आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इकेबाना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जपानी पुष्परचनेला ‘इकेबाना’ म्हणतात. ‘फुलांना पाण्यात घाला व सजीव बनवा, त्यांना पुनर्जीवन द्या’, हा या शब्दाचा अर्थ आहे. इकेबाना रचनांमध्ये जीवनाचे तत्त्वज्ञान मांडले जाते. या रचना केल्याने आध्यात्मिक समाधान मिळते. पूर्वी जपानमध्ये त्या मुख्यत्वे मंदिरातच केल्या जात असत, पण नंतर साधारण ८०० वर्षांपासून त्या घरांतही केल्या जातात. जपानी पुष्परचनांमध्ये फुलांचा खूप भरणा करत नाहीत, रचनेत सुबक रेषा व फुलापानांमधल्या रिकाम्या जागांनासुद्धा खूप महत्त्व आहे. जपानमध्ये साधारणपणे ३००० शाळांमध्ये हजारो शिक्षक पुष्परचना शिकवतात. मूळ काही नियम तसेच ठेवून त्यात त्यांनी आपापल्या भोवताली उपलब्ध साहित्यानुसार, तसेच आपल्या कल्पकतेनुसार बदल केले आहेत. जसे आपल्याकडे शास्त्रीय संगीताची घराणी आहेत, ती सर्वसाधारण सारखेच राग शिकवतात व ते राग सात सुरांना लक्षात घेऊनच बनले आहेत; पण प्रत्येक घराण्याची स्वत:ची एक वेगळी ओळख व गायकीची पद्धत आहे व आधुनिक संगीतातही हेच सूर वापरतात, पण पद्धत वेगळी आहे. तशाच प्रकारच्या जपानमध्ये पुष्परचना शिकविणाऱ्या स्कूल्स आहेत. त्या आधुनिक व परंपरागत दोन्ही पुष्परचना शिकवतात. पुष्परचनांची मूळ संकल्पना साधारण सारखीच आहे; पण प्रत्येकाने आपले एक वेगळेपण जपले आहे, तसेच आपली स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिथे पुष्परचना शिकण्यासाठी सर्टिफिकेट कोर्स तसेच डिप्लोमा व मास्टर्स डिग्री कोर्सेससुद्धा आहेत. यावरून त्यांच्या जीवनात पुष्परचनेचे महत्त्व लक्षात येते.
जपानी रचनांमध्ये तीन मुख्य प्रतीकात्मक रेषा असतात. (फोटोत दाखविल्याप्रमाणे तीन अम्ब्रेला पामच्या काड्या) या तीन फांद्यांच्या उंचीमध्ये प्रमाणबद्धता असते, तसेच खोचण्याच्या जागा निश्चित असतात. ते आपण पुढे प्रत्येक प्रकारच्या रचनेचा अभ्यास करताना बघणार आहोत. या तीन फांद्यांना वेगवेगळी नावे दिलेली आहेत, त्या ती प्रतीके दर्शवितात. जसे मुख्य उंच फांदीला ‘स्वर्ग’ फांदी म्हणतात (काही ‘सूर्य’ किंवा पहिली फांदी, अथवा मुख्य फांदी, तर काही सब्जेक्ट म्हणतात.) दुसरी फांदी म्हणजे ‘मानव’ फांदी म्हणतात.
सर्वात लहान म्हणजे तिसऱ्या फांदीला ‘पृथ्वी’ फांदी किंवा ऑब्जेक्ट म्हणतात. तिन्ही फांद्या किंवा दोन तरी एका जातीच्या निवडतात. फांद्या, फुले विशिष्ट प्रकारे खोचून निसर्गाचे रूप दर्शविले जाते किंवा काहीतरी संकेत या रचनांद्वारे दिला जातो. या रचनांमध्ये शक्यतो विषम संख्येतच फुले लावतात. साधारणपणे ती अर्धवट उमललेली निवडतात. रंगसंगतीवर विशेष लक्ष दिले जाते. जपानी पुष्परचनेत रिक्का, शोका, नागिरे, मोरिबाना, झिनीबाना, जियूबाना या रचना प्रमुख मानल्या जातात.
drjayantipc@ gmail.com