आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लिव्हइन मध्‍ये सुस्पष्‍टता

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


‘तुला काय करायचं आहे सुमन?’ मी तिला विचारलं. ‘ताई, मला माझा हक्क पाहिजे आणि मला त्याला चांगला धडा शिकवायचा आहे.’ ती पोटतिडकीने बोलत होती. ‘ठीक आहे सुमन. पण आपल्याला आधी हे सिद्ध करावं लागेल की गेली तीन वर्षं तुम्ही नवरा-बायकोसारखे राहत होतात. मला सांग की तुम्ही तिथे राहत असताना त्या पत्त्यावर तुझ्या नावे झालेला काही पत्रव्यवहार वगैरे आहे?’ ‘नाही ताई, मी पूर्णपणे त्याच्या घरी शिफ्ट झाले नव्हते, माझ्या घरी माझी म्हातारी आई असल्यामुळे मी फक्त जाऊन- येऊन होते तिथे!’ ‘बरं, तुमचे एकत्र फोटोबिटो?’ तिने दोन-तीन फोटो समोर धरले, सगळे त्यांच्या एकत्र मित्र- मैत्रिणींच्या ग्रुपमधले फोटो होते, ज्यामुळे त्यांचं नातं सिद्ध व्हायला काहीच मदत होणार नव्हती. ‘तुमचे काही जॉइंट अकाउंट वगैरे होते का?’ ‘नाही ताई, तशी कधी गरजच पडली नाही.

तो फिल्म्समध्ये संघर्ष करत होता, एकटाच होता मुंबईत. मीही एकटी होते, म्हणून आम्ही जवळ आलो. त्याचंही जीवापाड प्रेम होतं माझ्यावर! मीही त्याच्या बायकोसारखं त्याचं सगळं केलं. जेवायला तो माझ्याच घरी यायचा, दर वीकएंडला मी त्याच्याकडे राहायला जायची! त्याच्याकडे पुरेसे पैसे नसायचे. नोकरी होती म्हणून तिथला बराचसा खर्च मीच करायची. फक्त लग्न झालं नव्हतं एवढंच! तोही घरी सांगणार होता; पण अचानक एकदा गावाला गेला, आल्यावर भाड्याची जागा बदलली, फोन टाळायला लागला. शेवटी त्याचा नवीन पत्ता मित्रांकडून मिळवून घरी गेले तर कळलं की त्याने लग्न केलंय.’ ती हमसून रडायलाच लागली. मीही विचारात पडले. त्यांचा नातेसंबंध ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये मोडणारा होता; पण ते सिद्ध करणं फार कठीण होतं. तो भाड्याने राहत होता आणि सुशिक्षित, मध्यमवर्गीय सोसायटीत तिच्या जाण्या-येण्याची फारशी कोणी दखल घेतलेली नव्हती. कागदोपत्री पुरावाही नव्हता. त्याची कमाई अनिश्चित होती. तिला त्याच्याकडून पैशाची अपेक्षा नव्हती. तिला हवं होतं त्याच्या घरातलं आणि जीवनातलं तिचं स्थान, त्याचं प्रेम आणि तिचा आत्मसन्मान! हे मिळवून देणं खरंच सोपं नव्हतं! इथे गरज होती ती तिला तिचं हरवलेलं स्वत्व शोधायला मदत करण्याची, भावनिकदृष्ट्या तिला सावरण्याची. समुपदेशक म्हणून मी त्यावरच लक्ष केंद्रित केलं आणि अर्थातच त्याचा चांगला परिणाम दिसून आला.

मात्र, या निमित्ताने एकूणच लिव्ह इन रिलेशनशिप ह्या विषयावर विचार सुरू झाला. प्रत्यक्ष लग्न न करताही पती-पत्नीसारखे संबंध ठेवून सहजीवन व्यतीत करणे याला लिव्ह इन रिलेशनशिप म्हणता येईल. पूर्वीही असे नातेसंबंध होते, पण ते परिस्थितीवश स्वीकारलेले असत. असे नातेसंबंध उपहासाचा विषय होता. त्याला कोणताही कायदेशीर आधार नव्हता. बदललेल्या परिस्थितीत मात्र विवाहसंस्थेला पर्याय म्हणून लिव्ह इन रिलेशनशिपकडे पाहिले जाते. लग्नसंस्थेबद्दल भ्रमनिरास झाल्यामुळे, नवरेशाही अमान्य असल्यामुळे, बंधने नकोशी वाटल्यामुळे, लिव्ह इन रिलेशनशिपचा पर्याय स्वीकारला जातो. मात्र, वस्तुस्थितीचा विचार केला तर लग्नसंस्थेचे जे तोटे टाळण्यासाठी लिव्ह इन रिलेशनशिपचा पर्याय अवलंबला जातो त्या गोष्टी खरोखरच अशा नातेसंबंधातून वजा होतात? कारण शेवटी जेव्हा स्त्री आणि पुरुष आपल्या साचेबद्ध जडणघडणीसह लग्नासारख्याच निकटतम नात्यात एकत्र राहतात तेव्हा साहजिकच ते आपल्या प्रवृत्ती, सवयी, स्वभाव व विचार बरोबर घेऊनच येतात. म्हणजेच पुरुष काहीशी वर्चस्ववादी वृत्ती आणि स्त्री भावनाशील आणि अवलंबित्वाची वृत्ती घेऊनच एकत्र येणार आहेत. त्यामुळे स्वामित्वाची भावना आणि शरण जाण्याची किंवा सहन करण्याची वृत्ती ही केवळ लग्नाचं बंधन नाही म्हणून नाहीशी होईल हे असंभव आहे.

किंबहुना कोणतंही कायदेशीर बंधन नसल्यामुळे साथीदार पटकन कधीही आपल्याला सोडून जाऊ शकतो, ही असुरक्षिततेची भावना अशा नातेसंबंधात जाणवू शकते. तसेच आपल्या साथीदारावर नियंत्रण ठेवण्यासाठी वेळप्रसंगी हिंसेचा वापर होऊ शकतो. यासंदर्भात आपल्या कायद्यांचा विचार केला असता कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005 मध्ये ‘लिव्ह इन’चा अंतर्भाव करण्यात आलाय. त्यायोगे अशा नातेसंबंधातील स्त्रीला संरक्षण दिले आहे. मात्र, लग्न, घटस्फोट, वारसा हक्क आदी दिवाणी वैयक्तिक कायद्यांमध्ये अद्याप या नातेसंबंधांचा अंतर्भाव करण्यात आलेला नाही. एकूणच असा नातेसंबंध दीर्घकाळ टिकण्याच्या दृष्टीने दोघांमध्येही अधिक भावनिक प्रगल्भता, बौद्धिक सुस्पष्टता, व्यावहारिक बाबींबद्दल निकोपता, स्पष्टता आवश्यक आहे. आपली एकंदर समाजरचना, त्या समाजातील स्त्री व पुरुषांची जडणघडण आदी गोष्टींमध्ये बदल घडून आल्याखेरीज असा कोणताही नातेसंबंध पारदर्शी, समतोल व निकोप राहू शकणार नाही.

mrudulasawant13@gmail.com