आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘क्लाउड कॉम्प्युटिंग’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकबर बादशहाच्या दरबारात रुजू होऊन जेमतेम दोन एक वर्षे होताच सेनेतील एका सैनिकाला लढाईतील एका कामगिरीत यश मिळवल्याबद्दल बढती मिळाली. वयाने, अनुभवाने तुलनेने लहान असलेल्या या उमेदवाराला बादशहांनी कशी काय बरं बढती दिली, असं इतर नाराज वरिष्ठ सैनिकांना वाटलं आणि त्यांनी ही खंत अकबराऐवजी बिरबलाजवळ बोलून दाखवली. बिरबलाने वरिष्ठांना योग्य तो आदर दिला. शांतपणे त्यांची खंत, नाराजी ऐकून घेतली व म्हणाला, ‘आपण ज्येष्ठ, श्रेष्ठ आहात यात शंकाच नाही, परंतु आपण आपली हत्यारे वरचेवर धारदार करतो का, त्यांना घासून पुसून साफ करतो का हे बघणं महत्त्वाचं आहे. तुम्ही सगळे अजूनही जुनाट, काळातील गोष्टींमध्येच अडकून पडला आहात पण त्या नवख्या सैनिकाने सध्याच्या काळाची पावलं ओळखून स्वत: ला बदलवलं.’


मित्रांनो, गोष्टीचा मथितार्थ तुमच्या लक्षात आलाच असेल नं? अगदी बरोबर आहे. काळाबरोबर होणारे बदल. मग ते अभ्यासातील, अभ्यासाच्या पद्धतीमधील, तंत्रज्ञानामधील, विज्ञानामधील असोत वरचेवर घडतच असतात. आपण मात्र नव्याने काही गोष्टी टिकण्याची, स्वत:ला अपडेट करण्याची सवय ठेवायला हवी. आयटी क्षेत्र किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं क्षेत्र हे प्रत्येक वेळी, नवे आव्हान घेऊन येतं. प्रत्येक वेळेला ती एक महालाट असते आणि त्यातून काहीतरी वेगळंच निष्पन्न होत असतं. ‘कोबोल’सारख्या संगणकीय भाषा केव्हाच काळाच्या आड गेल्या आहेत. ‘सी-प्लसप्लस’ किंवा ‘जावा’ सारख्या संगणकीय भाषामध्ये सध्या काम चालतं, परंतु जागतिक मंदीमुळे या क्षेत्रामध्ये सध्या म्हणावी तेवढी तेजी नक्कीच नाहीये. नामांकित आयटी कंपन्यांमधील बराचसा कर्मचारी वर्ग हा ‘बेंच’ वर आहे. (आयटीमध्ये बेंच या संज्ञेचा अर्थ म्हणजे ज्यांना कुठलेही प्रोजेक्ट दिले गेलेले नाही असा होतो) थोडक्यात काम नसल्यामुळे बसवून ठेवणं! खर्चात कपात म्हणून कित्येक ठिकाणी कामावरून काढून टाकल्याची उदाहरणंही आपण अनुभवतोच, पण अशाही परिस्थितीमध्ये एक अत्यंत आनंदाची बातमी आहे.

नव्हे मंदीतही सुसंधीच आहे असं म्हणायला हवं. ‘क्लाउड कॉम्प्युटिंग’ हे क्षेत्र नव्यानेच खुलं झालेलं आहे. तशी ‘क्लाउड’ची सुरुवात 2005 पासूनच झाली. पण त्याची व्याप्ती मात्र वाढत आहे. हे ‘क्लाउड कॉम्प्युटिंग’ आहे तरी काय बरं? हे कुठलंही भलं मोठं किंवा आक्राळ विक्राळ यंत्र नक्कीच नाही किंवा एखादी कंपनी नाही किंवा तत्सम काहीच नाही. कॉम्प्युटिंग म्हणजे गणना किंवा मोजमाप किंवा ‘गणक’ करणारी पद्धती. क्लाउड कॉम्प्युटिंग ही एक सेवा आहे. अगदी इंटरनेटच्या माध्यमातून पुरविली जाणारी सेवा म्हणजे क्लाउड कॉम्प्युटिंग होय. या क्षेत्रातील तज्ज्ञाचं तर असंही म्हणणं आहे की क्लाउडमुळे या क्षेत्रामधील साधनसंपत्ती किंवा इन्फ्रास्ट्रक्चरसाठी लागणारा बराचसा पैसा आणि जागा यांची बचत निश्चितच होऊ शकते. कारण, केवळ इंटरनेटच्या माध्यमातून ग्राहकांना सेवा पुरवणारी ही एक व्यवस्था आहे.

स्वयंचलन आणि स्वयंसेवा अर्थात ऑटोमेशन आणि सेल्फ सर्विस हा क्लाउडचा आत्मा असल्यामुळे थोड्याशाच प्रशिक्षित मनुष्य बळाची आवश्यकता आहे, पण असं असलं तरी सुद्धा क्लाउड कॉम्प्युटिंगसाठी लागणारे अ‍ॅप्लिकेशन्स विकसित करण्यासाठी मात्र अनेक गुणी, प्रशिक्षित कर्मचा-यांची आवश्यकता आहे. त्यामुळे ज्यांचा ‘जॉब’ अस्थिर आहे किंवा असुरक्षित आहे, त्यांनी ‘क्लाउड’ विषयीचे प्रशिक्षण सुरू केल्यास त्यांची असुरक्षितता निश्चितच जाणार आहे.


ब-याच वर्षांपासून जे संगणक अभियंते पारंपरिक पद्धतीने ‘कोडिंग’ करीत होते किंवा डॉट नेट, ‘जावा’ सारख्या संगणकीय भाषांचा वापर अ‍ॅप्लिकेशन विकसित करण्यासाठी करत होते त्यांना आता पारंपरिक भाषेव्यतिरिक्त ‘स्प्रिंग सोर्स’ आणि ‘रुबी ऑन टेल्स’ सारख्या प्रणालींचा किंवा भाषांचा अवलंब करावा लागणार आहे. सध्या तर हे क्षेत्र अगदीच बाल्यावस्थेत आहे. भारतभरातील बहुतांश अभियांत्रिकी महाविद्यालये आणि तांत्रिक संगणक संस्था यांनी क्लाउड अ‍ॅप्लिकेशन्स शिक्षित, प्रशिक्षित करायला सुरुवातही केलेली आहे. क्लाउड कॉम्प्युटिंगच्या अवकाशामध्ये ‘एंटरप्राइज क्लाउड आर्किटेक्ट’ म्हणून एक नवी संधी आहे. जे कर्मचारी आयटी इन्फ्रास्ट्रक्चर आणि अ‍ॅप्लिकेशन्स अशा दोन्ही आघाड्यांवर पारंगत आहेत शिवाय जे स्व:त अ‍ॅप्लिकेशन डिझाइनही करू शकतील अशांसाठी खूप चांगल्या रोजगाराच्या, भरभक्कम पगाराच्या संधी इथे उपलब्ध आहेत. टेक्निकल किंवा तांत्रिक रोजगार तर इथे उपलब्ध होतातच, पण त्याशिवाय बिगर तंत्रज्ञान किंवा नॉन टेक्निकल जॉबच्या संधीदेखील उपलब्ध होऊ शकतात. जसं मार्केटिंग आणि सेलिंग किंवा विक्री.


सध्याचे संगणक अभियंताचे सरासरी वार्षिक उत्पन्न पाच ते सात लाखांचे असते. पुढे अनुभव घेतल्यास हाच आकडा दहा ते बारा लाखांपर्यंत जातो तसंच क्लाउड अ‍ॅप्लिकेशन्सकडे या आकड्यांमध्ये निश्चितच लक्षणीय वाढ होणार आहे. क्लाउडमुळे ब-याचशा परदेशी कंपन्या भारतामध्ये येण्याची शक्यता आहे. 2015 पर्यंत जगभरातच क्लाउडमुळे 13.8 दशलक्ष संधी उपलब्ध होणार आहेत. पैकी आपल्या भारतामध्ये जवळपास वीस लाख संधी उपलब्ध असणार आहेत. इन्फोसिस या भारतातील अग्रगण्य कंपनीने पूर्वीच जवळपास दोन हजार क्लाउड शिक्षित कर्मचा-यांना भरती केल्याचे ऐकिवात आहे तेव्हा, ‘वेलकम टू क्लाउड कॉम्प्युटिंग’.