर्थक करीत आहेत, त्या सारवासारवीला दीपक पटवेही बळी पडले आहेत, असे त्यांच्या लेखाच्या शीर्षकातून जाणवते.
२. माझ्या ‘त्या’ लेखात ‘पुरोगामी’ या शब्दाची व्याख्या केलेली नाही, पण दीपक पटवे यांना त्यात ती दिसते. प्रत्यक्षात काय आहे? ‘ज्याने त्याने आपआपल्या धर्मातील मूलतत्त्ववादाच्या विरोधात असणे ही पुरोगामी असण्याची पूर्वअट आहे’, असे मी त्या लेखात म्हटले आहे. पण त्या विधानातील ‘मूलतत्त्ववादी’ आणि ‘पूर्वअट’ या शब्दांकडे पटवे यांनी पुरेसे लक्ष दिलेले नसावे.
३. माझ्या त्या लेखात ‘प्रा. मोरे यांच्यावर व्यक्तिगत टीका आहे’, असा पटवे यांचा एक आक्षेप आहे. पण व्यक्तिगत टीका कशाला म्हणतात, याबाबतच्या त्यांच्या कल्पना आणि रूढ अर्थ यात बरेच अंतर आहे, हे तो लेख वाचणाऱ्या बहुतांश वाचकांना पटेल, असा माझा विश्वास आहे.
४. पुरोगामी लोक प्रा. मोरे यांच्या लेखनाची दखल घेत नाहीत, याचे कारण ते अभ्यासात कमी पडतात किंवा त्यांना चिकित्सा करता येत नाही असे नसून, प्रा. मोरे व तथाकथित पुरोगामी यांचे दृष्टिकोन इतके परस्परविरोधी आहेत, की चर्चा, वाद घालून काही निष्पन्न होत नाही, असे पुरोगाम्यांना वाटते, हे माझ्या त्या लेखाचे मुख्य प्रतिपादन आहे.
५. नरहर कुरुंदकरांचा वैचारिक वारसा प्रा. मोरे सांगत असतात, पण ते दोघे दोन परस्परविरोधी टोकांवर का व कसे उभे आहेत, हे महत्त्वपूर्ण निरीक्षण कदाचित पहिल्यांदाच या लेखातून पुढे आले असावे, असे मला वाटते. अनेक वाचकांनीही तसे कळवले आहे.
६. गांधी हत्येच्या संदर्भात जो खटला चालला, त्यात सावरकर एक आरोपी होते. न्यायालयाने त्यांना पुराव्याअभावी मुक्त केले, त्याला निर्दोषत्वाचे लेबल लावले जाते, अशी धारणा पुरोगाम्यांमधील अनेकांची आहे. त्यामुळे त्यांनी सावरकर हा विषय ऑप्शनला टाकला आहे. पण माझ्या त्या लेखात सावरकर व गांधी हत्या या विषयाला मी स्पर्शही केलेला नाही, त्यामुळे पटवे यांनी त्यांच्या लेखात तो विषय आणण्याची आवश्यकता नव्हती.
७. पण तो विषय त्यांनी आणलाच आहे, म्हणून त्या संदर्भातील एक निरीक्षण नोंदवतो. संमेलन पार पडल्यावर शेषराव मोरे यांची जी मुलाखत ‘जय महाराष्ट्र’ या वृत्तवाहिनीवर झाली, तेव्हा प्रा. मोरे म्हणाले की, ‘मी नथुराम बोलतोय’ या नाटकावर बंदी आणली पाहिजे. ते वाक्य ऐकल्यावर तथाकथित पुरोगाम्यांना बरे वाटायला पाहिजे. पण तसे होत नाही, याचे कारण प्रा. मोरे पुढे जे वाक्य उच्चारतात त्यात आहे. ते म्हणतात, गांधींची बदनामी होतेय की नाही, हा भाग बाजूला ठेवू. त्या नाटकातून सावरकरांची बदनामी होत आहे. या अशा सर्वत्र प्रतिबिंबित होणाऱ्या प्रा. मोरे यांच्या दृष्टिकोनामुळे पुरोगामी लोक त्यांच्यापासून दूर राहतात.
७. पुरोगामी वर्तुळाच्या परिघावरून जे दिसले, त्यातील काही निरीक्षणे केवळ मी त्या लेखात मांडली आहेत, हे माझे विधान पुढे करून पटवे म्हणतात की, मी त्या लेखातील विवेचनापासून सुटका करून घेतली आहे. वस्तुस्थिती तशी नाही. पुरोगामी नावाच्या विशाल, बेशिस्त, अस्ताव्यस्त वर्तुळात अनेक छोटी वर्तुळेे आहेत, असेही मी म्हटले आहे.
त्याचा अर्थ ती सर्व वर्तुळे प्रत्येक मुद्द्यावर परस्परांशी सहमत असतातच असे नाही. माझी निरीक्षणे त्या विशाल वर्तुळाच्या परिघावरून केलेली आहेत, याचा अर्थ वर्तुळाच्या परिघावरून वर्तुळाच्या आतील व बाहेरील अधिक चांगल्या प्रकारे पाहता येते, असा आहे.
असो. एका मर्यादेनंतर अभ्यासापेक्षा दृष्टिकोन महत्त्वाचा ठरतो आणि अंतिमतः दृष्टिकोनच भूमिका ठरवतो, हे सध्याच्या काळात नको तितके खरे ठरू लागले आहे, त्यामुळे थांबतो. थोडे अधिक स्पष्टीकरण देण्याची संधी दिल्याबद्दल दीपक पटवे यांचे मन:पूर्वक आभार.
vinod.shirsath@gmail.com