नमस्कार,
आज मी अतिथी संपादक या नात्याने तुमच्यासमोर येत आहे. खरे तर माझ्या मनावर या भूमिकेचे प्रचंड दडपण आले आहे. कधी काळी म्हणजे अगदी चाळीस वर्षांपूर्वी स्वत:ची ओळख विसरलेल्या माझ्यासारख्या स्त्रीची ओळख करून देताना, कुणी मला समाजकारणी म्हणतात, तर कुणी कमानी उद्योग समूहाची अध्यक्षा म्हणून संबोधतात. कुणाला मला पद्मश्री पुरस्कार विजेत्या कल्पनाताई म्हणावेसे वाटते तर कुणा आंबेडकरप्रेमी भारतीयास लंडनमधील बाबासाहेबांच्या निवासस्थानास बाबासाहेबांचे परदेशातील पहिल्या स्मारकासाठी धडपडणा-या आंबेडकरी कार्यकर्ता अशी ओळख द्यावीशी वाटते. एखाद्या गांजलेल्या स्त्रीस माझी ओळख म्हणून सह्याद्री वाहिनीची हिरकणी किंवा प्रेरणा पुरस्कार प्राप्त अशी करावीशी वाटते. तर कुणा बँकेत सातत्याने खेटे घालूनदेखील कर्ज न मिळू शकलेल्या अशिक्षित परंतु धडपड्या स्त्रीस माझी ओळख भारतीय महिला बँकेची संचालक अशी करून द्यावीशी वाटते. अशा वेगवेगळ्या व्यक्तींकडून माझ्या अनेक ‘ओळखी’ होत असताना मला मात्र स्वत:ची ओळख डॉ. बाबासाहेबांनी घालून दिलेल्या ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणारी आंबेडकरवादी स्त्री अशीच जपायची आहे.
विदर्भातील एका दलित कुटुंबातील अल्पशिक्षित मुलगी वयाच्या १२व्या वर्षी लग्न करून मुंबईसारख्या महानगरीत आल्यानंतर सासरी परवड झाल्यामुळे नव-याला सोडून आलेली मुलगी म्हणून वाढत असताना कुुटुंबावर होणारे आघात, मानसिक कोंडी, गरिबी या सर्वांना कंटाळून मीसुद्धा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. परंतु त्याच्यातून बचावल्यानंतर मात्र आता मागे वळून पाहायचं नाही, संघर्ष करायचा या एकाच ध्यासाने पुन्हा एकदा जगण्यास सुरुवात केली. पोलीस शिपाई म्हणून काम करणा-या वडिलांना अत्यंत तुटपुंजे वेतन होते. त्यामुळे कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी घरातील प्रत्येकाला काही ना काही काम करावेच लागत होते. मी सुद्धा शिवणकाम करण्यास सुरुवात केली. परंतु उत्पन्न कमीच पडत होते. शिक्षण नसल्यामुळे पोलीस, नर्सिंग किंवा सैन्यदलामध्ये कोठेही नोकरी मिळत नव्हती. ही कोंडी फोडण्यासाठी वयाच्या १५-१६व्या वर्षी गाव सोडण्याचा निर्णय घेतला आणि मुंबई गाठली.
(क्रमश:)