आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वच्छताही महत्त्वाची

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्याकडे चांगले व्यक्तिमत्त्व म्हणजे स्त्रीचे सौंदर्य अशी जी व्याख्या रूढ झालेली आहे तीच मुळात चुकीची आहे. स्त्री सुंदर असली म्हणजे तिचे व्यक्तिमत्त्व उत्तम आणि दिसायला फार चांगली नसली म्हणजे व्यक्तिमत्त्व चांगले नाही, हे समीकरणही चुकीचे आहे. मी पहिल्या लेखात दिल्याप्रमाणे व्यक्तिमत्त्व म्हणजे एक समग्र जाणीव आहे. त्यात दिसणे, शरीरसौष्ठव हा एक भाग आहे. त्या व्यतिरिक्तही बुद्धिमत्ता, एकंदर राहणीमान, बहुश्रुतता, नेटकेपणा, स्वच्छता या गोष्टीही खूप महत्त्वाच्या असतात. एखादी स्त्री अगदी अप्सरेसारखी सुंदर आहे, पण ती अस्वच्छ असेल, तिच्यात संवादक्षमता नसेल, तिला जर बुद्धी नसेल तर ते सौंदर्य काय कामाचे? यासाठी तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा (जे निसर्गाने तुम्हाला दिले आहे त्याचा) अभिमान असायला हवा, तरच तुमच्यात आत्मविश्वास निर्माण होऊ शकतो, हे ध्यानात घ्या. ‘मी एक स्त्री आहे, माझे व्यक्तिमत्त्व चतुरस्र आहे, मी हुशार आहे, मी चारचौघांत अनेक विषयांवर लीलया बोलू शकते,’ याची जाणीव तुम्हाला असेल तरच तुमचे व्यक्तिमत्त्व परिपूर्ण बनू शकते. आज आपण व्यक्तिमत्त्व जागरूकतेत प्रथम शारीरिक स्वच्छता व नीटनेटकेपणाविषयी बोलूया.
माझ्या परिचयातल्या अनेक सुशिक्षित स्त्रियाही शारीरिक स्वच्छतेच्या बाबतीत जरा निष्काळजी आहेत, असं मला जाणवलं. दिसायला चांगल्या असल्या तरी पिवळे पडलेले दात, नखांत असलेली घाण (नखे वाढवण्याचा अट्टहास, पण नखे मेंटेन करण्याचा कंटाळा), घामाच्या दुर्गंधीमुळे जवळून गेल्यावर येणारा प्रचंड वास, एखादा ड्रेस आवडतो म्हणून तोच ड्रेस उन्हाळ्याच्या दिवसातही तीन-चार दिवस वापरण्याचा विचित्रपणा अनेक स्त्रिया करताना दिसतात. अस्वच्छतेमुळे तुमचे एकंदर व्यक्तिमत्त्व खूपच डिस्टर्ब होते व लोकांना तुम्ही नकोसे होता, हे ध्यानात घ्यावे. दातांची निगा न राखल्यास त्यातून पायोरियासारखे असाध्य आणि अनेक विचित्र आजार उद्भवतात. दात हे आपल्या शरीराचे संरक्षक कवच आहे. त्यांची निगा राखायलाच हवी. काहीही खाल्ल्यानंतर दातांवर पाण्याने बोट फिरवायलाच हवे; निदान खळखळून दोन चुळा तरी भरायलाच हव्यात. शिवाय दोन वेळ व्यवस्थित ब्रशिंग, सहा महिन्यांतून एकदा दंतरोगतज्ज्ञाकडे जाऊन दातांची तपासणी करायला हवी. महत्त्वाच्या मीटिंग्जच्या आधी माउथवॉश, काही सुगंधी माउश फ्रेशनर्सही वापरायला हरकत नाही. हल्ली बाजारात मिळणारी शुगरफ्री च्युइंग गम्सही उत्तम असतात. स्वच्छ आणि निरोगी दात हे तुमच्या व्यक्तिमत्त्वाचे व्यवच्छेदक लक्षण आहे.
अनेक स्त्रियांना पाणी कमी पिण्याची वाईट सवय असते. पाणी कमी गेल्याने शरीरातील अशुद्ध द्रव्यांचा निचरा सहजासहजी होत नाही. त्यामुळे घामाला प्रचंड दुर्गंध येतो व तो तुमच्यापेक्षा समोरच्या किंवा तुमच्या सहवासात असलेल्यांना त्रासदायक ठरतो. त्यासाठी पाणी भरपूर प्यायला हवे. भरपूर पाणी प्यायल्याने शरीराचा दुर्गंध नाहीसा होतो. त्याचप्रमाणे यू डी कलोनचा वापर (ते सर्व मेडिकल स्टोअर्समध्ये मिळते), उत्तम दर्जाचे बॉडी डिओडरंट्स, अँटी-पर्सपायंट्स यांचाही सुयोग्य प्रकारे वापर करायला हवा. तुम्ही तुमच्या आवडीचे एखादे मंद सुगंधाचे परफ्यूम वापरू शकता. रोज किंवा किमान दोनेक दिवसांआड अंघोळ करताना उटणे लावणे त्वचेच्या आरोग्यासाठी हितकर असून दुर्गंधनाशकही असते. टाल्कम पावडरचा वापरही करावा. आहारात पालेभाज्या आणि शाकाहारावर जास्त भर दिल्यास शारीरिक दुर्गंधीचा त्रास आपोआप कमी होतो. त्यामुळे मांसाहार अगदी माफक प्रमाणातच असावा. शरीराच्या दुर्गंधामुळे लोक तुमच्या सहवासात येणे टाळतात. आपल्या शरीराला दुर्गंध येतो याची जाणीवही अनेकांना नसते.
आठवड्यातून एकदा नखांची निगा राखायलाच हवी. विचित्र वाढलेल्या नखांमध्ये माती किंवा इतर अशुद्ध पदार्थ साठून त्याचा तुमच्या आरोग्याला त्रास होऊ शकतो. त्यामुळे नखे वाढवत असाल तर ती व्यवस्थितपणे फाइल करणे, स्वच्छ ठेवणे नितांत गरजेचे आहे.भारतासारख्या दमट हवामानाच्या देशात उन्हाळ्यासारख्या ऋतूत कोणीही एक ड्रेस जास्तीत जास्त संपूर्ण दिवस वापरणे म्हणजेही एक दिव्यच आहे. काय वाट्टेल ते झालं तरी एक ड्रेस एक दिवसांपेक्षा जास्त वापरू नये. दुसरे दिवशी तोच ड्रेस घातलात तर आधीच्या दिवसात त्या ड्रेसवर उडालेली धूळ, माती व इतर अशुद्ध गोष्टींमुळे तुमचे आरोग्य धोक्यात येते, हे ध्यानात घ्यावे. कपडे धुताना शेवटच्या पाण्यात डेटॉलसारखे द्रव्य घातल्याने कपड्यातील बॅक्टेरिया नाहीसे होतात.
यापुढच्या लेखात आपण त्वचेच्या काळजीविषयी बोलणार आहोत. व्यक्तिमत्त्व जागरुकतेसंदर्भात दिसण्यापेक्षा शारीरिक स्वच्छता महत्त्वाची आहे. शरीर स्वच्छ आणि नीटनेटके असेल तर तुमच्या व्यक्तिमत्त्व विकासातली एक महत्त्वाची पायरी तुम्ही उत्तम प्रकारे पार केली आहे, असं समजायला हरकत नाही.
क्रमश: