आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Collection Of Information Its Not Mean Education

माहितीचा संचय म्हणजे शिक्षण नव्हे...

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

केवळ तांत्रिक कौशल्यावर भर दिल्याने व्यक्तिमत्त्व एकांगी विकास होतो हा मुद्दा कृष्णमूर्तींनी मांडला. त्याचबरोबर त्यांनी केवळ माहितीचा संचय व शक्तीचा विकास म्हणजेच शिक्षण या चुकीच्या समजुतीमुळे आपल्याला जीवनाचे समग्र दर्शन घडत नाही असे स्पष्टपणे बजावले आहे. आजच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे अमिताभ बच्चनच्या केबीसीत जाणारे या सर्वांना कृष्णजी आक्षेपार्ह वाटू शकतील. पण त्यांचा दृष्टिकोन हा आपण त्यांच्या एकूण मांडणीच्या संदर्भात समजून घेतला पाहिजे. केवळ तुटकपणे एकच मुद्दा घेऊन गैरसमज होऊ शकतात... शिक्षणातून माहिती देण्यालाच कृष्णमूर्ती विरोध करतात का....व्यायामालाच कृष्णमूर्ती विरोध करतात का, असा समज न करता ते नीट समजून घेऊया.

कृष्णमूर्ती हे शिक्षणाने स्वत:च्या भावभावना आणि स्वत:चे आकलन करायला मदत करावी अशीच भूमिका मांडतात. हा प्राधान्यक्रम वगळून शिक्षणाच्या नावाखाली जे जे घडते त्यावर त्यांचा आक्षेप आहे. अर्थात आपल्या शिक्षणाची रचना ही उदरनिर्वाहाचे साधनही विकसित करण्याची गरज पुरवत असल्याने काही विसंगती निर्माण झाल्या आहेत. आज स्पर्धा परीक्षांमुळे उच्च पदे मिळत असल्याने या परीक्षांमध्ये माहिती जमविणे याला अवास्तव महत्त्व आले आहे. अमिताभ बच्चन यांच्या केबीसीच्या कार्यक्रमासारखे कार्यक्रम तर माहिती जमविणे हेच जणू जीवनाचे ध्येय असल्याचे बिंबवतात... इंटरनेटपासून अनेक माहितीचे उपलब्ध खजिने मुलांच्या डोक्यात रिते करण्याचे केंद्र म्हणजे आज शाळा झाल्या आहेत. खरचं इतक्या प्रकारच्या माहितीची पोपटपंची गरजेची आहे का... मुलांना कोणती माहिती आवश्यक आहे याचा विवेक आज हरवला जातो आहे.

पुन्हा या माहितींमधून दृष्टिकोन काहीच विकसित होत नाही. फक्त नावे तेवढी पाठ होतात. उदा. महात्मा गांधींच्या आत्मचरित्राचे नाव काय हा प्रश्न आणि हिटलरच्या आत्मचरित्राचे नाव काय... बस ही नावे सांगितली की प्रश्न संपला. मूळ पुस्तके वाचण्याची गरज नाही आणि दोघांच्या जगण्यातील टोकाचे अंतरही समजून नाही घेतले तरी मार्क मिळून जातात. तेव्हा जीवनाच्या मर्माचे आकलन न करता केवळ माहितीचे पोपट आपण तयार करतो आहोत यावर कृष्णजींचा खरा आक्षेप आहे. त्यांचा भर प्रत्यक्ष जगण्याच्या आकलनावर आहे. आजचे शिक्षण विचार कोणता करावा हे शिकवते विचार कसा करावा हे शिकवत नाही असे जेव्हा कृष्णजी उद्वेगाने म्हणतात तेव्हा त्यांना शिक्षणातून एक विश्लेषक मन विकसित व्हावे असेच म्हणायचे असते... पण आजच्या या आमच्या केवळ माहिती डोक्यात कोंबून पोपट तयार करण्यालाच आम्ही शिक्षण म्हणू लागलो आहोत.

हे मान्य व्हावे आणि म्हणूनच जनरल नॉलेज भरपूर असलेले अधिकारी प्रत्यक्षात प्रश्नांचे विश्लेषण करतीलच असे नाही. लोकांचे प्रश्न सोडाच पण प्रत्यक्षात त्यांचे स्वत:चे भावनिक समायोजन करू शकत नाहीत... सर्जनशीलता कामात जाणवत नाही. कारण केवळ माहिती असणे हे बुद्धिमत्तेचे लक्षण होऊ शकत नाही. शक्तीचा विकास म्हणजे शिक्षण नव्हे याचा अर्थ शाळेतील क्रीडा किंवा व्यायाम याला ते विरोध करतात असे नव्हे तर ते केवळ शक्तीच्या विकासालाच शिक्षण समजणा-या शाळांना फटकारतात. सैनिकी शाळा या केवळ अशा प्रकारे शारीरिक विकासच महत्त्वाचा मानतात. जीवनाची इतर अंगे ते गौण मानतात. यावर त्यांचा आक्षेप आहे. कृष्णजी स्वत: रोज योगासने करत. मूल शक्तिमान होईल पण त्याच्या जगण्याचे काय... निसर्गाचा आनंदाबरोबर संगीत, स्वत:च्या भावभावनात जगणे, प्रेम हे पैलूही जगण्यात महत्त्वाचे आहेत.

बंगळुरुच्या कृष्णमूर्ती शाळेतील क्रीडा शिक्षक गोपाल यांची मुलाखत मी घेतली तेव्हा ते जे म्हणाले ते थक्क करणारे आहे. ते म्हणाले, आमच्या शाळेतील मुले सर्व खेळ कुशलतेने खेळतील पण एकाच खेळाला समर्पित होऊन देशपातळीवरचा खेळाडू इथून निर्माण होणार नाही कारण नुसते खेळ म्हणजे जीवन नाही तर जीवन सुंदर असण्याचा तो एक महत्त्वाचा भाग आहे इतकेच सम्यक स्थान त्याला आम्ही देतो. मी विचारले मग इथून विश्वनाथ आनंद आणि तेंडुलकर निर्माणच होणार नाहीत का....ते फक्त हसले. म्हणाले, शाळेबाहेर गेल्यावर तो खेळ त्यांच्या जगण्याचा भाग बनूही शकेल; पण शाळेत आम्ही सम्यक विकास करणार. या विचाराला पटकन झिडकारणे सोपे आहे; पण जीवनाच्या समग्रतेची ही भूमिका आपण नाकारू शकतो का....

herambrk@rediffmail.com