आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निरभ्र आकाश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


‘प्रिय रेवू, ही चिठ्ठी तुला एक ना एक दिवस सापडेलच; पण क्षमा कर. मला तुला एक गोष्ट सांगायचीय जी मी तुला प्रत्यक्षात सांगू शकत नाही. हिंमत होत नाही गं माझी. पण रेवू, मला तुला रझियाबद्दल सांगायचंय.’ रझिया? थोडा विचार केल्यावर अंत्यविधीच्या दिवशी आलेली ती मुस्लिम स्त्री तिला आठवली. मधल्या काळात तिला तिचा विसर पडला होता. तिनं पुढे वाचायला सुरुवात केली. ‘रेवू, रझिया माझ्या आयुष्यात अचानक आली. तुला आठवतं, नागपूरला मी मीटिंगसाठी जात होतो. ट्रेनने प्रवास होता रात्रीचा. त्या दिवशी नेहमीप्रमाणे सीटवर बसलो असताना डब्यातल्या टॉयलेटजवळ भेदरलेली रझिया बसली होती, अंग चोरून. कुणाशीही बोलत नव्हती; पण घाबरलेली दिसत होती.

गाडीतच मुलांचं टोळकं पत्ते खेळत बसलं होतं. चित्रपटगीतं आणि मोठमोठ्यानं हसणं, एकमेकांकडे टाळ्या देणं, वगैरे. नजर मात्र सर्वांची त्या तरुणीवर होती. अश्लील विनोदही चालले होते. मी सारं पाहत होतो. या सा-यात ती ‘माणूस’ शोधत होती. आधार बघत होती. भुकेलीही असावी. शेवटी मला राहवलं नाही. मी तिची चौकशी केली. तिला जेवण दिलं, पाणी दिलं. आता तिला माझ्याबद्दल विश्वास वाटला असावा. ती बोलती झाली.

‘साहब, मै रझिया. छोटे से गाँव में रहती हूँ. बूढा बाप, उस ने तीसरी शादी की. नयी माँ बहोत खराब. बहोत सताती. ना खानापीना. दिनभर काम. एक दिन उसने मेरी इज्जत से खेलना चाहा. साब, बेच रही थी मुझे, दुबई भेजनेवाली थी. क्या करू साब, जैसेही पता चला, भागी मैं वहाँ से. और जो गाडी मिली, उस में बैठी हूँ. मालूम नही कहाँ जाऊंगी, क्या करूंगी. पर आप की बडी मेहरबानी. मैं सवेरे चली जाऊंगी साब. शहर में देखूँगी कोई इज्जतवाला काम.’ मी तिच्यावर विश्वास ठेवला. तिचे टपोरे, भरलेले डोळे सत्य सांगत होते. मी तिला धीर दिला, तिला मी अगदी देवासमान वाटलो; पण सौंदर्य आणि तारुण्य घेऊन रझिया काय करेल एवढ्या मोठ्या शहरात, मीही विचार केला. मग मी माझ्या मित्राला, डॉ. सुरेश सेठी यांना फोन लावला आणि रझियाबद्दल सांगितले. सकाळी नागपूरला उतरून तिला आधी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. तिला राहायला खोली, कपडे आणि खाऊन पिऊन पगार असे ठरवून हॉस्पिटलात तिची सोय केली. वरचेवर मी तिची चौकशी करत असे. सुरेशकडे गेलो की ती भेटे. तीही मला देवासारखंच माने. गेलो की तिला उपकारांची फेड कशी करावी हेच समजत नसे.

पण त्या काळात ती माझ्याकडे आकर्षित झाली होती हे मला कळत होतं. खूप संयम ठेवला; पण एका तूफानी रात्री मी तिच्याकडे थांबलो असताना जे होऊ नये ते घडलं रेवू. मला क्षमा कर आणि त्यामुळे मी तुला तिच्याबद्दल सांगू शकलो नाही. पण तिला तुझ्याबद्दल, आई-अण्णांबद्दल, आपल्या चिमण्यांबद्दल सारं माहीत आहे. ती कधीही माझ्याकडे काही मागत नाही. रेवू, माझं तुझ्यावर, जाई-जुईवर खूप प्रेम आहे गं; पण तू माझ्यापासून दूर होशील, ही भीती वाटते मला सारखी. शब्द ओठावर येत नाहीत ना, म्हणून कागदावर उतरवलेत. आणि समजा उद्या माझं काही झालं तर? माणसाचा क्षणाचा भरवसा नाही. मला क्षमा करशील ना? तुझ्या लाडक्या मंग्याला. मला माहीतेय तुझं मन सागरासारखं आहे, होय ना?’ तुझाच मंगेश.

रेवती सुन्न झाली. मंगेशने रझियाबद्दल पुसटशीही कल्पना तिला दिली नव्हती. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. मंगेशने जरी तिच्याशी प्रतारणा केली असली तरी त्याला ‘माणुसकीची झालर’ होती. हे नातं वासनेपेक्षा माणसाच्या नात्यातल्या रेशीमबंधासारखं होतं. तिनं चिठ्ठी मिटली. मागे रझियाचा पत्ता होता. तिनं सर्व सामान खेड्यावर पाठवलं. स्वत:ची बॅग भरली. दुस-या दिवशी अण्णा-आर्इंना नमस्कार करून महत्त्वाच्या कामासाठी जात असल्याचं सांगितलं. नागपूरची गाडी पकडली आणि ‘लोकसेवा हॉस्पिटल’ला पोहोचली.

काही वेळात रझिया तिच्या समोर आली. तोच पेहराव. पांढरा सलवार कमीज आणि डोकं झाकलेली, भावूक डोळ्यांची रझिया. तिनं रझियाला सांगितलं, मी रेवती. रेवती म्हणताच तिनं तिच्या पायांना हात लावला. ‘दीदी, आप यहाँ कैसे! यहाँ का पता...?’ रेवतीनं चिठ्ठी तिच्या हातात दिली. ‘दीदी, पर आप यहाँ क्यूँ?’ ‘रझिया, मैं यहा एक अधूरा काम करने आयी हूँ,’ असं म्हणत तिनं एक लाख रुपये काढले. ते तिच्या हातात ठेवत म्हणाली, ‘ये तुम्हारे लिए. मंगेशने मेरे लिए बहोत कुछ छोडा. बडी जिम्मेदारी छोडी, दो बेटीयाँ, उनके माँ-बाप और तुम. इन सब की चिंता उन को रहेगी. तुम्हारे भविष्य की चिंता उन्हे सतायेगी. उन की आत्मा कभी मुक्त नहीं होगी. इस लिए ये पैसे रखो. उस में अच्छा छोटा मोठा कारोबार करो या फिर शादी कर लो. अभी जवान हो, पूरी जिंदगी किस के सहारे काटोगी?’ रझिया ऐकत होती. डोळे पाझरत होते. मंगेशपेक्षा रेवती या क्षणी तिला महान वाटली. एक स्त्री इतका विचार करू शकते यावर विश्वास ठेवणं कठीण होतं. रेवतीनंही स्वत:ला सावरलं. मंगेशची एक मोठी काळजी दूर झाल्याचं समाधान तिच्या चेह-या वर होतं. रेवतीनं मोठा श्वास घेतला. रझियाचा निरोप घेतला. आता आकाश स्वच्छ आणि निरभ्र वाटत होतं. मनातलं मळभ दूर झालं होतं. लवकरच तिला घर गाठायचं होतं. बछड्या, आई-अण्णा वाट पाहत असतील, याची जाणीव तिला झाली. शांत मनानं तिनं ‘घरा’च्या प्रवासाला सुरुवात केली. एक मोठं कर्तव्य केल्याचं समाधान तिला वाटत होतं.