आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शोध कालिदासाचा...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कविकुलगुरू कालिदासाच्या यशाची दुदुंभी भारतातच नाही, तर सार्‍या जगात आजतागायत वाजत आहे. महाकवी गटेने ‘शाकुंतल’चे भाषांतर वाचले होते व तो आनंदविमूढ झाला होता. मुळातून वाचले असते तर काय झाले असते? अशा या कवीबद्दल काय लिहावे व बोलावे? त्याच्याबद्दल आम्हास काय माहीत आहे? त्याचे गाव कोणते? माहीत नाही. तो राहत कोठे होता? माहीत नाही. त्याचे नाव काय? माहीत नाही. त्याचा जन्म कोठे झाला? माहीत नाही. त्यांच्या उपजीविकेचे साधन काय? माहीत नाही. तो कोठे व किती शिकला? माहीत नाही. त्याचे आई-वडील कोण? त्याचा मृत्यू केव्हा झाला? माहीत नाही. अशा रीतीने ‘माहीत नाही’ ही माहिती आम्हास मिळते. ही नकारघंटा का वाजते? कारण इतिहासाची आम्ही नेहमी उपेक्षा केली. स्वत:बद्दल आमचे भारतीय कवी कधी बोलत नाहीत. ते प्रसिद्धिपराङ्मुख होते आणि आत्ममग्न तर नाहीच नाही.

भारतात इतिहासाविषयीचे औदासीन्य आहे. इतिहासाच्या अनास्थेमुळे आपण खूप काही गमावून बसलो आहोत. त्याच्या ग्रंथांव्यतिरिक्त आपल्याजवळ त्याच्याबद्दल कोणतीही माहिती नाही. निदान आम्हास हे तरी माहीत आहे. कालिदासाची आम्हास माहिती नाही येथूनच आपल्याला कालिदासाची सुरुवात करावी लागेल. त्यासाठी त्याच्या ग्रंथांचा धांडोळा घ्यावा लागतो तेव्हा कळते.

तो विक्रमादित्याच्या पदरी (राजदरबारात) राजकवी असावा. विक्रम संवत इ.स. पूर्व 52 पासून सुरू होतो. म्हणजे इ.स. पहिल्या शतकात तो झाला असावा. आजपासून 2000 वर्षे झालीत कालिदासाला. तेव्हापासून या महाकवीचे नाव आजतागायत गाजत आहे. ‘मेघदूता’मध्ये उज्जयिनीचे आखीव रेखीव वर्णन आहे. तिथल्या वाटिका, गवाक्ष, हवेल्या, झाडे, पक्षी, ललना, रस्ते आणि फिरस्ते यांचे चित्रमय शैलीत वर्णन आहे. महाकालेश्वर मंदिराचे गोपूर, प्रांगण, द्वार आदींचे वर्णनही सुंदर आहे. वसंतोत्सवात त्याची नाटके विद्वत् परिषदेसमोर रंगमंचावर सादर केली जात होती, असा त्याच्या नाटकांमध्येच उल्लेख आला आहे.
उज्जयिनीचे एवढे विगतवार वर्णन वाचल्यावर मनाची भावना होते की, तो निश्चित उज्जयिनीचा रहिवासी असावा. हा कोणाचा कोण? आख्यायिका सांगते की, तो एक महामूर्ख माणूस होता. ज्या झाडाच्या फांदीवर बसला आहे तीच फांदी तोडणार्‍या या महामूर्खास मंत्र्याने पाहिले. स्वत:ला विदुषी समजणार्‍या राजकुमारीचा सूड उगवण्यासाठी हा वर बरा आहे, कारण आजपर्यंत कैक चांगल्या राजकुमारांना तिने नामोहरम केले होते. मूर्खास मंत्री म्हणाले, ‘तुझे लग्न मी राजकुमारीशी लावून देतो. फक्त एक पथ्य पाळावयाचे, राजकुमारीसमोर तू एक अवाक्षरही बोलायचे नाही. मौन पाळायचे.’

राजदरबारात मंत्री व महामूर्ख दाखल झाले. राजकुमारीला मंत्री म्हणाले की, हा पंडित मौनव्रती आहे. याची परीक्षा तुम्ही संकेतांवर घ्या. तिने एक बोट दाखवले. लगेच त्या महामूर्खाने दोन बोटे वर केली. तिने बंद मूठ दाखवताच त्याने पंजा पसरला. मंत्र्यांनी सांगितले की, राजकुमारी, आपण एक बोट व बंद मुठीद्वारा सांगू इच्छिता की, आपण अद्वैत तत्त्व मानतो किंवा ब्रह्म सत्य आहे. त्याची दोन बोटे असे ज्ञान देतात की, प्रकृती आणि पुरुष हे दोघेही सृष्टीनिर्मितीसाठी आवश्यक आहेत. पंजा म्हणजे, पंचमहाभूतांद्वारे जग उत्पन्न झाले आहे. राजकुमारीस हे स्पष्टीकरण मनोमनी पटले. तिचा विवाह झाला; पण काही दिवसांतच तिच्या लक्षात आले की, तो महामूर्ख आहे. हे कळताच त्यास राजमहालातून हाकलून देण्यात आले. त्याने मग कालिमातेची उपासना केली. तिच्याकडून सकळ विद्या प्राप्त केली. तो आता प्रज्ञावंत झाला. कालिमातेचा उपासक म्हणून तो कालिदास झाला. आषाढाच्या पहिल्या दिवशी कालिदासाने पर्वतास मेघ लपेटून बसलेला पाहिला. त्याच दिवशी ‘मेघदूत’ काव्याचा जन्म झाला.

हा दिवसच आपण ‘कालिदास दिन’ म्हणून साजरा करतो. कारण कालिदास कोठे जन्मला, कधी जन्मला, याविषयी आपणास निश्चित काहीच माहीत नाही. कालिदास जयंती साजरी होते ती निव्वळ जनमानसात कालिदासाने आपले घर केले आहे म्हणूनच. त्याचे उत्कृष्ट साहित्य, त्याची चमत्कारयुक्त प्रतिभा, त्याच्यावर असलेले लोकांचे प्रेम, ममत्व, आदरभाव, अशा किती तरी भावभावनांचे कल्लोळ त्याच्याविषयी मनात उठतात. त्याला वाट करून देण्यासाठी हा ‘कालिदास दिन’ लोक स्वयंस्फूर्तीने साजरा करतात.

एकदा कालिदास दरबारातून तिरीमिरीने बाहेर पडला व थेट कुठे गेला तर लंकेत. तिथे एका वारांगनेकडे त्याने वास्तव्य केले. खरे पाहता येथील राजा कुमारसेन त्याचा मित्र होता, पण त्याच्याकडे तो गेला नाही. कारण त्याला अज्ञातवासात राहायचे होते. इकडे शोधाशोध सुरू झाली. त्याला शोधायला समस्यापूर्तीची युक्ती करावी, असा विचार राजाने केला. समस्यापूर्तीची जाहिरात झाली, देश-विदेशात. ‘कमले कमलोत्पत्ति : श्रूयते न तु दृश्यते’ कमलातून कमलाची उत्पत्ती होते, असे ऐकले आहे; पण पाहिलेले नाही. ही समस्यापूर्ती थेट वारांगनेपर्यंत पोहोचली. दोघे एकांतात असताना तिने विचारले, ‘एक समस्यापूर्ती करायची आहे.’ ‘पाहू कोणती आहे ती?’ इति कालिदास. वारांगनेने समस्यापूर्ती देताच तो तिच्या चेहर्‍याकडे रोखून पाहत म्हणाला, ‘अगदी सोपी आहे.’

‘बाले तव मुखाम्भोजे कथे इन्दीवरद्वयम।’ (अगं बालिके, तुझ्या या मुखकमळावर ही दोन निळी नयनकमळे कशी बरे उगवली आहेत.) झाले, वारांगनेचे काम पूर्ण झाले. तिचे कालिदासावर प्रेम थोडेच होते! धनलोभी होती ती. तिने रात्रीच त्याची हत्या केली. सकाळी उठून राजदरबारात हजर झाली इनाम घेण्यासाठी. राजाने मंत्र्यास वारांगनेला धन देण्याचा आदेश दिला; परंतु मनात कुठे तरी पाल चुकचुकली. ‘एका वारांगनेची बुद्धी ही समस्यापूर्ती करू शकेल का? स्त्री सौंदर्याचे कौतुक करणारी ओळ पुरुषालाच सुचू शकते.’ मग राजाने तिला खोदून खोदून प्रश्न विचारले. तिची पूर्ण चौकशी केली. तेव्हा सत्य बाहेर आले. तिनेच त्याची हत्या केली होती. राजा कुमारसेनास अत्यंत दु:ख झाले. त्याने आपला मित्र कालिदासाची समाधी लंकेत बांधली.

आजही आपण लंकेत गेलात, तर कालिदासाची ही समाधी पाहण्यास विसरू नका. गाइड तुम्हाला ती दाखवेल. अशा या आख्यायिका, दंतकथा खोट्या किती? खर्‍या किती? किती विश्वास ठेवावा त्यांच्यावर? हे सर्व खरे असले तरी ही आख्यायिका एवढे तर नक्कीच सांगते की, कालिदासाची कीर्ती थेट लंकेपर्र्यंत पोहोचली होती. उज्जयिनीहून तो लंकेत गेला व तेथे त्याचा मृत्यू झाला. जेव्हा इतिहास एखाद्या व्यक्तीबद्दल काही सांगू शकत नाही, बोलू शकत नाही, चूप होतो, तेव्हा आख्यायिकांतून घटनात्मक सत्य कदाचित बाहेर येत नसेल तरी लोकमानसातील भावसत्य मात्र नक्कीच प्रकट होत असते.